25 C
Panjim
Friday, January 22, 2021

सामाजिक संक्रमणाची कबुली

राज्यातील कोरोना काही आटोक्यात येताना दिसत नाही. उलट दिवसेंदिवस तो नवनव्या गावांमध्ये फैलावत चालला आहे. सालसेतमध्ये त्याचे तांडव हळूहळू सुरू झाले आहे आणि उत्तर आणि दक्षिण गोव्यातील दूरदूरच्या गावांमध्ये देखील दर दिवशी तो अचानकपणे प्रकटू लागला आहे. गेल्या काही दिवसांत नवनव्या गावांमध्ये हे संसर्गाचा कोणताही आगापिछा नसलेले रुग्ण वाढू लागताच दैनंदिन पत्रकार परिषदा घेणार्‍या आरोग्य सचिव एकाएकी गेले काही दिवस गायब झाल्या, परंतु ह्या नव्या रुग्णांचा स्त्रोत सापडत नाही याचाच अर्थ केंद्र सरकारच्या व्याख्येनुसार हे सामाजिक संक्रमण ठरते. काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रांजळपणे याची कबुली दिली हे योग्य झाले. अद्याप ते प्राथमिक अवस्थेत आहे आणि वेळीच त्यावर नियंत्रण मिळवले नाही, तर त्याचा प्रसार वणव्यासारखा होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे हे सामाजिक संक्रमण आहे हे मान्य करून आता सरकारला त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अधिक आक्रमकपणे पावले टाकावी लागतील.
सुरवातीला गावोगावी नवनवे रुग्ण सापडत असताना ते राज्याच्या इतर भागांत आढळून देखील मांगूरशी संबंधित असल्याचे आरोग्य खाते सांगत आले होते, परंतु त्यानंतर सरकारच्या परिभाषेत नव्या ‘आयसोलेटेड’ रुग्णांचे सत्र सुरू झाले आणि ते दिवसागणिक वाढतच चालले आहे. राज्यातील कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येने आता हजाराचा टप्पा गाठला आहे. खुद्द मांगूरमधील रुग्णसंख्येएवढेच रुग्ण मांगूरबाहेर मिळण्याची चिन्हे आहेत. मांगूरमध्ये शुक्रवारपर्यंत कोरोनाचे २७० रुग्ण होते, तर मांगूरशी संबंधित रुग्णसंख्याही दोनशेच्या दिशेने झेपावताना दिसत होती. त्याचवेळी राज्याच्या विविध भागांत आढळून येत असलेल्या ‘आयसोलेटेड केसेस’चे प्रमाण देखील शंभरी पार करून गेल्याचे दिसून येते. ही सगळी आकडेवारी एवढ्या तपशिलाने देताना किंवा तिचे वेगवेगळ्या प्रकारे विश्लेषण करताना त्यामागील आमचा हेतू जनतेला घाबरवण्याचा मुळीच नाही. उलट आपल्या अवतीभवती नेमके काय घडते आहे ते सत्य तिला कळावे आणि ती अधिक सतर्क व्हावी, जागरूक व्हावी हाच आमचा उद्देश आहे. सरकारची देखील हीच भूमिका असायला हवी.
मांगूर, मोर्ले, चिंबल आणि वास्कोनंतर आता सालसेल हे कोरोनाचे एक केंद्र बनताना दिसते आहे. कुडतरीत शुक्रवारपर्यंत कोरोनाचे ३१ रुग्ण होते. आंबेलीत २४, लोटलीत ११, नावेलीत ३ आणि खुद्द मडगावात १६ रुग्ण होते. म्हणजे सालसेतमधील रुग्णसंख्याच ८५ पर्यंत पोहोचली आहे आणि दिवसागणिक ती वाढत चालली आहे. हा संसर्ग वाढण्यास मुख्यत्वे एक धर्मगुरू कारणीभूत असल्याचे अनुमान आहे, परंतु सालसेतमधील या संसर्गाचा संबंध शेवटी मांगूरशीच पोहोचतो का की विदेशांतून परतलेल्यांचे त्यात योगदान आहे हे कोडे आहे.
गोव्याच्या इतर भागांमध्ये जे रुग्ण आढळून येत आहेत, त्यांच्यामागे मुख्यतः आरोग्य खाते, पोलीस, कदंब कर्मचारी यांच्यातील संसर्ग कारणीभूत असावा अशी दाट शक्यता वाटते. मुख्यमंत्र्यांनी नुकतीच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची बैठक घेऊन समाजामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन होते आहे ना, लोक मास्क घालत आहेत ना हे पाहण्याची जबाबदारी पोलिसांवर सोपवली, परंतु प्रत्यक्षात गेल्या काही दिवसांत अनेक पोलिसांनाच कोरोनाची बाधा झाल्याचे आणि त्यांच्यामार्फत त्याचा फैलाव झाल्याचे आढळून आलेले आहे. कंटेनमेंट झोनमध्ये आपले कर्तव्य बजावणार्‍या पोलिसांची पोलीस महासंचालक जसपालसिंग यांनी स्वतः तेथे जाऊन भेट घेतली हे कौतुकास्पद आहेच, परंतु त्या पोलीस कर्मचार्‍यांना संसर्ग होऊ नये यासाठी त्यांना पीपीई आवरणे देणेही तितकेच गरजेचे आहे. तीच गोष्ट आरोग्य कर्मचार्‍यांची. कोविड रुग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टर आणि परिचारिकांना पीपीई किटस् दिली गेली आहेत, परंतु या रुग्णांची प्रत्यक्ष हाताळणी करणार्‍या इतर कर्मचार्‍यांच्या सुरक्षेचे काय? त्यांच्याही संरक्षणाची तितकीच काळजी सरकारने घ्यायला हवी.
येत्या १ जुलैपासून केंद्र सरकार आपल्या रणनीतीनुसार अनलॉक २.० ची अंमलबजावणी करण्यास राज्यांना सांगणार आहे. गोवा सरकार देखील पर्यटन सुरू करण्यास फार उतावीळ दिसते. येथे राज्याच्या नागरिकांपुढे कोरोनाने आ वासलेला असताना पर्यटकांसाठी पायघड्या कसल्या घालता आहात?
काल बारावीचा निकाल जाहीर झाला. पुढील आठवड्यामध्ये जीसीईटी परीक्षा व्हायच्या आहेत. दहावी – बारावीच्या परीक्षा घेतल्या त्यापेक्षा अधिक काटेकोर शिस्तीमध्ये या परीक्षा घ्याव्या लागतील, कारण मे महिन्याच्या अखेरीस जी परिस्थिती होती, त्याहून अधिक चिंताजनक परिस्थिती आज आहे. महाविद्यालये आणि व्यावसायिक महाविद्यालयांमधील प्रवेशाची प्रक्रिया आता सुरू होईल. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन होऊन विद्यार्थ्यांना घरबसल्या प्रवेश मिळवता आला पाहिजे. प्रवेशासाठी पर्वरीत तंत्रशिक्षण विभागामध्ये रांगा लावण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत.
राज्यातील कोरोनाची एकूण रुग्णसंख्या हजाराचा आकडा पार करून चालली असताना गेल्या काही दिवसांत एकाएकी रुग्ण बरे होण्याची जादूही घडू लागलेली दिसते. एकेक दिवस तर जेवढे नवे रुग्ण सापडत आहेत, त्यापेक्षा अधिक लोक ‘बरे होऊ’ लागले आहेत. गेल्या आठवड्याभरातच एकाएकी दोनशेहून अधिक रुग्ण रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्यांची एकूण संख्या ३०० वर आहे. हे रुग्ण आता एकाएकी खरोखर एवढ्या झपाट्याने बरे होऊ लागले असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे, परंतु लक्षणविरहित रुग्णांची चाचणी न करता त्यांची थेट घरी रवानगी करण्याच्या नव्या एसओपीमुळे हे घडत असेल तर मात्र त्यातील धोक्यांची जाणीवही सरकारने जरूर ठेवावी. कोरोना हा तीव्र संसर्गजन्य आजार आहे. त्याची साखळी तोडणे हाच त्याला अटकाव करण्याचा एकमेव मार्ग आहे!

