Home बातम्या सव्यसाची नाट्ययोगी : मा. दत्ताराम

सव्यसाची नाट्ययोगी : मा. दत्ताराम

0

 विष्णू सूर्या वाघ

मराठी रंगभूमीवरील एकमेवाद्वितीय नाट्ययोगी मा. दत्ताराम यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता उद्या सोमवार दि. १० जून रोजी होत आहे. अनेकविध भूमिकांमधून आपल्या अभिनयाचे आविष्कार घडविणारा हा अस्सल रंगकर्मी एकशे एक वर्षांपूर्वी अंत्रुज महालातील वळवई या खेडेगावात जन्माला आला. ओठांवर मिशी ङ्गुटण्याआधीच सीमोल्लंघन करून मुंबईत वस्तीला जाऊन राहिला आणि तब्बल चार दशके रंगभूमीची सेवा केल्यानंतर १९ सप्टेंबर १९८४ रोेजी जगाच्या रंगभूमीवरून त्यांनी एक्झीट घेतली.

आधुनिक मराठी रंगभूमीचा इतिहास साधारण दीडशे वर्षांचा आहे. या काळात रंगभूमीच्या तारांगणात हजारो, नव्हे लाखो तारे व तारका उदयाला आल्या आणि पाहता पाहता काळाच्या उदरात गडपही झाल्या. मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, नागपूर, गोवा, बेळगाव, धारवाड, बडोदा, इंदूर, बंगळूर, हैदराबाद, रायपूर, ग्वाल्हेर, तंजावर अशा अनेक प्रदेशांत मराठी रंगभूमी उमलली, विकसित झाली आणि काही ठिकाणी मावळलीदेखील. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, तंत्रज्ञ, संगीतज्ज्ञ म्हणून जबाबदारी निभावणारे लाखो लोक या दीडशे वर्षांच्या काळात होऊन गेले. त्या सर्वांची स्मृती रंगभूमीच्याही मनात राहणार नाही, मात्र काही तारे व तारका वर्षामागून वर्षे लोटत गेली तरी काळाच्या नभांगणात झळकत आहेत. आगामी काही वर्षांतही त्यांचा तेजोक्षय होण्याची चिन्हे दिसत नाहीत. असेच आपल्या अंगभूत गुणांनी ध्रुवाच्या अढळपणाने लखलखणारे तेजस्वी नक्षत्र म्हणजे मा. दत्ताराम!

मा. दत्ताराम म्हणजे अभिनयाचा हिमालय! मास्टर दत्ताराम म्हणजे सौजन्याची महामूर्ती! मास्टर दत्ताराम म्हणजे निष्ठेचा नीलमणी! मास्टर दत्ताराम म्हणजे श्रद्धेची परिसीमा! मास्टर दत्ताराम म्हणजे सचोटीचा महामेरू! मास्टर दत्ताराम म्हणजे भूमिकेच्या संवेदना नेमक्या ओळखून त्या भूमिकेलाच आपल्या शरीरात घालणारा अद्वितीय असा नाट्ययोगी!

