मोबाईल चोरी प्रकरणात अटक केलेल्या दोन संशयित आरोपींकडून सुमारे 3.50 लाख रुपये किमतीचे 10 मोबाईल फोन हस्तगत करण्यात पणजी पोलिसांनी यश मिळविले आहे. गेल्या 21 ऑगस्ट रोजी ताळगाव चर्चजवळील रस्त्यावरून चालत जाणाऱ्या गंगा राम कुमार याचा मोबाईल फोन एका दुचाकी वाहनावरून आलेल्या व्यक्तीने हिसकावून पलायन केले होते. याबाबत 23 ऑगस्ट रोजी पणजी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारदाराने मोबाईल फोन हिसकावून पलायन केलेल्या भामट्याची सविस्तर माहिती दिली. त्याने वाहनाचा क्रमांक टिपलेला नसला तरी, वाहनाच्या रंगाची माहिती दिली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना इंदिरानगर चिंबल येथील रेहान रझा मुल्ला (19) याला 23 ऑगस्ट रोजी अटक केली. रेहान मुल्ला याच्याकडून विविध कंपन्यांचे आणि मॉडेल्सचे 6 मोबाईल फोन जप्त केले. तसेच, त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात कासिमसाब एम. बिजापूर (24, रा. इंदिरानगर चिंबल) याला 25 ऑगस्ट रोजी अटक केली. रेहान मुल्ला याने चोरलेले काही मोबाईल फोन कासिमसाब या व्यक्तीला विकले होते. पोलीस पथकाने त्याच्याकडून विविध कंपन्यांचे व मॉडेल्सचे 4 मोबाईल फोन जप्त केले.

