यंदा कार्निव्हल व अन्न महोत्सवाच्या काळात राज्यात किती पर्यटक आले होते, असा प्रश्न आमदार खंवटे यांनी उपस्थित केला होता. त्याचे उत्तर देताना ठराविक सण व काळात किती पर्यटक गोव्यात आले त्याचे तपशील पर्यटन खाते ठेवीत नसल्याचे पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी सांगितले.
मात्र, यंदा कार्निव्हल व शिगमोत्सव या काळात राज्यात मोठ्या संख्येने पर्यटक आले व परिणामी फेब्रुवारी-मार्च या महिन्यात राज्यात पर्यटन उद्योगाला चालना मिळाल्याचे पर्यटन क्षेत्रातील लोकांकडून मिळालेल्या माहितीवरून दिसून आल्याचे ते म्हणाले. विदेशी पर्यटकांमध्ये रशिया, ब्रिटन, जर्मनी, युक्रेन आदी राष्ट्रांतून येणार्या पर्यटकांचा आंकडा जास्त असल्याचे त्यानी एका उपप्रश्नावर बोलताना सांगितले. यावेळी बोलताना रोहन खंवटे यांनी पर्यटन खाते पूर्ण अपयशी ठरलेले असून त्यामुळेच गेल्या ५ वर्षात राज्यात पर्यटनात वाढ झाली नसल्याचे सांगितले. मात्र ते खोडून काढताना यंदा राज्यात पर्यटकांच्या संख्येत ६ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे सांगितले. मागच्या पाच वर्षात पर्यटनात वाढ झाली नाही त्याला मागील कॉंग्रेस सरकार जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, कार्निव्हलला प्रसिध्दी देण्यासाठी संजय मिश्रा, मनीश झा, रश्मी प्रधान, हसन कमल व रोशनी दुबे या पत्रकारांना बोलाविण्याचा निर्णय कुणी घेतला होता असा प्रश्न विजय सरदेसाई यांनी केला असता तो निर्णय पर्यटन खात्याच्या पब्लिक रिलेशन एजन्सीने घेतला होता, अशी माहिती परुळेकर यांनी दिली. त्यावर बोलताना तुम्हाला चांगले पत्रकार मिळाले नाहीत काय, झूम टीव्हीसारख्या नावही न ऐकलेल्या चॅनेलच्या पत्रकाराना बोलाविण्याची काय गरज होती असा सवाल सरदेसाई यांनी यावेळी केला. त्यावर बोलताना पीआरएजन्सीनेच वरील पत्रकारांची नावे सूचवली होती, असे परुळेकर यांनी सांगितले.