होय! मास्टर दत्तारामांना कुठलीही उपमा जर द्यायची झाली तर ती नाट्ययोगीहीच द्यावी लागेल. रंगभूमीप्रति समर्पण म्हणजे काय याचे एकमेव उदाहरण म्हणजे दत्तारामबापू! नटाला साजेशी उंची, चेहरा व आवाज नसतानादेखील केवळ आंतरिक इच्छेच्या बळावर एखादा माणूस कठीणातले कठीण अभिनयाचे आविष्कार कसा साकार करू शकतो याचे वस्तुपाठ स्व. दत्ताराम यांनी घालून दिलेले आहेत. नाटक जुन्या पठडीतले आहे की नव्या आधुनिकतेशी नाते जोडणारे आहे याचा क्षणमात्रही विचार न करता जी भूमिका आपल्या वाट्याला आलेली आहे ती भूमिका त्या नाटकाच्या शैलीनुरूप बापूंनी सहजगत्या सादर केली. स्पर्धात्मक, हौशी, कामगार आणि व्यावसायिक अशा सर्व प्रकारच्या रंगभूमीवर दत्तारामबापू इतक्या तळमळीने वावरले. रंगभूमीचा विचार त्यांनी साकल्याने केला. नाटक हे कधीही एका व्यक्तीचे अथवा एका संस्थेचे असू शकत नाही, ते सांघिक प्रयत्नांचेच ङ्गळ असते हा विचार व्यावसायिक रंगभूमीवरही त्यांनी रुजवला आणि धंदा बनत चाललेल्या नाट्यव्यवसायाला नीतीची जोड दिली. प्रेक्षक पैसे देऊन आपले नाटक बघायला येतात, त्यांचे समाधान करणे हे आपले पहिले व परमकर्तव्य आहे याचे भान राखले. अधिक पैसे मिळतात म्हणून एखाद्या निर्मात्याचा विश्‍वासघात कधी त्यांनी केला नाही. त्याचबरोबर पूर्वी कुणीतरी केलेल्या भूमिका आपणाला देऊन एखादा निर्माता, दिग्दर्शक आपले अवमूल्यन करतोय असेही त्यांनी कधी वाटून घेतले नाही. सुरुवातीच्या धडपडीच्या काळात आयत्या वेळी वाट्याला येणार्‍या भूमिकाही त्यांनी केल्या. ‘मा. दत्तारामबनल्यानंतर इतरांच्या नाटकांत नामवंत नटांनी सोडून दिलेल्या भूमिकाही पार पाडल्या. कलाकाराला अहंकार असतो असे नेहमीच म्हटले जाते. पण बापूंनी या अहंकाराचे विसर्जनच अरबी समुद्रात करून टाकले. ‘स्वया जाणिवेची पूर्णपणे राख करून टाकणारा बहुधा हा एकमेव रंगकर्मी!

मा. दत्ताराम हे काय रसायन होते याची कल्पना आमच्या पिढीतील लोकांना येणे कठीण आहे. आम्हाला त्यांची काही नाटके बघता आली ती बालपणात. ‘मत्स्यगंधा’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘ययाती आणि देवयानी’, ‘होनाजी बाळा’, ‘पुण्यप्रभाव’, ‘पंडितराज जगन्नाथअशी काही नाटके लहानपणी पाहिल्याचे मला आठवते. पण माझे वय तेव्हा जेमतेम पाच ते आठ वर्षांचे. त्यामुळे या भूमिकांचे बारकावे काही मनावर टिपले गेले नाहीत. थोडीशी जाण आल्यानंतर त्यांची एकमेव भूमिका मला पाहता आली, ती म्हणजे आपल्या जन्मगावात वळवईला त्यांनी केलेल्या राजसंन्यासया अखेरच्या नाटकातील संभाजीची. बापूंची तब्येत तेव्हा अतोनात बिघडली होती. दोन्ही डोळ्यांना नीट दिसत नव्हते. स्मृती अधूनमधून दगा देत होती. हातपाय थरथरत होते. या परिस्थितीत हा माणूस संभाजी कसा करणार असा बालसुलभ प्रश्‍न माझ्या मनात चमकून गेला. पण काही वेळानंतर नाटकाचा पडदा वर गेला आणि संभाजीची एन्ट्री रंगमंचावर झाली तेव्हा हा कुणीतरी नट वेगळाच आणि मघा पाहिलेले दत्तारामबापू वेगळे असे वाटल्यावाचून राहवले नाही. मंचावर आलेले दत्तारामबापू हे पूर्णपणे संभाजी बनले होते; नव्हे शंभूराजे नखशिखांत त्यांच्यामध्ये भिनले होते. बापूंचे हे कसब आले कुठून याचा पत्ता भल्याभल्यांना लागला नाही. त्यांना स्वतःलाही नेमकेपणाने तो सांगता आला नाही. मला अमुक अमुक भूमिका करायची आहे हा ताणही त्यांनी कधी मनावर घेतले नाही. नाटकातली भूमिका नक्की झाली की तिचे संवाद आपल्या हातांनी लिहून काढणे, वेळ मिळेल तेव्हा ते संवाद अथपासून इतिपर्यंत वाचून काढणे, पाठ झाल्यावर जमेल तिथे आपणा स्वतःशीच ते पुटपुटत राहणे आणि तब्बल दीड तास चालणार्‍या प्रदीर्घ आंघोळीच्या वेळी त्या भूमिकेचा विचार निरंतर करत राहणे हीच बापूंची टेक्निक होती. लालबागच्या कामगार वस्तीत राहतानासुद्धा या शाही आंघोळीत त्यांनी खंड पडू दिला नाही. प्रयोगाच्या दिवशी नाटकाच्या आधी किमान एक तास अगोदर उपस्थित राहून बाकीचे कलाकार रंगपटात पोचण्यापूर्वी चेहर्‍याला मेकअप करून पूर्ण तयारीनिशी आपल्या भूमिकेचा विचार करत बसणे हा बापूंचा पायंडा होता. प्रत्यक्ष रंगमंचावर त्यांनी प्रवेश केल्यानंतर जे काही होई ते अनुभवण्यासारखेच असे.

