साधनेतून जीवनविकास साधा!

0
18
  • डॉ. सीताकांत घाणेकर

योगसाधना- ५७७, अंतरंगयोग- १६२

आपल्या दैनंदिन जीवनात कितीतरी व्यक्तींचा संबंध येतो. कुटुंबात, समाजात, ऑफिसात, कार्यक्रमांत… प्रत्येक व्यक्ती वेगळी. बहुतेकवेळा आपण त्यांचे दोषच बघतो. साहजिकच आहे म्हणा, कारण ते वागतातच तसे. आम्ही काही शांत राहणारे भगवान बुद्धासारखे महापुरुष नाही. म्हणूनच त्यासाठी नियमित, दरक्षणी साधनेची आवश्यकता असते.

विश्‍वाकडे नजर फिरवली, थोडासा विचार आणि चिंतन केले, अभ्यास केला की लगेच आपल्या लक्षात येते- येथे विविध प्रकारच्या शक्ती आहेत- बाह्य व आंतरिक. प्रत्येक क्षेत्राच्या शक्ती वेगळ्या- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, विद्युतशास्त्र, अणुऊर्जाशास्त्र… आणि हल्लीचे अत्यंत झपाट्याने प्रगतीकडे घोडदौड करणारे विद्युतकणशास्त्र (इलेक्ट्रॉनिक्स). त्याशिवाय विश्‍वाच्या उत्पत्तीपासून असलेले गुरुत्वाकर्षणशास्त्र. ही सर्व बाह्य- भौतिक शास्त्रे. या शास्त्रांची प्रगती प्रत्येक देशात झालीच आहे; पण पाश्‍चात्त्य देशांत जास्त झाली.

आंतरिक शक्ती म्हणजे मानसिक, भावनिक, बौद्धिक व आध्यात्मिक. या शक्तींवर अनादिकालापासून नेत्रदीपक संशोधन झालं ते फक्त भारतात. म्हणूनच आम्हाला विविध शास्त्रे उपलब्ध झाली- वेदशास्त्र, आयुर्वेदशास्त्र, योगशास्त्र वगैरे. आपल्या पूर्वजांनी, ऋषी-महर्षींनी हे सर्व ज्ञान अत्यंत कष्टाने मिळवले व आपल्यासमोर ठेवले.

भौतिकशास्त्र स्थूल असल्यामुळे ते समजण्यास व वापरण्यास सोपे-सुलभ होते; पण आपल्याकडची आंतरिकशास्त्रे सूक्ष्म असल्यामुळे ती समजणे, अभ्यास करणे जरा कठीण होते. बहुतेककरून सामान्य व्यक्तींनीही थोडा नियमित, प्रामाणिक प्रयत्न योग्य दिशेने केला तर ती शास्त्रेदेखील समजू-उमजू लागतात. फक्त गरज आहे ती शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकण्याची व तीदेखील योग्य सद्गुरूच्या मार्गदर्शनाखाली.

यांतील एक अत्यंत प्रभावी शास्त्र म्हणजे योगशास्त्र. पाच हजार वर्षांपूर्वी सुरुवात झालेले व पदोपदी विकसित झालेले हे शास्त्र. यातदेखील स्थूल बहिरंगयोग (भ्रम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार) आहे. त्याचबरोबर अंतरंगयोग (धारणा, ध्यान, समाधी) आहे. या अंतरंगयोगाच्या सदराखाली आपला अभ्यास अनेक वर्षे चाललेला आहे.

कसलीही शक्ती असली तरी तिचा सदुपयोग व्हावा ही विधात्याची प्रामाणिक इच्छा असते. पण माणसाच्या विचित्र स्वभावामुळे यांचा दुरुपयोग होण्याचीदेखील शक्यता असते. हल्लीचेच उदाहरण बघितले तर ही गोष्ट सहज लक्षात येईल. उदा. अणुशास्त्र. खरे म्हणजे भारतात हे शास्त्र विकसित झालेच होते; पण मधल्या काळात याचा विसर पडला. पाश्‍चात्त्य देशांत मात्र त्याचा अभ्यास झाला व हळूहळू प्रगती झाली. वैज्ञानिकांची अपेक्षा होती की या शास्त्राचा उपयोग समाजकल्याण व विकासासाठी व्हावा आणि तसा झालादेखील. आतासुद्धा होत आहे. उदा. विद्युत उत्पत्ती, वस्तू निर्जंतुक करणे, कर्करोगावर उपाय. पण दुर्दैवाने १९४२ मध्ये दुसर्‍या जागतिक महायुद्धात अमेरिकेने जपानातील हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकला. महाभयंकर विद्ध्वंस झाला. अपरिमित प्राणहानी झाली. वातावरण प्रदूषित झाले. अनेकांना अनेक रोगांनी पछाडले. कर्करोगाने ग्रासले. आजदेखील तिथे अनुकंपनामुळे भयानक रोग होत आहेत.
भारताच्या इतिहासातदेखील अशा शक्तीचा दुरुपयोग अनेकवेळा झालेला दिसतो. अशा व्यक्तींना दुष्ट, स्वार्थी, आत्मकेंद्रित राक्षस म्हटले पाहिजे. घोर तपश्‍चर्या करून भगवंताकडून हे राक्षस शक्ती मिळवत असत व स्वतःच्या राज्यविस्तारासाठी किंवा अन्य अनैतिक कारणांसाठी वापरत असत. आपली महाकाव्ये- रामायण, महाभारत, पुराण या अशा गोष्टींची साक्ष आहे. अशावेळी सज्जनांच्या रक्षणासाठी भगवंताने वेळोवेळी वेगवेगळे अवतार धारण केले. अनेकवेळा नारीशक्तीला आवाहन करून त्यांच्याकडून अशा राक्षसांचा वध करण्यात आला.

