– सौ. शीतल शिर्के–वालावलकर
पेट्रोलच्या दरावरचे सरकारी नियंत्रण काढून टाकण्यात आलेय… यापुढे ङ्गक्त सहाच सिलिंडर्स अनुदानाच्या दरात मिळणार… आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रुड तेलाचे भाव वाढल्याने डिझेलची दरवाढ करण्यात आली आहे… डिझेलच्या दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ होण्याची शक्यता… अशा बातम्या ऐकून, पाहून आणि वाचून एव्हाना तुम्ही विटला असाल. एवढेच काय ‘भाकरी मिळत नाही तर ब्रेड खा’ असे सांगायची कोणाची हिंमत होऊ नये म्हणून की काय, पावाचे दर वाढवण्याचे आणि वजन घटवण्याचीही जय्यत तयारी चालली असताना जगायचं कसं असा प्रश्न तुम्हा–आम्हाला पडला तर त्यात नवल वाटायला नको.
सारी जनता महागाईच्या आगीत होरपळत आहे. जीवनावश्यक वस्तू दिवसेंदिवस आवाक्याबाहेर जात चालल्या आहेत. पाणी, वीज, तांदूळ, भाजीपाला, कडधान्ये, मासळी या सर्वांनीच लोकांच्या तोंडचे पाणी पळवले असताना यापुढे वर्षाकाठी अनुदानित दराने केवळ सहाच एलपीजी सिलिंडर मिळणार असल्याचे जाहीर करून सरकारने सामान्य जनतेच्या सणसणीत थोबाडीतच मारली आहे. त्यात आता केरोसिनही मिळत नसल्याने गोरगरिबांच्या हालात आणखीनच भर पडली आहे. एकवेळ कपडा महाग झाला तर तो नंतर घेता येईल, पण रोजच्या जेवणासाठी लागणारं इंधन कुठून आणायचं?
भ्रष्टाचाराने सारा देश ग्रासला आहे. काही मोजक्याच लोकांच्या हाती संपत्ती एकवटली आहे. परंतु अशा या आर्थिक असमतोलाच्या परिस्थितीतही सामान्य जनतेला आणखीनच ओरबाडले जात आहे. एका बाजूने पॅट्रोलचा दर कमी करून गोवा सरकारने शाबासकी मिळवली, पण पाणी आणि वीज बील वाढवून गरिबांच्या खिशात हात घातला आहे. ज्यांना दोन वेळचं जेवणसुद्धा दुरापास्त आहे ते गाड्या घेऊन फिरणार आहेत का? मग पेट्रोल स्वस्त करून गोरगरिबांना त्याचा काय फायदा? महागाई आपल्या परीने वाढतच आहे. वाढत्या महागाईशी तोंडमिळवणी करताना सामान्य नागरिकांच्या नाकी नऊ येत आहेत. माशांचे, भाजीपाल्यांचे भाव तर गगनाला भिडले आहे. अशा परिस्थितीत सामान्य माणसाच्या मनात असंतोष वाढत चालला आहे. हे असेच चालू राहिले तर चोर्या– आत्महत्यांचे प्रमाणही भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. हा धोका ओळखून सरकारने वेळीच सावध होणे गरजेचे आहे.
‘चक्रव्यूह’ नावाचा चित्रपट येऊ घातलाय. त्याच्या दिग्दर्शकाने वाढत्या महागाईवर मार्मिक भाष्य करण्यासाठी त्यात एका गाण्याचा समावेश केला आहे. न्यूज चॅनलवर महागाईच्या विषयावर चर्चेची गुर्हाळे सुरू असली की हे गाणे हमखास वाजवले जाते. गाण्याचे बोल काहीसे असे आहेत– ‘आये थे गरीबी मिटाने, गरीबों को मिटा लिया’ ही ओळ एवढी बोलकी आहे की आम आदमीचे हाल नेमके कसे आहेत, हे त्यातून सहजपणे समजून येतात. सध्या आपल्या देशात सुरू असलेले राजकारण पाहिले तर आणखी काही वर्षांनी आम आदमीचे हाल कुत्र्याला नको होतील, यात शंका नाही.
माणूस हा सवयीचा गुलाम आहे. त्याला अशा सवयी लावून ठेवायच्या की पोटात अन्नाचा कण नसला तरी त्याला भुकेची चिंता सतावू नये. अधूनमधून सरकारचे त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असतात. काही दिवसांपूर्वी ४० रुपये माणसाला जगण्यासाठी पुरतात, असा जावईशोध मायबाप सरकारने लावला होता. म्हणजे ४० पेक्षा वरकमाई असणार्या सगळ्यांनी स्वत:ला टाटा, बिर्ला, अंबानी समजून मजेत जगावं, असं सरकारी धोरण असावं. सरकारी धोरण आणि त्यांच्या निर्णयावर ङ्गारशी चर्चा करून ङ्गुकटची डोकेदुखी वाढवून घेणे आजकाल परवडत नाही. नेमक्या याच आपल्या मनोवृत्तीचा ङ्गायदा उठवत राज्यकर्ते मंडळी आपली मनमानी करत असतात. मुळातच आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे बर्याचदा कोट्यधीश असतात. निवडून येताना कोट्यधीश नसले तरी कालांतराने ते कोट्यधीश होतात. त्यामुळे गरिबी काय असते, पोटाला चिमटा काढून जगायचं कसं याचा त्यांना थांगपत्ता नसतो. देशात आर्थिक सुधारणा घडवून आणण्याच्या नादात आम आदमीची आर्थिक घडी विस्कटून जात असतानाही राज्यकर्त्यांना त्याचं सोयरसुतक नसतं.
