
कला-संस्कृती मंत्री दयानंद मांद्रेकर यांची घोषणा
कलाकारांचे आपल्या राज्यासाठी मोठे योगदान आहे. त्यांची दखल घेणे हे आमचे दायित्व आहे. कलाकारांनी कलेसाठी अनेक कष्ट काढलेले असतात, प्रसंगी अपमान त्यांच्या वाट्याला येतात. कलाकारांच्या कथाव्यथा समजून घेणे सरकारचे कर्तव्य आहे. कलाकार निर्माण करणारी संस्थाही महत्त्वाची असल्याने संस्थेसाठीही पुरस्कार योजना कार्यान्वित केली आहे. कलाकारांचे मानधन वाढवण्यासाठीही आपण प्रयत्नरत असून राज्य पुरस्काराची रक्कम एक लाखापर्यंत नेणार अशी घोषणा काल कला-संस्कृती मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी केली. कला आणि संस्कृती संचालनालयाने येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात काल आयोजित केलेल्या दिमाखदार सोहळ्यात २०१३-१४ चे राज्य सांस्कृतिक पुरस्कार विविध कला क्षेत्रात योगदान दिलेल्या पंधरा कलाकारांना श्री. बेनेगल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून मंत्री बोलत होते.
आपल्या भारतात वैविधता असून अनेक संस्कृतीचे जतन केले आहे. आणि हे सांस्कृतिक समृध्दी अद्वितीय अशी आहे. प्रत्येक भाषेची अंगभूत वैशिष्ट्ये असतात तशीच सांस्कृतिक वैशिष्ट्येही असतात. कलाकारांच्या योगदानाची दाखल घेणे ही अभिनंदनीय बाब आहे, असे प्रतिपादन ख्यातनाम सिने दिग्दर्शक, पटकथाकार शाम बेनेगल यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले.
रोख पन्नास हजार रुपये, शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते. व्यासपीठावर कला व संस्कृती सचिव फैझी ओ. हश्मी व कला व संस्कृती संचालनालयाचे संचालक प्रसाद लोलयेकर उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त मान्यवरात चंद्रकांत वेर्णेकर व विठ्ठल खांडोळकर (संगीत), एन्. शिवदास, श्रीमती मारिया आवरोरा कुतो, वास्को द रेगो, फर्नांडिस (साहित्य), शिवानंद पांडुरंग भट खेडेकर व महेंद्र चोडणकर (चित्रकला), बलवंत बाबुराव शिरगांवकर व प्रभाकर विठ्ठल गावकर (नाटक), जोसेफिना डायस, आंतोनेत मेंडिस, लॉरेन्सो फर्नांडिस- लॉरेन्स द तेरेखोल (तियात्र), नारायण अर्जुन हळदणकर (भजन), अजित पैंगीणकर (लोककला) यांचा समावेश होता. अलिकडेच दिवंगत झालेल्या बलवंत शिरगांवकर यांचा पुरस्कार त्यांच्या पत्नीने स्वीकारला.
उत्कृष्ट संस्था पुरस्कार १९४७मध्ये स्थापन झालेल्या व १५३ नाटकांची निर्मिती आणि ६०० वर प्रयोग सादर करुन सातत्याने रंगभूमीला योगदान दिलेल्या बांदिवडे येथील श्री नागेश महालक्ष्मी नाट्यसमाज संस्थेला एक लाख रुपयाचा उत्कृष्ट सांस्कृतिक संस्था पुरस्कार श्री. बेनेगल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
श्री. बेनेगल म्हणाले, चार दशकांपूर्वी आमचे कुटुंब परदेशात गेले; परंतु मी घरी कोकणी बोलतो. आमच्या केरळच्या कोकणीवर मल्याळम्चा, महाराष्ट्राच्या कोकणीवर मराठीचा व कर्नाटकात कानडीच्या बोलीचा प्रभाव आहे. पु. ल. देशपांडे यांनी कोकणी मराठीची बोली असा उल्लेख केला होता, परंतु मी त्याच्याशी सहमती दर्शविली नाही. भारतात छत्तीस हजार बोली आहेत परंतु प्रत्येकाने आपली अभिव्यक्ती जतन केली आहे. पुरस्कार प्राप्तांच्यावतीने महेंद्र चोडणकर, मारिया कुतो व नागेश महारुद्र नाट्यसंस्थेचे अजित केरकर यांनी मनोगत व्यक्त केले. चोडणकर म्हणाले, सरकार कलाकारांची काळजी घेते, त्यांना प्रोत्साहन देते ही गोष्ट त्यांच्यासाठी दिलासा देणारी आहे. गोवा शासनाच्या संस्कृती खात्याचे कार्य आदर्शवत आहे. केरकर यांनी, आपल्या संस्थेला मिळालेल्या पुरस्काराचे श्रेय पुर्वसुरिंनी संस्थेला दिलेल्या योगदानाला व पडद्यामागील कलाकारांना जाते असे सांगितले. मारिया कुतो यांनी, आपल्याला गोव्याने लिहायला स्फूर्ती दिल्याचे सांगितले व त्यामुळेच असे सन्मान प्राप्त झाले असे कृतज्ञतापूर्वक नमूद केले.
फैजी हश्मी यांनी स्वागत केले. सिध्दी उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले. प्रसाद लोलयेकर यांनी आभार मानले. या सोहळ्याला निमंत्रित पुरस्कार प्राप्तांचे नातेवाईक, हितचिंतक, मित्रमंडळी तसेच कला व संस्कृती खात्याने नेमलेले संगीत शिक्षक या सर्वांची मोठी उपस्थिती लाभल्याने अनेकांना अडीच तास उभे राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा लागला. त्यात अनेक मान्यवरही होते.
