23.8 C
Panjim
Friday, November 27, 2020

सांवल्यांचें गाणें

  • डॉ. सोमनाथ कोमरपंत

जास्तीत जास्त सुलभ शब्दांमधून भाषेचा गोडवा अनुभवायला लावणारी, अवतीभवतीच्या निसर्गाविषयी ओढ लावणारी, मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारी, शब्दकळेचे सौंदर्य आणि समर्थ अभिव्यक्ती असलेली ही कविता आहे. लयबद्धता हा तिचा मोठाच गुण आहे.

सांवल्यांचें गाणें
(जाति ः बालानंद)

तेजाचीं आम्ही बाळें
रूप जरी अमुचें काळें!
लहान वा कोणी मोठीं!
ससेमिरा अमुचा पाठीं!
जनीं स्मशानीं कुठें तरी,
अशीं तरळतों पिशांपरी.

मेघांच्या काळ्या पंक्ती
निळ्या नभीं जेव्हां फिरती,
राक्षसरूपांना धरुनी
सिंधूच्या पृष्ठावरुनी
मंद मंद आम्ही फिरतों
निळ्या जळा काळें करितों!

पीतारुण संध्या बघुनी
वंदन दीर्घ करूं पडुनी!
मग येई रजनीमाई
पदराखालिं आम्हां घेई
चांदण्यांत अमुची माया
भुताटकी गमते हृदया.

पांढुरक्या तेजांतून
कुठें कुठें बसतों दडुन.
पांढुरक्या वाटेवरुनी
एकलेच फिरती कोणी,
लपत-छपत पाठुनि त्यांच्या
फिरत असूं आम्ही वेड्या!

पानांचे पसरुनि जाल
आणिक पारंब्या लोल
वट कोणी ध्यानस्थ बसे;
मंद अनिल त्या डुलवितसे.
मग अमुचीं रूपें डुलती
बाळांना बागुल दिसती!

जुनाट हे पडके वाडे,
पर्णहीन त्यांतिल झाडें
धवल चंद्रिका रंगविते;
आम्ही मग त्यांतील भुतें!
जर का कुणि चुकुनी आला
वाटसरू रात्रीमधला,
बघुनि विकट अमुचे चाळे
चरकुनि तो मागेंच वळे!

प्रेमस्थळ अमुचें एकः
त्यासाठी विसरुनि भूक,
दाहि दिशांमागुनि फिरणें
जीवाभावानें जपणें!
ही अमुची वेडी प्रीत
झिडकारा मारा लाथ.

  • अनंत काणेकर

‘महाराष्ट्र-रसवंती’च्या तिसर्‍या भागात ‘कल्पनाविलास’ या गटात अनंत काणेकरांच्या या कवितेचा समावेश केलेला आहे. साधारणतः कुमारवयीन संवेदनक्षम मुलांना भावणारी ही कविता आहे. कारण त्यांचे भावविश्‍वच मुळी कवितेत वर्णन केलेल्या भावस्थितीला मिळते-जुळते आहे. स्वप्नाळू वयात नव्या नव्या कल्पनांचे पंख फुटण्याचे हे वय. जास्तीत जास्त सुलभ शब्दांमधून भाषेचा गोडवा अनुभवायला लावणारी, अवतीभवतीच्या निसर्गाविषयी ओढ लावणारी, मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारी, शब्दकळेचे सौंदर्य आणि समर्थ अभिव्यक्ती असलेली ही कविता आहे. लयबद्धता हा तिचा मोठाच गुण आहे. ही लय कानात आणि मनात भिनत जाणारी आहे. अशा प्रकारच्या नादानुकारी शब्दांच्या वाचनाने- श्रवणाने- मननाने सृजनात्मक शक्तींचे पोषण होते. ही प्रक्रिया संस्कारक्षम वयातच घडावी लागते. अमूर्त अशा सावल्या आपल्या अवतीभवती असतात. पण त्या गाणे गातात. ही कल्पनाच किती आल्हाददायी आहे!
अनंत काणेकर मराठी साहित्यजगताला लघुनिबंधकार म्हणून जेवढ्या प्रमाणात ज्ञात आहेत; तेवढ्या प्रमाणात कवी म्हणून ज्ञात नाहीत. याचे कारण साहजिक आहे. महाविद्यालयीन जीवनापासून ते कवितालेखन करतच होते. ‘चांदरात आणि इतर कविता’ या कवितासंग्रहामुळे एकेकाळी त्यांनी रसिकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांच्या गीतस्वरूप कविता ज्योत्स्ना भोळे यांनी समरसून गायल्या होत्या. काही गीते रंगभूमीवर आणि रजतपटावरही गाजली होती. त्यांचे कवितालेखन खंडित झाले. लघुनिबंध, प्रवासवर्णने इत्यादी वाङ्‌मयप्रकारांकडे त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले. त्यांच्या कवितेच्या रसिकांचा निरोप घेताना त्यांनी म्हटले, ‘‘आजूबाजूच्या जगाकडे पाहिल्यानंतर ज्या वस्तुनिष्ठ भावना किंवा कल्पना माझ्या मनात उत्पन्न होतात, त्या गद्यात मी चांगल्या तर्‍हेने व्यक्त करू शकेन किंवा त्यांपैकी ज्या काव्यात व्यक्त करण्यासारख्या असतील, त्या व्यक्त करण्याचे नवीन माध्यम मला अजून सापडत नसेल.’’ सुदैवाने प्रा. काणेकरांचे प्रिय विद्यार्थी व मराठीतील नामवंत समीक्षक प्रा. रमेश तेंडुलकर यांच्या प्रयत्नांमुळे रसिकांना ‘चौकोनी आकाश’ गवसले आणि काणेकरांच्या प्रतिभासामर्थ्याचा, पुनर्प्रत्ययाचा आनंद घेता आला. वृत्तिगांभीर्य आणि नर्मविनोद या त्यांच्या प्रतिभाधर्माच्या दोन्ही रूपकळा तेवढ्याच सामर्थ्यानिशी येथे प्रकट झाल्या आहेत.