या सदरात आपण नवरात्रीबद्दल चिंतन करीत आहोत. नवरात्री तर केव्हाच साजरी झाली; पण हे ज्ञान एवढे विस्तारित आहे की व्यवस्थित समजून घेण्यासाठी व समजावण्यासाठी वेळ लागतो. पण ते अत्यावश्यकही आहे.

आपल्या देशात आध्यात्मिक ज्ञान प्रतीक रूपात आहे. सर्वसामान्यांना सुलभ रीतीने समजण्यासाठी वेळोवेळी प्रतीकांचा वापर करण्यात आला आहे. नवरात्रीच्या वेळचे राक्षस म्हणजे दुसरे-तिसरे कुणी नसून आपले षड्‌रिपू व अहंकार आहेत. अष्टभुजादेवीची विविधरूपे म्हणजे आपल्या आत्म्याच्या अष्टशक्ती होय. संयम, समेट, सहन, सामावणे, परख, निर्णय, सामना, सहयोग- या सर्व शक्ती. यांपैकी आपण पहिल्या तीन शक्तींचा थोडा विस्ताराने विचार केलाच आहे. आता बघू सामावण्याच्या शक्तीविषयी. देवी संतोषीमॉं म्हणजे स्वीकार करण्याची शक्ती. दुसर्‍या व्यक्तींचा सर्व दोषांसह स्वीकार- त्यांना सामावून घेणे. ही शक्ती मनात रुजवण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतात. पहिल्या तीन शक्तींचा व्यवस्थित, समंजसपणे वापर केला तर ही शक्ती रुजवणे सोपे होईल.

आपल्या दैनंदिन जीवनात कितीतरी व्यक्तींचा संबंध येतो. कुटुंबात, समाजात, ऑफिसात, कार्यक्रमांत… प्रत्येक व्यक्ती वेगळी. बहुतेकवेळा आपण त्यांचे दोषच बघतो. साहजिकच आहे म्हणा, कारण ते वागतातच तसे. आम्ही काही शांत राहणारे भगवान बुद्धासारखे महापुरुष नाही. म्हणूनच त्यासाठी नियमित, दरक्षणी साधनेची आवश्यकता असते.

एका वाटीत अनेक दाणे असतात. प्रत्येकाचे अस्तित्व वेगळे असते. पण ते एकत्र राहतात. उदा. भात बनवताना तांदळाचे दाणे एकत्र राहूनच भिजतात. कारण ते एकमेकांचा स्वीकार करतात. मात्र आपणाला वेगवेगळी शरीरे, विविध नाती व संबंध, त्याचप्रमाणे विविध स्वभाव यामुळे एकत्र राहणे कठीण होऊन जाते. जास्तकरून थोडा निकटचा संबंध येऊ लागला की दुसर्‍या व्यक्तीचे आपल्याला दोष दिसू लागतात. मात्र सुरुवातीला सगळे चांगलेच दिसतात. म्हणूनच शास्त्रकार म्हणतात- ‘दुरून डोंगर साजरे’, ‘अतिपरिचयात अवज्ञा.’ येथे आध्यात्मिक ज्ञानाचा उपयोग करावा लागतो. आपले शारीरिक संबंध ः पालक-मूल, शिक्षक-विद्यार्थी, मालक-नोकर, पती-पत्नी, भाऊ-बहीण… हे न बघता आपण सर्व आत्मे आहोत. एकाच परमात्म्याची संतान आहोत असा विचार करायला हवा. मग कसलाच भेदभाव राहत नाही- वंश, राष्ट्र, रंग, भाषा, संस्कृती, वय, लिंग, स्थिती, परिस्थिती… आपल्या वैदिकांची हीच तर घोषणा होती- ‘वसुधैव कुटुंबकम्‌|’ ही कल्पनाच किती हृदयगम्य आहे. म्हणूनच त्यांची दुसरी घोषणा- कृण्वन्तो विश्‍वं आर्यम्- तितकीच महत्त्वाची आहे (आर्य- जातीवाचक शब्द नसून गुणवाचक शब्द आहे).
त्यामुळेच संत व महापुरुष विश्‍वात सर्वांना आत्मज्ञान देण्यासाठी फिरले. ज्ञानेश्‍वर महाराज तर म्हणतात ः ‘जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी सांगावे| शहाणे करुनी सोडावे सकल जना॥ हे त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे सांगितले, पण अत्यंत कष्ट व वेदना सोसून पण जग शहाणे झाले की नाही माहीत नाही. आपली तेवढी योग्यताही नाही. पण आपले अल्पज्ञान इतरांना वाटले तर आपलाच फायदा होतो. स्वतःमध्ये बदल होतो. आध्यात्मात हेच अपेक्षित आहे.

जगातील अनेक संस्था त्यांच्या अनुशालांतर्फे हा प्रयत्न नियमित विनामूल्य करतात. फक्त इच्छा असावी लागते ती स्वतःच्या जीवनविकासाची, जीवनमुक्तीची.
माऊंट आबू येथे स्थित असलेल्या त्यांच्या हजारो केंद्रांतून हे ज्ञान ते देत आहेत. त्याचा आपणही थोडा फायदा करून घेऊ…
(संदर्भ ः प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्‍वविद्यालय यांचे साहित्य)