- डॉ. अनुजा जोशी
दिवसा लखलखीत उन्हाचा सोनपिवळा उत्सव व रात्री रुपेरी चांदण्याचा अमृत-महोत्सव अशा समृद्धीचा योग जुळवून देणारी शरद ऋतूतली, आश्विन महिन्यातली पौर्णिमा- कोजागरी पौर्णिमा! शरदाच्या उन्हेरी दिवसांतल्या उष्णतेला चांदण्याचा गारवा देणारी ही पौर्णिमा अर्थातच शरदाचं हे चांदणं तनासोबत मनालाही आरोग्यदायी असतं… कसं ते पाहूया.
नवरात्रीच्या सोनेरी टप्प्यावर हिरवागार वर्षाऋतू हळूहळू काढता पाय घेतो आणि शरद ऋतूच्या आगमनाची चाहूल देत ऊन तापू लागतं. पावसाची अवघी ओल उरात साठवलेलं हे शरदाचं चांदीसारखं ऊन. त्याच्या उन्हाचा घुमट आता भरजरी होत जातो. आकाशात चांदी नि जमिनीवर सोनं अशी ही किमया! हिरवी शेतं पिकून पिवळी होतात. कणसांत दाणा भरतो. हिरव्या रानावर पिवळ्या लाटा. लाल मातीत करड्या गवती वाटा. शेतात सोन्याचा साठा. पिकल्या शेतांचे सोनेरी पदर वाऱ्यावर झुळझुळताना दिसतात. आता सूर्य आपल्या बटव्यातून सोन्याच्या मोहरा उधळू लागतो. चंद्र आपल्या थैलीतून चांदीच्या नाण्यांचा वर्षाव करू लागतो. ही लयलूट अंगभर माखून घेत साक्षात एक पौर्णिमा सजते.
भर्जरी उन्हाचा घुमट/ उरात हिरवे सावट
शारद ऋतूचा डोलारा/ भरला उन्हाने गाभारा
उन्हाचे सोहळे प्रखर/ रात्रीला चांदणमखर
चांदणमहाली चांदवा/ मनाच्या अंगणी गारवा
पौर्णिमा सजते साजिरी/ तीच एक कोजागिरी
दिवसा लखलखीत उन्हाचा सोनपिवळा उत्सव व रात्री रुपेरी चांदण्याचा अमृत-महोत्सव अशा समृद्धीचा योग जुळवून देणारी शरद ऋतूतली, आश्विन महिन्यातली पौर्णिमा- कोजागरी पौर्णिमा! शरदाच्या उन्हेरी दिवसांतल्या उष्णतेला चांदण्याचा गारवा देणारी ही पौर्णिमा अर्थातच शरदाचं हे चांदणं तनासोबत मनालाही आरोग्यदायी असतं… कसं ते पाहूया.
आधुनिक भाषेत शरद ऋतू हा साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांचा कालावधी म्हणजे ‘ऑक्टोबर हिट्’चा काळ. आयुर्वेदाच्या भाषेत याला पित्तप्रकोपाचा काळ असं म्हणायचं. वर्षाऋतूत शरीरात साठलेल्या पित्तदोषाचा वाढत्या उन्हामुळे शरद ऋतूत प्रकोप होतो. रक्त-पित्तप्रकोपाचे आजार, विविध व्हायरल जंतुसंसर्गाच्या व्याधी उद्भवतात. अगदी साध्या अम्लपित्त, अपचन, उलटी- जुलाबापासून ते चेहरा व अंगावरील पिटिका, फोड, ॲबसेस्, मूळव्याध, पितांब अशा लहानमोठ्या रोगांच्या रूपात शरीरात पित्त व उष्णतेचा दाह निर्माण होतो. नाकातून, हिरड्यांतून रक्तस्त्राव, योनिगत रक्तस्त्राव, मूत्रविकार, काविळ, यकृतरोग, त्वचारोग, तोंड येणे असे रक्त, पित्तप्रकोपक, उष्णतेचे प्रकार व विकार दिसू लागतात. गोवर, कांजिण्या, सर्पिण, डोळे येणे इ. असंख्य व्हायरल व साथीच्या रोगांना आयुर्वेदाच्या दृष्टीने हा अनुकूल काळ असतो. पण चिंता नको! निसर्ग उष्णतेचा त्रास देतो म्हणून शीतल उपचार करायची जबाबदारीही तोच घेतो.
