> > मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन; पणजीत 70 व्या राष्ट्रीय सहकार सप्ताहाची सांगता
राज्यातील सहकार क्षेत्राच्या विकासासाठी सहकार क्षेत्रातून राजकारण आणि ‘स्वाहाकार’ हद्दपार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा राज्य सहकार संघाने आयोजित केलेल्या 70 व्या राष्ट्रीय सहकार सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात बोलताना पाटो-पणजी येथे काल केले.
सहकार चळवळीतून राजकारण आणि स्वार्थ दूर ठेवण्याची गरज आहे. सहकार चळवळीतून राजकारण दूर ठेवले, तरच समृद्धी येईल. राजकारण आले, तर समृद्धी येणार नाही. गोव्यातील अनेक सहकारी संस्था निहित स्वार्थांनी संपवल्या आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गोव्यात 100 वर्षांपूर्वी सहकारी संस्था सुरू झाली. असे असले तरी राज्यात सहकाराची त्यामानाने प्रगती झालेली नाही. सहकारी चळवळीतील नेत्यांनी सहकारी – सार्वजनिक – खाजगी भागीदारी तत्त्वावर कोल्ड चेन, अन्न प्रक्रिया आणि समुद्रकिनाऱ्यावरील कचरा संकलन यासारखे उपक्रम हाती घेण्याची गरज आहे. गोव्यातील सहकारी चळवळीच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी त्यांनी सर्वोच्च सहकारी संस्थांकडे सूचना मागितल्या पाहिजेत. सहकार क्षेत्राच्या प्रभावी कामकाजासाठी ईओडीबी, नवकल्पना आणि तंत्रज्ञानाची गरज आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते सहकार संघाच्या वार्षिक विविध सहकार पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी आमदार प्रेमेंद्र शेट, माजी मंत्री ॲड. रमाकांत खलप, गोवा राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई, राज्य सहकार संघाचे अध्यक्ष रामचंद्र मुळे आदींची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री म्हणाले…
सहकार क्षेत्रात प्रगती करायची असेल तर सहकारी संस्थांनी किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयात न बसता सहकाराचा प्रसार करण्यासाठी हातभार लावला पाहिजे.
दरदिवशी केवळ दूधासाठी दिवसाला कोट्यवधी रुपये परराज्यात जात आहे. राज्यात दूध उत्पादन वाढीतून परराज्यात जाणारे पैसे रोखले जाऊ शकतात.
भाजी, मासे याबाबतीत देखील गोवा स्वयंपूर्ण होऊ शकतो. सहकारी तत्त्वावर भाजी उत्पादन केले जाऊ शकते. सहकाराच्या माध्यमातून गोवेकरांना स्वस्त दरात मासळी उपलब्ध केली जाऊ शकते.
सरकार आवश्यक मदत द्यायला तयार आहे. मात्र या क्षेत्रात काम करणाऱ्या सहकारी संस्थांनी देखील पुढाकार घेणे आवश्यक आहे. काही कायदे बदल करायचे असल्यास ते आम्ही करण्यास तयार आहोत.