‘सांवल्यांचें गाणें’ या कवितेच्या अंतरंगात प्रवेश करताना आपण आगळ्या-वेगळ्या आनंदविश्‍वात शिरत आहोत याची जाणीव लगेचच होते. या कवितेचा तोंडवळाच मुळी बालसुलभ मनाचा आहे. सावल्या हितगूज करताना म्हणतात, ‘‘आमचे रूप जरी काळे असले तरी आम्ही तेजाची बाळे आहोत.’’ ‘तेजाची बाळे’ ही समर्पक प्रतिमा वाटते. कारण प्रकाश आहे म्हणूनच सावल्या निर्माण होतात. अनेकांना सावल्या अचेतन वाटतात. पण त्या सचेतन असतात. कुणी लहान असो वा मोठा असो, त्यांच्या मागोमाग जाऊन त्या सारखा पाठलाग करत असतात. ‘जनात असो वा विजनात असो पिशांपरी आम्ही तरळतो’ असे सावल्या सांगतात.

दुसर्‍या कडव्यात कल्पनेची उत्तुंग झेप आढळते. सावल्या म्हणतात, ‘‘मेघांच्या काळ्या मालिका जेव्हा निळ्या नभात फिरतात, त्यावेळी राक्षसरूप धारण करून समुद्राच्या पृष्ठभागावरून आम्ही मंदगतीने फिरतो; निळ्या जळाला आम्ही काळी रूपकळा देतो. पर्जन्यकालीन मेघांचे आणि त्यांच्या दाट सावल्यांचे हे किती प्रत्ययकारी वर्णन आहे!’’
सावल्या सांगतात, ‘‘पिवळ्या आणि आरुण रंगाची संध्या पाहून नतमस्तक होऊन आम्ही दीर्घ वंदन करतो. मग रजनीमाता येते. आम्हाला पदराखाली घेते. चांदण्यात आमची माया प्रकट होते. अनेकांच्या मानसांत ती भुताटकीच आहे की काय असा भास व्हायला लागतो.
कधीकधी पांढुरके तेज दिसते, तिथे कुठे कुठे आम्ही दडून बसतो. पांढुरक्या वाटेवरून एकुलते एक कुणीतरी फिरते, अशावेळी लपत-छपत त्यांच्या पाठीमागून उगाचच आम्ही फिरत असतो.’’
कवीने सुंदर निसर्गचित्र या कडव्यात उभे केले आहे आणि त्याद्वारा सावल्यांचे मनोगत ऐकविले आहे. पानांची जाळी पसरली आहे… पारंब्या वरपासून खालपर्यंत लोंबताहेत… कुणी एक भव्य वटवृक्ष ध्यानस्थ बसलेला आहे… मंद वारा त्याला आपल्या लयीत डुलवीत आहे. ‘‘अशा वेळी होते काय! आमच्या रूपकळा त्यांच्या समवेत डुलायला लागतात. अशावेळी बालकांना काय वाटतं माहितेय…? त्यांना बागुलबोवा दिसायला लागतो!’’
कुठेतरी जुनाट, पडके वाडे असतात… त्यांच्या सान्निध्यातील झाडे पर्णहीन असतात… आसमंतात धवल चंद्रिका अशावेळी रंग भरते… हलणार्‍या स्वरूपातील आम्ही मग भुते म्हणून गणलो जातो… रात्रीच्या वेळी फिरणारा पांथस्थ अचानक तिथे आला तर आमचे विकट चाळे बघून भयचकित होतो… चरकून तिथून काढतापाय घेतो.

