साधनसुविधा उभारून चित्रपट उद्योगाला चालना देणार

0
5

>> मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन; १३व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

राज्यात चित्रपट उद्योगाला चालना देण्यासाठी गोवा मनोरंजन संस्थेच्या माध्यमातून आवश्यक साधनसुविधा उपलब्धतेचा प्रयत्न केला जात आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना काल केले. मृणाल कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सहेला रे’ या चित्रपटाच्या प्रिमिअर स्क्रिनिंगने १३व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाला प्रारंभ झाला.

राज्यात चित्रीकरणासाठी योग्य वातावरण आहे. सरकारकडून मराठी आणि कोकणी चित्रपटांच्या निर्मितीसाठी साहाय्य केले जात आहे. राज्यात चित्रपट उद्योगाला प्रोत्साहन दिले जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्य सरकारकडून कोणतीही मदत नसताना गेली १३ वर्षे गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करणारे शेट्ये बंधू कौतुकास पात्र आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

या चित्रपट महोत्सवात जगप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. प्रेमानंद रामाणी यांच्या जीवनावर आधारित ‘ताठ कणा’ या चित्रपटाचे सादरीकरण केले जाणार आहे. हा चित्रपट युवा वर्गासाठी प्रेरणादायी ठरू शकतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले. या उद्घाटन सोहळ्यात गजेंद्र अहिरे यांच्या स्टोरी टेलर या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

निवेदिता सराफ यांनी स्वीकारला पुरस्कार
या चित्रपट महोत्सवात प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांनी जीवनगौरव कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिनेते अशोक सराफ यांची प्रकृती ठीक नसल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांनी हा पुरस्कार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते स्वीकारला.