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

सत्तांतर

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अधिकृतपणे ज्यो बायडन यांच्या हाती आली आहेत. आपल्या निरोपाच्या भाषणात मंगळवारी ट्रम्प यांनी बायडन यांच्या...

मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी लांबणीवर

>> मुख्यमंत्र्यांची माहिती, मंत्रिमंडळ बैठकीत विविध विषयांवर चर्चा राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत राज्यात नवीन मोटर वाहन कायद्याच्या अंमलबजावणीबाबत दुसर्‍यांदा...

समविचारी पक्षांशी युतीबाबत राष्ट्रवादी पक्षाची चर्चा सुरू

>> शरद पवार यांची माहिती गोवा विधानसभेच्या आगामी निवडणुकीत भाजपला जोरदार टक्कर देण्यासाठी, स्थिर सरकार देण्यासाठी कॉंग्रेस पक्ष आणि...

बुधवारी कोरोनाचे ८७ रुग्ण

राज्यात चोवीस तासांत नवीन ८७ कोरोना रुग्ण आढळून आले असून एकाही कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या...

१८ हजार डोसांचा दुसरा साठा राज्यात दाखल

गोव्याला कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लशीच्या १८ हजार डोसांचा दुसरा साठा काल मिळाला आहे. राज्यात कोरोना लसीकरणाची दुसरी फेरी शुक्रवार २२ व शनिवार...

ALSO IN THIS SECTION

सत्तांतर

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अधिकृतपणे ज्यो बायडन यांच्या हाती आली आहेत. आपल्या निरोपाच्या भाषणात मंगळवारी ट्रम्प यांनी बायडन यांच्या...

ध्यासपंथी

देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती…वाळवंटातुनी सुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती --बा. भ. बोरकर जीवनभर एखादा ध्यास घेऊन वावरणार्‍या व्यक्ती...

‘गोवा माईल्स’ वाचवा

गोवा पर्यटन विकास महामंडळाची ‘गोवा माईल्स’ ही ऍप आधारित लोकप्रिय टॅक्सीसेवा राज्यातील इतर टॅक्सीवाल्यांच्या डोळ्यांत सतत खुपत आली आहे. काहीही करून ती...

भाषावाद का?

गोव्यामध्ये कोकणी - मराठी भाषावादाची भुतावळ पुन्हा उकरून काढण्याचा प्रयत्न काही घटकांकडून सध्या पद्धतशीरपणे चाललेला दिसतो. दूर दिल्लीतून आधी याची चूड दाखवली...

मागणी मान्य

अखेर मेळावलीवासीयांची मागणी मान्य झाली. त्यांनी स्थानिक आमदार विश्वजित राणे यांना नमवले. विश्वजितनी सरकारला नमवले आणि मेळावलीतून आयआयटी प्रकल्प अन्यत्र हलविण्यास सरकार...