कवीने निर्जन प्रदेशाचे आणि तेथील सावल्यांचे… त्यातून निर्माण होणार्‍या भीतिग्रस्त वातावरणाचे चित्र हुबेहूब रंगविले आहे.
कवितेच्या शेवटच्या कडव्यात काहीसे वेगळे वळण मिळाले आहे. या सावल्यांपाशीदेखील सांगण्यासारखे खूप आहे. त्या म्हणतात, ‘‘आमचे प्रेमस्थळ एकच आहे. त्यासाठी आम्ही तहान-भूक विसरतो. दहा दिशांमागून फिरणे आणि जीवाभावाने एकमेकांस जपणे हे आम्ही हृदयाशी जपलेले प्रेम आहे. आम्हाला झिडकारून टाका किंवा लाथाडा, आमचा स्वभावधर्म आम्ही सोडणार नाही.’’
अचेतन स्वरूपाच्या सावल्यांमध्येदेखील जीवन जगण्याची धारणा असते. काणेकरांच्या कवित्वशक्तीचा विलास या कवितेत दिसून येतो.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

पूर्वनियोजन गरजेचे

कोरोनाविरुद्धची भारताची लढाई आता हळूहळू अंतिम, निर्णायक टप्प्यात येऊ लागली आहे. जगभरामध्ये कोरोनावरील लशींचे संशोधनही अंतिम टप्प्यात आलेले असून वैद्यकीय चाचण्यांची तिसरी...

लशीकरणाची पूर्वतयारी करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन ः मुख्यमंत्री

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री, गृहमंत्री व अर्थमंत्री यांच्याशी काल कोविडप्रश्‍नी केलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी...

नागरिकांचे प्राण वाचविणे हेच मुख्य ध्येय

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी, आठ राज्यातील मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद या देशाच्या प्रत्येक नागरिकाचा जीव वाचविण्यासाठी हे सरकार अग्रक्रमाने प्राधान्य...

कोरोनाने मंगळवारी दोघांचा मृत्यू

राज्यात चोवीस तासात नवीन १६७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून कोरोना पॉझिटिव्ह आणखी २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नोव्हेंबर महिन्यात कोरोनाने...

गोमेकॉत केवळ प्रवासासाठी कोविड चाचणी नाही ः राणे

गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळ आणि आरोग्य संचालनालयाला केवळ प्रवासासाठीची कोविड चाचणी न करण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे...

ALSO IN THIS SECTION

कर्तव्यनिष्ठ डॉ. मृदुला सिन्हा

ज्योती कुंकळ्ळकर साहित्य, संस्कृती आणि राजकारण या क्षेत्रांत स्वतःला झोकून घेणार्‍या गोव्याच्या माजी राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा आज...

बांधकाम उद्योगाला चालना

शशांक मो. गुळगुळे बांधून तयार असलेली पण विक्री न झालेली घरे फार मोठ्या प्रमाणावर पडून असल्यामुळे येत्या काही...

‘आयएसएल’चा थरार

सुधाकर रामचंद्र नाईक अखिल भारतीय ङ्गुटबॉल महासंघाच्या सहयोगात २०१४ पासून ‘हिरो आयएसएल’ या प्रतियोगितेस प्रारंभ झालेला असून सातवे...

बालपण दे गा देवा!

मीना समुद्र ही लहानगी सदासतेज, चैतन्याने रसरसलेली, कुतूहलानं टुकूटुकू सगळं पाहणारी, बोबड्या चिमखड्या बोलांनी सर्वांना रिझवणारी, गळामिठी घालून...

शेती-संस्कृतीचा दीपोत्सव

डॉ. जयंती नायक दिव्याशिवाय दिवाळीची संकल्पना पूर्ण होतच नाही. माझ्या मते ‘दिवाळी’ हा शब्दच ‘दिव्यांच्या ओळी’ या अर्थाने...