निसर्ग हा माय, पिता, पालक तर आहेच, शिवाय तो सर्वात मोठा वैद्यराजही आहे. ग्रीष्म ऋतूच्या कडक उष्णतेचा बंदोबस्त तो जसा आंबा, फणस, जांभूळ, करवंदं अशा विविध फळांच्या मधुर रसाने करतो, तशीच एक सुंदर योजना शरद ऋतूच्या उन्हाच्या त्रासासाठीही तो करतो. इथे केवळ आहार नव्हे तर विहाराचीही योजना असते. शरदाचा पित्तप्रकोप शांत करण्यासाठी त्याची ही अफलातून योजना म्हणजे शरदाचं चांदणं, दुधाळ चांदण्याची पौर्णिमा- कोजागरी पौर्णिमा! लक्षात येतंय का मी काय म्हणतेय ते? कोजागरीचं सर्वात शीतल चांदणं म्हणजे अर्थातच शरद ऋतूचं चांदणं हा ‘ऑक्टोबर हिट्’मुळे होणाऱ्या असंख्य जहाल व्याधींचा नैसर्गिक बंदोबस्त आहे.
कोजागरी पौर्णिमेला चंद्र आपल्या 16 कलांनी परिपूर्ण असतो. आपल्याला किती कौतुक त्याचं. किती वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याच्याकडे बघितलंय. ‘आकाशाच्या अंगणात खेळे चांदोबा’ अशा लडिवाळ बाळरूपापासून ते ‘चांदोमामा चांदोमामा भागलास का?’मध्ये मामाच्या मायेपर्यंत त्याचं व आपलं नातं जडलंय. ‘चंदाराणी का गं दिसतेस थकल्यावाणी’मध्ये तो चक्क राणीचं रूप घेतो. तो कधी चंद्रराज होतो. कधी चांदाई होतो. चांदोबाबा होतो. ‘चंद्र आहे साक्षीला’ म्हणत तो प्रेमी युगुलांचं प्रेयस होतो. कवींचं काव्य होतो. गायकांचं गाणं होतो. कलाकारांची कला होतो. श्रीमंती थाट होतो. गरिबांच्या झोपडीतला दिवा होतो. कष्टकऱ्यांच्या भाकरीचा चंद्र होतो. सुखदु:खात आशेचा चांदवा होतो. एक ना अनेक रूपं. चंद्र हा असा एकमेव जिवलग की जो सर्वांसाठी जवळच्या नात्याचा होऊन जातो.
