साखळीत 87.56%, तर फोंड्यात 74.65% मतदान

0
9

>> मतदान प्रक्रिया शांततेत; 74 उमेदवारांचे भवितव्य मतपेट्यांत बंद

राज्यातील साखळी आणि फोंडा नगरपालिका निवडणुकीसाठी काल शांततेत मतदान पार पडले. साखळी पालिकेसाठी 87.56 टक्के आणि फोंडा पालिकेसाठी 74.65 टक्के मतदानाची नोंद झाली. या दोन्ही नगरपालिका क्षेत्रात निवडणूक रिंगणात असलेल्या 74 उमेदवारांचे भवितव्य मतपेट्यांत सीलबंद झाले आहे. साखळी पालिका क्षेत्रात मतदारांमध्ये उत्साह दिसून आला, तर साखळीच्या तुलनेत फोंडा पालिका क्षेत्रातील मतदारांमध्ये मतदानासाठी किंचित निरुत्साह दिसून आला.

दोन्ही नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी 32 केंद्रावर मतदान शांततेत पार पडले. फोंडा नगरपालिका क्षेत्रात सकाळी 8 वाजता मतदानाला प्रारंभ करण्यात आला. सकाळच्या सत्रात शांतीनगर, खडपाबांध मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून येत होत्या. उमेदवार आणि त्यांचे समर्थक मतदारांना मतदानासाठी आणण्यासाठी सक्रिय होते. फोंड्याचे आमदार तथा मंत्री रवी नाईक आणि भाजपचे सरचिटणीस नरेंद्र सावईकर यांनी खडपाबांध-फोंडा येथील केंद्रावर मतदान केले. मतदानाच्या काळात अनुचित प्रकाराची नोंद झाली नाही.
साखळी नगरपालिका क्षेत्रात 6070 मतदारांनी मतदान केले, तर फोंडा नगरपालिका क्षेत्रात 10,655 मतदारांनी मतदान केले. मतमोजणी येत्या 7 मे रोजी सकाळी 8 वाजल्यापासून संबंधित पालिका क्षेत्रात केली जाणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी सागर गुरव यांनी दिली.

साखळी पालिका क्षेत्रात गत 2018 च्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदानात 2.5 टक्क्यांनी वाढ नोंद झाली. साखळी नगरपालिकेच्या प्रभाग 12 मध्ये सर्वाधिक 96 टक्के आणि प्रभाग 2 मध्ये सर्वांत कमी म्हणजे 81.5 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. फोंडा नगरपालिकेच्या प्रभाग 1 मध्ये सर्वाधिक 81.03 टक्के आणि प्रभाग 9 मध्ये सर्वांत कमी म्हणजे 68.72 टक्के मतदान झाले, असेही गुरव यांनी सांगितले.

प्रत्येकाकडून विजयाचा दावा…
रायझिंग फोंडा पॅनलला नागरिकांकडून पाठिंबा मिळेल. या पॅनलचे उमेदवार बहुसंख्येने निवडून येतील, असा दावा केतन भाटीकर यांनी काल केला.

भाजप पॅनलच्या उमेदवारांना मतदारांकडून चांगला प्रतिसाद लाभला आहे. फोंडा नगरपालिकेमध्ये भाजप पुरस्कृत उमेदवार निवडून येतील, असा विश्वास कृषीमंत्री रवी नाईक यांनी व्यक्त केला.
साखळी आणि फोंडा या दोन्ही नगरपालिका क्षेत्रात भाजपने पाठिंबा दिलेले उमेदवार बहुसंख्येने निवडून येतील, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

साखळीतील सर्वच प्रभागांत 80 टक्क्यांच्या वर मतदान

साखळी नगरपालिका निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी काल मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडले. परिणामी साखळीत 87.56 टक्के मतदानाची नोंद झाली. प्रभाग 12 मध्ये विक्रमी 96 टक्के मतदान झाले. उर्वरित सर्वच प्रभागांत 80 टक्क्यांच्यावर मतदान काल सकाळी 8 वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. सकाळच्या सत्रात मतदारांमध्ये उत्साह दिसून आला, तो दुपारपर्यंत कायम राहिला. दुपारपर्यंत साखळी पालिकेसाठी 70 टक्क्यांच्या आसपास मतदान झाले होते. सर्वच प्रभागांत मतदारांचा उत्साह दिसून आला. साखळी पालिका क्षेत्रातील एकूण 6932 मतदारांपैकी 6070 मतदारांनी मतदान केले. त्यात 3001 पुरुष, तर 3079 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

एकूण 10 प्रभागांत 31 उमेदवार रिंगणात उतरले होते. भाजप पुरस्कृत पॅनल आणि टुगेदर फॉर साखळी यांच्यात तुल्यबळ लढत झाली. मतदानांतर दोन्ही गटांनी बहुमताचा दावा केला आहे. निर्वाचन अधिकारी रोहन कासकर, राजाराम परब व त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्तम कार्य केले. रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीस साखळी बहुउद्देशीय सभागृहात सुरुवात होणार असून, तासाभरात निकाल अपेक्षित आहे.

काँग्रेसचा नेता ताब्यात
साखळी पालिकेच्या प्रभाग 6 मध्ये एका काँग्रेस नेत्यास त्याच्याजवळील वाहनात 40 हजार रुपयांची रोख रक्कम सापडल्या प्रकरणी ताब्यात घेतले होते, अशी माहिती डिचोली पोलीस अधिकारी सूरज गावस यांनी दिली.


मतदार-उमेदवारांत बाचाबाची
एका प्रभागात मतदार व उमेदवार यांच्यात बाचाबाची झाली; मात्र नंतर सदर प्रकरण सामोपचाराने मिटवण्यात आले. हा प्रकार वगळता मतदानाची प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात पार
पडली.

उद्या 8 वाजल्यापासून मतमोजणी

दोन्ही पालिका निवडणुकीची मतमोजणी रविवार दि. 7 मे रोजी सकाळी 8 वाजल्यापासून केली जाणार आहे. फोंडा नगरपालिका निवडणूक मतमोजणी तिस्क फोंडा येथील सरकारी इमारतीच्या सभागृहात केली जाणार आहे, तर साखळी नगरपालिका निवडणूक मतमोजणी बहुउद्देशीय सभागृह साखळी येथे केली जाणार आहे. मतमोजणीस सुरुवात झाल्यानंतर एक-दोन तासांतच निकाल हाती येणार आहेत.