सागरी मार्गाने दहशतवादी भारतात घुसण्याचा प्रयत्न करू शकतात असे दिसून आल्याने सुरक्षेची तयारी म्हणून अशी मोहीम राबवली जाते. सागरी सुरक्षा सांभाळणार्या वेगवेगळ्या संस्थांना अशावेळी एकामेकाशी समन्वय साधून काम करण्याची संधी मिळते. गेल्या मे महिन्यामध्येही अशा कवायती घेण्यात आल्या होत्या. दरम्यान, कवायतींचा भाग म्हणून राज्यात ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली.
पेडण्यातही नाकाबंदीचे कवच
पेडणे तालुक्यातही ‘सागर कवच’ मोहिमेंतर्गत पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. राष्ट्रीय महामार्गावर यामुळे रांगा दिसून आल्या. पुढील तीन दिवस अशाप्रकारे तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पेडण्यात समुद्रकिनारी भागात, मुख्य रस्त्यावर पोलीस तैनात केले होते. पत्रादेवी येथे तसेच न्हंयबाग-सातार्डा येथेही वाहन तपासणी करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांनी सांगितले. दरम्यान, अचानकपणे नाकाबंदी व वाहन तपासणी पाहून लोक गोंधळून गेले होते.
हॉटेल व मंदिरात बॉम्ब
मडगावातही ‘सागर कवच’ कवायतीदरम्यान, दक्षिण गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलात व एका प्रसिद्ध मंदिरात प्रतीकात्मक बॉम्ब ठेवण्यात आला होता व तो शोधून काढण्याचे काम करण्यात आले. मंदिर व हॉटेल व्यवस्थापनाला बॉम्ब असल्याचे कुणीतरी फोनवरून सांगितल्यानंतर ते भयभीत बनले. हे सर्व ‘सागर कवच’अन्वये करण्यात येत असल्याचे नंतर सांगण्यात आले. तसेच पोलिसांनी या बॉम्बचा शोधही लावला. पंचतारांकित हॉटेलच्या शौचालयात गुप्तपणे हा प्रतीकात्मक बॉम्ब ठेवण्यात आला होता मात्र हॉटेलच्या सुरक्षा यंत्रणेला त्याबाबत शेवटपर्यंत काहीच माहित नव्हते. दरम्यान, कवायतींमध्ये सरकारी कार्यालये, हॉटेल्स, किनारे येथे तपासणी झाली.