खरं तर चंद्र हा पृथ्वीभोवती फिरणारा तिचा एकमेव नैसर्गिक उपग्रह. त्याला स्वत:चा प्रकाश नाही. तो सूर्याच्या प्रकाशामुळे रात्री पृथ्वीवरून रुपेरी चमकताना दिसतो. सूर्याचाच प्रकाश पण तो इतका अप्रत्यक्षपणे आपल्यापर्यंत येताना इतका पूर्ण बदलतो की चक्क शीतल होऊन जातो हे मोठंच निसर्गनवल! कोजागरीच्या दिवशी तो पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. त्याचा प्रकाश व लहरी त्या दिवशी पृथ्वीवर सर्वात जास्त प्रभावी असतात. कोजागरीला तो जणू अमृतवर्षावच करतो. त्या अमृताच्या चांदण्यात बसावं, फिरावं, सैर करावी, गप्पागोष्टी कथाकविता, नृत्य, गीत, संगीताची चांदणमैफल करावी. तो शीतल, दुधाळ प्रकाश जास्तीत जास्त माळून, माखून घ्यावा हा मुळातला हेतू. चंद्राला केशरी आटीव दुधाचा नैवेद्य दाखवायचा. दुधाला साखरेचा गोडवा. केशराचा रंग. वेलचीचा स्वाद. बदाम, पिस्ते, चारोळीची दाटसर रंगत-संगत. कौतुक करावं तेवढं थोडं. शिवाय हे रसरंगीत दूध चांदीच्या भांड्यात गरम गरम ओतायचं व त्यातच थंड होऊ द्यायचं. मग चांदीचा सूक्ष्म अंश दुधात उतरतो. मग चंद्राची पूजा करायची. आरती ओवाळायची. दुधाचं ते चांदीचं भांडं चांदण्यात ठेवायचं. आयुर्वेदात प्रवाळ, मोती अशा औषधं, गोळ्या, भस्मांना ‘चंद्रपुटं’ देण्याची ग्रंथोक्त पद्धत आहे. ठराविक संख्येच्या काही रात्री ती औषधं चांदण्यात ठेवली जातात. तसं या मधुर आटीव ‘मसाला दुधा’ला रात्रभर 1 चांदणपुट द्यायचं व तो ‘चंद्रनैवेद्य’ आनंदात प्यायचा. सगळं कसं भावपूर्ण व सोबतच आरोग्यदायीही. शरीरात वाढलेलं पित्त, दाह, जळजळ, उष्णता, लालिमा, रक्तस्त्राव इ. गोष्टींसाठी हे हितकारक. दूध, साखर, वेलची, केशरासोबत चांदी व या सर्वांसोबत शीतल चंद्रप्रकाश हे सारं ‘अधिकस्य अधिकं फलम्’ असं एकाहून एक सरस. एकमेकांचा शीत व बलकारक गुण एकमेकांच्या संगतीने वाढवणारं.
‘को जागरती’ म्हणजे ‘कोण जागा आहे?’ असं विचारत लक्ष्मी (काही ठिकाणी सरस्वती म्हणतात) रात्रभर सर्वत्र संचार करते. जो जागा असेल त्याला प्रसन्न होते. सुखसमृद्धीचा वर देते. तिची कृपादृष्टी चुकू नये म्हणून चांदण्यात बसून रात्रभर जागरण करावं अशी कोजागरीची पौराणिक कथा सांगतात. या कथेचा भावार्थ असा की, जो संवेदनशीलतेने, भावपूर्णतेने सुविचारांचं जागरण करेल, आरोग्यदायी आहार-विहार करेल, त्याच्यावर सरस्वती व लक्ष्मी दोन्ही प्रसन्न होतील व त्याला धनधान्य, सुख, शांतीप्रद आयुष्य लाभेल हा त्याचा मथितार्थ! कोजागरीचं जागरण म्हणजे आधुनिक काळातला केवळ मौजमजेचा इव्हेंट नव्हे. चमचमीत जेवणाची पार्टी व रंगीत रोषणाईमध्ये कविता, नाच, गाणी, वाद्य यांच्या जल्लोषात रात्रीची मद्यधुंद नशा म्हणजे कोजागरी नव्हे. ते केवळ जल्लोषात रात्रभर जागं राहणं नसून ती भावना, विचार व आरोग्याबद्दलची जागृती आहे हे लक्षात घ्यायला हवं.