खरंतर दत्तारामबापू म्हणजे खरोखर एक चमत्कार! वळवईसारख्या आडगावात सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेणार्‍या दत्ताराम नारायण वळवईकर हा तसा एक सामान्य मुलगा. १० जून १९१३ हा त्याचा जन्मदिवस. त्याच गावात साधारणतः एक वर्षाच्या ङ्गरकानंतर जन्माला आलेला गंगाराम हा त्यांचा बालवयातील सहयोगी. एकमेकांसमोरच्याच घरात राहणार्‍या या गंगाराम नारायण तारीला घेऊन दत्तारामने छोटी छोटी नाटकं करायला सुरुवात केली. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी वळवईत उत्सवाच्या नाटकात मृच्छकटिकमध्ये रोहसेनची भूमिका करून रंगभूमीवर पहिले पाऊल टाकले आणि त्या छोट्याशा भूमिकेतही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. नाटकात काम करण्याचा मोह त्यांना पडला तेव्हापासूनच! त्यानंतर गावच्या हौशी मंडळीनी शिमग्यातील उत्सवात कुंजविहारीनाटक बसवले व पेंद्याची भूमिका दत्तारामच्या वाट्याला आली. त्यावेळी त्यांचे वय अवघे दहाबारा वर्षांचे होते. तोपर्यंत शाळेच्या दोन तीन इयत्ताच पूर्ण झाल्या होत्या. दत्तारामांना अभिनयाचे पहिले धडे तेव्हाचे ज्येष्ठ नाटककार सखाराम बर्वे यांच्याकडून मिळाले. वळवईच्या काही उत्साही लोकांनी बर्वे यांच्या पुढाकाराने ललितप्रभा नाट्यमंडळही हौशी नाट्यसंस्था सुरू केली. दत्ताराम व गंगाराम हे दोघे या संस्थेचे मुख्य मोहरे होते. ही संस्था व्यावसायिक स्वरूपावर नाटके करू लागली. इथूनच दत्तारामांचा व गंगारामांचा प्रवास निश्‍चित झाला. १९२३२४ साली दत्ताराम व गंगाराम यांची सुरू झालेली रंगयात्रा १९८४ साली मा. दत्ताराम यांच्या निधनानंतरच थांबली. रंगभूमीशी जुळलेलं हे नातं यापुढे कधीच तोडणार नाही अशी शपथच कोवळ्या वयाच्या दत्तारामनं घेतली आणि रंगभूमीवरील अभिनययज्ञात स्वतःला झोकून दिले. बर्वेंच्या ललितप्रभा संगीत नाट्यमंडळीबालनट म्हणून शिरलेल्या दत्तारामांनी मडगाव, पणजी, ङ्गोंडा, सावंतवाडी, वेंगुर्ला इत्यादी ठिकाणी जाऊन नाटकं केली. ‘देहांत प्रायचित्त’, ‘अग्रहार’, ‘शीलसौभाग्य’, ‘प्रणयी किटकया नाटकांतून महत्त्वाच्या भूमिका त्यांनी साकारल्या. ‘संशयकल्लोळमध्ये कृत्तिकेची महत्त्वाची भूमिकाही ठसक्यात पेश करून रसिकांना खूश केले. दुर्दैवाने काही काळाने ललितप्रभा बंद पडली. मग पुढे काय हा प्रश्‍न दत्तारामासमोर उभा राहिला. त्याच काळात १९२८ च्या सुमारास सावंतवाडीच्या बाप्पा धारणकरांनी शारदा संगीत मंडळीनावाची कंपनी काढली होती. ‘ललितप्रभाच्या अस्तामुळे बेकार बनलेले दत्ताराम व गंगाराम शारदा संगीत मंडळीत दाखल झाले. त्याच्यात प्रमुख कलावंत म्हणून त्यांना बरीच कामे मिळाली. ‘पंतांची सूनहे कंपनीचे हातखंडा चालणारे नाटक. या नाटकात दत्ताराम चांदणीची भूमिका करीत. पण पुढे तीही कंपनी बंद पडली. विष्णुपंत बोरकर हे वडीलधारे गृहस्थ ललितप्रभामध्ये प्रारंभापासून होते. ते नट होते, दिग्दर्शक होते. दत्तारामांना नट व दिग्दर्शक म्हणून घडवण्याचे श्रेय खरे त्यांचेच! अभिनयाबरोबर त्यांनी दत्तारामांना व्यवहारही शिकवला. यात्या कंपनीत ङ्गिरण्यापेक्षा आपणच एखादी नवी कंपनी काढू अशी गुरुकिल्लीही दिली. त्यावेळी दत्ताराम व गंगाराम रघुवीर सावकार यांच्या रंगबोधेच्छूया कंपनीत काम करत असत. या नाटकात रेवतीचे भूमिका करायचे रघुवीर सावकार आणि कृत्तिका बनायचे अर्थातच दत्ताराम. बोरकरांनी दत्ताराम व गंगाराम यांना घेऊन प्रभात संगीत मंडळी ही नवी कंपनी सुरू केली. नारदनारदीच्या कथेवरील योगसंसारया पौराणिक नाटकाने प्रभातने आपली मुहूर्तमेढ रोवली. कळलाव्या नारदाची भूमिका दत्तारामांच्या वाट्याला आली होती. यानंतर त्या कंपनीने सावकारी पाश’, ‘पठाणी पाश’, ‘पंतांची सून’, ‘मोटारवाला’, ‘सासुरवासअशी अनेक नाटके रंगभूमीवर आणली. कंपनीत काम करायचं म्हणजे कोणत्या वेळी कोणती भूमिका करावी लागेल याचा काही नेम नसायचा. वास्तविक दत्तारामांच्या काही भूमिका या तशा ठरलेल्या होत्या. ‘महाशिवाजीशिवसम्राटया नाटकांत ते शिवाजी व्हायचे, ‘शिक्काकट्यारमध्ये शाहू व्हायचे. बाकीच्या नाटकांत कुठली भूमिका कधी वठवावी लागेल याचा नेम नव्हता. त्यामुळे बापूंनी कंपनी करीत असलेल्या प्रत्येक नाटकातील दर भूमिकेचे संवाद पाठ करून ठेवले. प्रसंग येईल त्याप्रमाणे ती भूमिका वठवायची असा प्रघात सुरू झाला. त्यामुळे शेकडो भूमिकांचे संवाद बापूंना मखोद्गत झाले व दीर्घकाळ त्यांच्या स्मृतीत राहिले.