महागाईने जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी ग्रासले असताना धड नोकरी मिळत नाही, मिळालीच तर मिळणार्या पगारात संसाराचा रहाटगाडा हाकणे शक्य होत नाही. मुलं असतील तर त्यांच्या कपड्यालत्त्याचा खर्च, शिक्षणाचा खर्च, आईवडिलांची आजारपणं या सगळ्यांतून सहीसलामत सुटलो तर आपण आपली स्वप्नं पूर्ण करण्याचा विचार करू शकतो. बर्याचदा ‘अधुरी एक कहानी’ म्हणत स्वप्नांवर पाणी सोडण्याचीच पाळी आपल्यावर येते.
या महागाईचा आलेख वाढत आहे आणि तो दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. आता या वाढत्या महागाईकडे दुर्लक्ष करून त्यातूनच आपल्याला सुवर्णमध्य काढता आला पाहिजे. एकंदरीत सध्याचं चित्र पाहिलं तर नकारात्मक वातावरण सर्वत्र निर्माण झाल्याचं जाणवतं. सुखी, समाधानी आयुष्य जगायचं असेल तर नकारात्मकतेला सकारात्मकतेत बदलणे गरजेचे आहे. ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे’चे दिवस आता इतिहासजमा झाले आहेत. आता ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हा मंत्र आपण अंमलात आणायला हवा. तुम्ही म्हणाल तो कसा काय? माणूस हा सवयीचा गुलाम आहे. आपण अशा काही सवयींचे गुलाम झालो आहोत की ज्याचा आपल्याला ङ्गायदा कमी आणि त्रासच जास्त होतो. आता हेच बघा ना! स्वयंपाक करताना कुकरचा वापर केला तर जेवण लवकरच शिजते आणि त्यासाठी गॅसही कमी लागतो. बहुतेकांना याची कल्पना असते पण करायचं कुणी? नाममात्र कुकरचा वापर आपण करतो. इतर जेवण भांड्यांमध्येच शिजवतो. यापुढे जेवण बनवताना कुकरचा शक्य तेवढा जास्त वापर करायचं आपण ठरवलं तर आपल्या हिताचं ठरणार नाही का?
जेवणासाठी सोलर कुकरचा वापर करता येऊ शकतो. आपल्याकडे पुरेसा सूर्यप्रकाश असतो. सोलर कुकरचा वापर करून आपण एलपीजी गॅसचा वापर कमी करू शकतो. जेवणही लवकर व वेळेत शिजून तयार होते. आंघोळीचे पाणी तापवण्यासाठीही सोलर युनिट बसवता येते. आपण नेहमी आंघोळीचे पाणी गरम करण्यासाठी स्वयंपाकाच्या गॅसचा वापर करत असतो. भविष्यात अशी बेङ्गिकिरी आपल्याला परवडणार नसल्याने वेळीच त्याबाबत विचार केलेला बरा.
गॅसचा विषय चर्चेत असल्याने कचर्याचा प्रश्न त्याला जोडून चर्चेत घेणे गरजेचे आहे. कचर्याच्या नावाने शिमगा झाला नाही असा एकही दिवस सापडणार नाही. राज्यकर्त्यांनाही कचर्याच्या प्रश्नात नाक खुपसणं पसंत नसावं. त्यामुळे भल्या सकाळी कुत्री, मांजरे, कावळे रस्त्यावर एकत्र जमून मेजवानी झोडत असतानाचे नयनरम्य दृश्य नेहमीच पाहायला मिळते. कचर्याचा प्रश्न सोडवण्यास आपण राज्यकर्त्यांना भाग पाडू शकतो. ओल्या कचर्यावर प्रक्रिया केल्यास त्यापासून स्वयंपाकाचा गॅस बनवता येतो. मोठ्या शहरांमध्ये असे कचरा प्रक्रिया प्रकल्प आहेत. आपणही आपल्याकडे असे प्रकल्प सुरू होतील यासाठी प्रयत्न करायला काय हरकत आहे?
पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले तरी बारीकसारीक गोष्टींसाठी खाजगी गाड्यांचा वापर करण्याचे प्रमाण अजिबात कमी झालेले नाही. आठवड्यातून सुट्टीचा दिवस वगळता खाजगी गाड्यांचा वापर करण्याऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर केल्यास अनावश्यक होणारा खर्च वाचेलच, शिवाय प्रदूषणही कमी होण्यास मदत होऊ शकेल.
सांगण्यासारखं आणि करण्यासारखं बरंच काही आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी लाडली लक्ष्मी, गृहआधार, बेकार भत्ता, वृद्धांच्या पेन्शनमध्ये वाढ यांसारख्या अनेक योजना राबवून आम आदमीला दिलासा देण्याचा प्रयत्न केला असला तरी तेवढ्याने ङ्गारसं काही भागणार नाही. त्यामुळे कायमस्वरुपी या महागाईच्या वरवंट्याखालून आपली सुटका करून घ्यायची असेल तर वर सांगितलेल्या उपायांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.