सांगे, केपे, प्रियोळसह आणखी एकमतदारसंघ एसटी समाजासाठी राखीव

0
9

गोवा विधानसभेचे सभापती गणेश गावकरांकडून शक्यता व्यक्त

गोवा विधानसभेच्या सांगे, केपे, प्रियोळ या तीन मतदारसंघासह वेळ्ळी किंवा नुवे हा मतदारसंघ असे चार मतदारसंघ अनुसूचित जमाती (एसटी) समाजासाठी राखीव ठेवले जाऊ शकतात, अशी शक्यता गोवा विधानसभेचे सभापती डॉ. गणेश गावकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काल वर्तवली.

राज्यात एकूण मतदारांपैकी सुमारे 12 टक्के मतदार अनुसूचित जमातीचे आहेत. राज्यातील एसटी समाजाला राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे. एसटी समाजाला राजकीय आरक्षण मिळविण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. एसटी समाजातील आमदार आणि नेते राजकीय आरक्षण मिळविण्यासाठी एकजुटीने कार्यरत झाले आहेत, असेही सभापतींनी सांगितले.
भाजप पक्ष संघटनेतर्फे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सावर्डे मतदारसंघातील उमेदवारीबाबत घेतल्या जाणाऱ्या निर्णयाचे आपण पालन करणार आहे. पक्षाने आपल्या मतदारसंघात दुसऱ्या उमेदवाराला उमेदवारी दिली, तरीही आपण पक्ष संघटनेचे काम करत राहणार आहे, असेही सभापतींनी स्पष्ट केले.

आपल्या मतदारसंघात मुख्यमंत्री कार्यालयातील (सीएमओ) अधिकारी सक्रिय झाला होता. एकाच मतदारसंघात एकाच पक्षाची दोन राजकीय शक्तीकेंद्रे असल्याने मतदारांचा गोंधळ होऊ शकतो. मतदारसंघाचा आमदार कार्यरत असताना सीएमओतील अधिकारी कार्यरत राहणे योग्य नसल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. आता, मुख्यमंत्र्यांकडून त्याबाबत सुधारात्मक उपाययोजना केली जाऊ शकते, असेही सभापतींनी सांगितले.