विविध प्रांतांत कोजागरीच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. काही ठिकाणी ऐरावतावरचा इंद्र व लक्ष्मी यांची पूजा करतात. काही ठिकाणी इंद्र व सरस्वती, काही ठिकाणी विष्णू- लक्ष्मी पूजतात. चंद्राची आरती करतात. काही ठिकाणी कुबेराची पूजा असते. आणखी एक रूचकर प्रथा. कोजागरीला ‘नवान्न पौर्णिमा’ असंही म्हटलं जातं. या हंगामात शेतंभातं पिकून नवीन धान्य घरात आलेलं असतं. ते शिजवून त्या नवान्नाचा नैवेद्य, भाताची खीर असा नैवेद्य चंद्राला दाखवला जातो. शारद उन्हात, थंडी सुरू होण्यापूर्वीच्या ऋतुसंधीकालात जिवाला शांतता व सौख्यदायी अशा शारदीय आहार-विहाराच्या या आरोग्यदायी पद्धती, भावपूर्ण परंपरा व चालीरिती.
**********
कोजागरीच्या जागरणामागील भावपूर्ण विचारांचा आणखी एक महत्त्वाचा विषय माझ्या इथे नवीनच लक्षात येतोय तो म्हणजे ज्योतिषशास्त्राने अनुभवसिद्धतेतून सांगितलेलं ‘चंद्रबळ!’ हिंदू पंचांग व वैदिक ज्योतिषशास्त्राप्रमाणे जन्मपत्रिकेमध्ये जन्मराशीच्या संदर्भात असलेलं चंद्राचं स्थान, चंद्राची शक्ती, अनुकूलता याला ‘चंद्रबळ’ म्हटलं जातं. लग्नकार्य, विधी, शुभारंभ, विद्यार्जन, प्रवास, प्रकल्प इ.बाबत महत्त्वाचा निर्णय घेताना संबंधित व्यक्तीच्या जन्मराशीपासून गोचर चंद्र कोणत्या राशीत आहे ते तपासून, विशिष्ट स्थानांनुसार मोजदाद करून यशापयशाचे ठोकताळे बांधले जातात. कमी-जास्त चंद्रबळाचे फायदे-तोटे बरेचदा त्या हिशेबाप्रमाणे सांगितले जातात. हा सारा म्हटला तर कुंडलीचा गणिती हिशेब असतो, पण तो काम करतो भावनांवर, विचारांवर व त्याची सिद्धता होते प्रचितीतून व अनुभवांतून! म्हटलं तर हे सारं अतर्क्य पण बरेचदा तार्किक सुसंगतीही असणारं! असो. आपण त्या गुंत्यात न अडकता थोडक्यात ‘चंद्रबळ’ हे आपल्या आयुष्याचं भावसुंदर विचारांचं बळ आहे, मनोबळ आहे असं लक्षात घेऊ. आज जागतिकीकरणाने अत्याधुनिक झालेलं, यंत्रतंत्रांवर सुसाट धावणारं आपलं स्मार्ट जगणं साक्षात चंद्रावर अन् मंगळावर पोचल्यावर ग्रहताऱ्यांचे मानवी जीवनावर होणारे परिणाम अभ्यासणं आव्हानात्मक आहे. ज्ञान-विज्ञानाचे अपूर्व चमत्कार आपण केले. सूर्यमाला अभ्यासल्या. अवघं अंतराळ कवेत घेतलं. सागराचा तळ, पृथ्वीचा गाभा धुंडाळला. मानवी बुद्धीने सारी क्षेत्रं पालथी घातली. मानवी शरीराचा कण न् कण पाहिला. पेशी न् पेशी अभ्यासली. उत्क्रांतीच्या पायऱ्या चढत साध्या जगण्यावर सुसंस्कृतपणाचा कळस आपण आपल्या हाताने चढवला. पण हा सारा डोलारा ज्यावर उभा आहे, ते माणसाला ‘मानव’ बनवणारं ‘मन’ व ‘मानवी जीवन’ गुंफणारे मनामनांचे अदृष्य धागे यांची उकल मात्र आपल्याला सतत हुलकावणी देत राहिली आहे. असंख्य संशोधनं, प्रयोग झाले, होत आहेत. मानसशास्त्र विकसित झालं आहे. जगभरात मनोरोगांवर प्रभावी उपचार प्रणाली आल्या आहेत. पण तरीही त्या ‘विलक्षणी’ मनाचा मुळापासूनचा ठाव किंवा ‘आर या पार’ स्वरूपातली उत्तरं हाती आलेली नाहीत. मनामनांच्या धाग्यांमधलं बळ नेमकं कुठून येतं, कसं येतं, काही जोडायचं, काही तोडायचं, तारक, मारक कोणतंही काम ते नेमकं कसं करतं याची ठोस उत्तरं आधुनिक ज्ञान-विज्ञानाच्या हाती अजून नीटशी लागलेली नाहीत. पण यात एक अपवाद आहे. प्राचीन काळी भारतीय संस्कृती, परंपरांनी याचा कसून शोध घ्यायचा प्रयत्न केला. मनाच्या बळाला काही ठोकताळ्यांमध्ये बांधून त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. तेच हे दिसत असून, कळत असून, वळत असूनही अगम्य राहिलेलं मनाचं बळ म्हणजे साक्षात चंद्रबळ!
