राज्यातील सहा नगरपालिकांवर प्रशासकांची नियुक्तीचा आदेश काल जारी करण्यात आला. डिचोली, कुडचडे, काणकोण, पेडणे, कुंकळ्ळी, वाळपई या सहा नगरपालिका मंडळांची मुदत पूर्ण होत असल्याने या नगरपालिकांवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य सरकारकडून राज्यातील अकरा नगरपालिकांची निवडणूक येत्या मेमध्ये घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. अकरा नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. तत्पूर्वी, राज्यातील अकरा नगरपालिका मंडळांची मुदत पूर्ण झाल्यानंतर त्या मंडळावर प्रशासकांची नियुक्ती करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली होती.
राज्यातील अकरा नगरपालिका मंडळाची मुदत मार्च-एप्रिल 2026 मध्ये पूर्ण होत असल्याने नगरपालिकांचा कारभार सुरळीत सुरू ठेवण्यासाठी प्रशासकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
डिचोली, कुडचडे-काकोडा, काणकोण आणि पेडणे या चार नगरपालिका मंडळाची मुदत 31 मार्च रोजी पूर्ण झाली आहे. या चारही नगरपालिकांवर 1 एप्रिलपासून प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. डिचोली नगरपालिकेत वरिष्ठ सरकारी अधिकारी अक्षय पोटेकर, कुडचडे नगरपालिकेत सागर गावडे, काणकोण नगरपालिकेत शंकर गावकर आणि पेडणे नगरपालिकेत श्रीकांत पेडणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कुंकळ्ळी नगरपालिकेत विकास कांबळी यांची 6 एप्रिलपासून आणि वाळपई नगरपालिकेत राजू देसाई यांची 9 एप्रिलपासून प्रशासक म्हणून नियुक्ती होणार आहे.

