ख्यातनाम पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या कार्यक्रमाच्या गचाळ आयोजनाने गोमंतकीय रसिकांची तीव्र नाराजी ओढवून घेतलेल्या तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि एसएनके इव्हेन्टस् या दोन्ही संस्थांवर कारवाई करून कला अकादमीने सध्या गोव्यात मातलेल्या सांस्कृतिक बाजारूपणाला जबर चाप लावला आहे. कला अकादमीने घालून दिलेला कित्ता कला आणि संस्कृती संचालनालयानेही आता गिरवायला हवा. आशा भोसले यांच्या या कार्यक्रमात किती अनागोंदी झाली त्याचे सविस्तर वर्णन करणारे एका प्रेक्षकाचे पत्र नवप्रभेने नुकतेच प्रसिद्ध केले होते. या गैरव्यवहारांची तत्परतेने व गांभीर्याने दखल घेतल्याबद्दल कला अकादमीचे अध्यक्ष विष्णू सूर्या वाघ यांचे जनतेने अभिनंदन करायला हवे. आशा भोसले यांच्या कार्यक्रमाच्या आयोजनात अनेक बाबतींत गैरप्रकार झाले. अवघी १०३४ प्रेक्षक क्षमता असलेल्या कला अकादमीच्या खुल्या नाट्यगृहाधील या कार्यक्रमासाठी कितीतरी अधिक तिकिटे आणि प्रवेशिका छापण्यात आलेल्या होत्या. त्याबाबत कला अकादमीला पूर्ण अंधारात ठेवण्यात आले, प्रत्यक्ष कार्यक्रमावेळी परिणामांचा विचार न करता या प्रेक्षकांना गुरांसारखे प्रेक्षागारात कोंबले गेले.
कार्यक्रमाच्या ठिकाणी झालेली गर्दी लक्षात घेता आणि खुल्या प्रेक्षागाराचे एकंदर स्वरूप पाहता चेंगराचेंगरी झाली असती, तर असंख्य प्रेक्षक जिवाला मुकले असते आणि त्याचे खापर कला अकादमीवर आले असते, असे श्री. वाघ म्हणाले त्यात तथ्य आहे. आशा भोसले यांचा हा कार्यक्रम केवळ मराठी गाण्यांचा असताना जाहिरातींमधून कोठेही तसा उल्लेख केला गेला नव्हता. परिणामी महागडी तिकिटे काढून आलेल्या प्रेक्षकांची दारूण निराशा झाली. भोसले यांचा हा गोव्यातील पहिलाच कार्यक्रम असल्याने त्यांचे गोव्याच्या कानाकोपर्यातले चाहते या कार्यक्रमाला लोटतील, त्यांना तिकिटे मिळाली नाहीत तर ते गोंधळ घालतील याची कल्पना आयोजकांना असायला हवी होती. गोव्यात अलीकडे अशा भव्य दिव्य कार्यक्रमांचा घाट घालायचा, मोठ्या संख्येने प्रायोजक मिळवायचे, सरकारच्या सांस्कृतिक खिरापतीच्या वाहत्या गंगेत यथेच्छ हात धुवून घ्यायचे आणि प्रत्यक्ष कार्यक्रमावेळी गोंधळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन स्वतः दडून बसायचे हा प्रकार सर्रास दिसू लागला आहे. कार्यक्रमाच्या वेळी प्रेक्षकांचे काहीही होवो, त्याचे आयोजकांना काही सोयरसुतक दिसत नाही. त्यांचे खिसे भरले की काम संपले! सांस्कृतिक संस्थांचे जे पेव अलीकडे गोव्यात फुटले आहे, त्यांनी अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन हा निव्वळ बाजार करून टाकलेला आहे. बाहेरगावच्या बड्या कलाकारांना येथे बोलावले जाते ते त्यांच्यावरच्या प्रेमाखातर की त्यांच्या नावाचा वापर करून स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी असा प्रश्न त्यामुळे पडतो. कलाकारांनाही अशा कार्यक्रमांत सहभाग घेणे सोयीचे असते, कारण अन्यत्र कोठेही मिळणार नाही एवढी भरघोस बिदागी ते गोव्यात आकारू शकतात, कारण शेवटी आयोजक हा पैसा सरकारकडून मिळवणार आहेत, याची त्यांना पूर्ण कल्पना असते. त्यामुळे कलाकाराची पुण्यात एक बिदागी आणि गोव्यात त्याच्या चौपट बिदागी हा प्रकारही सर्रास दिसतो. सतत होणार्या या दिखाऊ सोहळ्यांमुळे सूत्रसंचालक ही मधाळवदनी जमातही गोव्यात नव्याने उदयाला आलेली आहे. गोव्यामध्ये प्रत्येकाचे मंत्र्यासंत्र्यापर्यंत हात पोहोचलेले असतात. त्यामुळे एखाद्या मंत्र्याला वा अधिकार्याला हाताशी धरायचे आणि सरकारी प्रायोजकत्व पदरात पाडून घ्यायचे हा तर नेहमीचा प्रकार झाला आहे. ही सांस्कृतिक लूट थांबवण्यासाठी आता मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या विषयात लक्ष घालावे. अशा इव्हेंटस्च्या आयोजनासंदर्भात आणि प्रायोजनासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे घालून द्यावीत आणि जी सांस्कृतिक खिरापत सध्या संस्कृतीचा व्यवसाय चालवलेल्या संस्थांना वाटली जाते आहे, ती तात्काळ बंद करावी. अनुदानित संस्थांनी स्मरणिका काढून पुन्हा सरकारी जाहिराती उकळायचा जो धंदा चालला होता, त्याला मुख्यमंत्र्यांनी गेल्या अर्थसंकल्पात चाप लावला. आता एकंदर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या प्रायोजनासंदर्भात निकष निश्चित केले गेले जावेत. एकीकडे सरकारला महसुलाची ददात असताना दुसरीकडे चाललेली ही वांझ उधळपट्टी थांबवावी आणि तो पैसा गोमंतकीय संस्कृतीच्या जोपासनेसाठी मूलगामी कार्य करण्यासाठी वापरावा. उत्सवी सोहळ्यांपेक्षा त्यातून काही भरीव निष्पन्न होऊ शकेल आणि सांस्कृतिक लुटारूंनाही कायमचा चाप बसेल!