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मनाचा कारक आहे. मनाची कामं करणारा तो मनाचा कारक असा साधा अर्थ लक्षात घेऊ. मन, मनातल्या भावना, संवेदनशीलता, मन:शांती, मनाची स्थिरता, चंचलता, मनाची बरी-वाईट मानसिक स्थिती या सगळ्यांचा कारक चंद्र आहे. मानवी मन व चित्तवृत्तींना चंद्र प्रभावित करतो. मानवी मनोव्यापार व्यक्तीच्या याच ‘चंद्रबळा’वर बरे वाईट अवलंबून राहतात असं हे शास्त्र सांगतं.
चन्द्रमा मनसो जाताश्चक्षो सूर्यो अजायत।
श्रोत्राद्वायुश्च प्राणश्च मुखादग्निरजायत॥
ऋग्वेद व यजुर्वेदातील पुरुष सूक्तातील या श्लोकात विश्वाचे एक विराट शक्तीरूप/ विराट शक्ती/ विश्वात्मा/ परमात्मा असे कल्पिले आहे. त्यात ‘चंद्रमा मनसो जातः’ म्हणजे चंद्राची उत्पत्ती या विराट पुरुषाच्या मनापासून झाल्याचं म्हटलं आहे. ‘चक्षोः सूर्यो अजायत’ म्हणजे त्याचे डोळे (दृष्टी)पासून सूर्याचा जन्म झाला आहे.
‘श्रोत्राद्वायुश्च प्राणश्चः’ म्हणजे त्याच्या कानांपासून वायू व प्राण यांची उत्पत्ती झाली आहे. आणि ‘मुखादग्निरजायत’ म्हणजे त्याच्या मुखामधून, वाणीमधून अग्नीची उत्पत्ती झाली असा त्या श्लोकाचा अर्थ आहे. इथे चंद्राची उत्पत्तीच विश्वात्म्याच्या मनापासून झाली आहे असं मानल्यामुळे मनापासून निर्माण झालेला चंद्र हा अर्थातच मानवी मनाचाही कारक आहे असं मानलं आहे. मनोव्यापारांबरोबरच कमी-अधिक चंद्रबळाचे शारीरिक फायदे-तोटेही वर्णन केलेले आहेत व ते अनेकदा अनुभवसिद्धही ठरलेले आहेत. सतत काही शारीरिक व्याधी, डोकेदुखी, सतत सर्दी, नैराश्य, निद्रानाश, सतत ताणतणाव सोसत राहणं, मानसिक संतुलन बिघडणं हे कमी चंद्रबळामुळे घडू शकतं. चंद्र हा मातृत्वाचं, ममतेचं प्रतीक आहे. तो जलतत्त्वाशी संबंधित आहे. शरीरातल्या द्रवपदार्थांचं संतुलन, पचनक्रिया, झोप यात बिघाड निर्माण झाला असेल, तिथेही चंद्रबळ कमी असलेलं दिसतं. विचारांची स्पष्टता नसते, संवादाचा अभाव असतो, मन चंचल असतं. याउलट उत्तम चंद्रबळ असलेली व्यक्ती उत्तम मानसिक, भावनिक, आध्यात्मिक विकास झालेली, लेखक, कवी, कलाकार, मानसशास्त्रज्ञ इ. प्रकारची ज्ञान-कलासंपन्न, प्रतिभावंत