दिवाळसण’, ‘घरजावई’, ‘इशारा’, ‘सोन्याचा धूर’, ‘पैशांचा पाऊस’, ‘चलो दिल्लीही प्रभात संगीत मंडळीने केलेली आणखी काही नाटके. ‘जया अंगी मोठेपण तया यातना कठीणअशी एक म्हण आहे. ही म्हण दत्तारामबापूंच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते. दत्तारामबापू प्रभात संगीत मंडळीच्या तंबूचा मधला खांब होते. पण आपण मुख्य नट आहोत याचा अहंकार त्यांनी बाळगला नाही. अधूनमधून ते कंपनीच्या कलाकारांच्या जेवणाची व्यसस्था बघित. नाटकाच्या जाहिरातीचे बोर्ड स्वतः लिहीत. नाटकाचे पडदे स्वतःच लावत. नटांचा मेकअप करीत व टेबल मांडून तिकीटविक्रीलाही बसत. गरज पडली तर स्त्रीभूमिकाही करीत. ऑर्गनवाला वेळेवर पोचला नाही तर ऑर्गनही वाजवीत. तबल्यावर बसून गायककलाकारांना साथही करीत आणि पात्रांचे चेहरेही रंगवीत. नाटकाचे पडदे रंगविण्याची कलाही त्यांनी शिकून घेतली होती. त्यांनी जे जे काही केलं ते रंगभूमीची सेवा म्हणून केलं. त्यामुळे अहंचा उदय त्यांच्या मनात कधीच झाला नाही.