असते. मानसिक आरोग्य उत्तम असतं. भावनिक स्थिरता व समतोल, प्रेमळपणा, मनमिळावूपणा, समंजस वृत्ती असते. सौम्य, शांत, संवेदनशील, आनंदी स्वभाव असतो. ताणात असली तरी शांत, संयमी राहणं जमतं. वैचारिक सुस्पष्टता असते. निर्णयक्षमता उत्तम असते. चेहऱ्यावर सात्त्विक तेज व लोकप्रियता लाभलेली असते. सामाजिक संवाद चांगला असतो. एकूण सर्व बाबतीत सकारात्मकता व तेज म्हणजे त्या व्यक्तीचं चंद्रबळ उत्तम असतं. अर्थात हे सारे ठोकताळे असल्यामुळे बुद्धिवादी पद्धतीने, सारासार विवेकाने, योग्य सल्ल्याने व मुख्य म्हणजे अतिशय तारतम्याने ज्योतिषशास्त्राच्या या मांडणीचा आपल्या समस्यांबाबत विचार केला पाहिजे. नव्या युगाच्या नव्या ताणतणावात्मक समस्यांची मुळं अशी खोलात गेलेली असू शकतात. आज जिकडे बघावं तिकडे पसरलेला विद्वेष, अहंकार, मदांधपणा, मत्सर, हेवेदावे, कलह, बुद्धिभ्रष्टता, विवेकशून्यता, मूल्यहानी, नैतिक अध:पतन, विविध प्रदूषणे, गुन्हेगारी अशा तमाम जळजळीत जंत्रीला चंद्रतत्त्वाच्या शांत, संयमी व स्थिर धारणेमुळे आपल्यापुरता लगाम घालता येऊ शकतो. आधुनिक तंत्रयंत्रयुगात आगीसारखा पसरणारा तनामनाचा विदाह शीतल चंद्रतत्त्वाने आपल्यापुरता सौम्य करता येऊ शकतो.
कुणी म्हणेल, हे सारं अमूर्त आहे. कल्पित आहे. भावात्मक आहे. असूदे ना. ते सर्व बाजूला ठेवून कोजागरीच्या चांदण्यात आपण घराबाहेर पडू तेव्हा कोजागरीचा चंद्र मात्र आपल्या माथ्यावर पूर्ण रूपात विलसताना दिसणार आहे तो तर खरा आहे ना? आटीव दुधासारखे चार रसरशीत आनंदाचे क्षण पदरात पडले की चांदण्याचा वर्षाव मनाला शीतलच जाणवणार आहे ना? चांदण्यातून मिळणारं चैतन्य, मनाची टवटवी खरी आहे ना? मग झालं तर! भावरम्य, विचारसुंदर अशी ‘साजिरी कोजागिरी’ ही याच साऱ्या ‘चंद्रजागरणा’चं प्रतीक आहे. तर मग उशीर नको. आजच्या कोजागरीलाच सकारात्मकतेचं जागरण करूया. विचारांचं व मनाचं ‘चंद्रबळ’ वाढवायला सुरुवात करूया. ‘को जागर्ति’ म्हणजे ‘कोण जागा आहे?’ या विश्वशक्तीच्या प्रश्नाला ‘मी जागा आहे, मी सकारात्मक आहे, मी चैतन्यरूप आहे’ असं उत्तर देण्याची स्व-जागृती निर्माण करूया!