१९३७ साली प्रभात संगीत मंडळी मुंबईत आली. मुंबईत सात महिने तिचा मुक्काम होता. ही कंपनी जुन्या नाटकांबरोबरच नवीन नाटकांचेही प्रयोग करायची. मामा वरेरकरांचे समोरासमोरहे नाटक प्रभातने रंगभूमीवर आणले. दत्तारामने त्यातला नायक विनायकची भूमिका केली होती. या भूमिकेमुळे ते सर्वप्रथम मुंबईच्या रसिकांसमोर गेले. थोडेसे परिचित झाले. ‘काकाची शशी’, ‘बाजीरावचा बेटाया नवीन नाटकांतूनही त्यांना संधी मिळाली. दत्तारामांची अदाकारी नजरेला पडली ती मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक व सर्वेसर्वा डॉ. . ना. भालेराव यांच्या दृष्टीला! त्यांच्यामधला अभिनेता किती ताकदीचा आहे याचा साक्षात्कार भालेरावांनाच पहिल्यांदा झाला आणि साहित्य संघाच्या नाट्यमहोत्सवात भाऊबंदकीनाटकात रामशास्त्री ही भूमिका त्यांनी दत्तारामांना देऊन टाकली. वास्तविक या नाटकात नानासाहेब ङ्गाटक, दुर्गाबाई खोटे, मामा पेंटसे, दत्तोपंत आंग्रे हे ख्यातनाम नट काम करत होते. तुलनेने दत्ताराम अत्यंत नवशिके. या दिग्गजांसमोर उभं राहणं हेच खरे तर मोठे आव्हान होते. पण दत्तारामनी ते सहजपणे पेलले. नवी दिल्लीतील नाट्योत्सवात भाऊबंदकीने पहिला क्रमांक मिळवला. केशवराव दाते यांनी त्याचे दिग्दर्शन केले होते. त्या नाटकात रामशास्त्रीची कामगिरी ठसठशीत होती. धीरगंभीर, कर्तव्यतत्पर, न्यायनिष्ठूर रामशास्त्री प्रेक्षकांना भावला होता. प्रवेश घेतानाच ठसक्यात व झटक्यात एका हाताने खांद्यावर उपरणे ङ्गेकणारे मा. दत्ताराम! तो झटका उपरण्याला नसून पेशवाईला आहे असे त्यांचा अभिनय पाहताना वाटे. ‘भाऊबंदकीमधील या भूमिकेतूनच दत्तारामांची विजयी रंगयात्रा मुंबईच्या महानगरीतून सुरू झाली. पुढे खाडिलकरांच्याच सवाई माधवरावांचा मृत्यूया नाटकात त्यांना माधवरावाची भूमिका मिळाली. भ्रांतचित्त आणि कमकुवत मनाचा सवाई माधवराव दत्तारामांनी खाडिलकरांनी मुळात अभिप्रेत असलेल्या शेक्सपियरच्या नाटकाच्या थाटात उभा केला.

या भूमिकेच्या शोकात्म अभिनयाची आंच बापूंनी खोलवर जाणवू दिली. माधवरावाच्या मनातील आंदोलनं, मातेविषयीचा संशय, नाना ङ्गडणविसांविषयीचा राग हे सारे कंगोरे दत्ताराम बारकाव्यांनिशी दाखवित. रामशास्त्री व सवाई माधवराव या दोन भूमिकांमुळे आणि केशवराव दाते यांच्यासारखा दिग्दर्शक मिळाल्यावर दत्तारामांच्या अभिनयाला अनेक नवे पैलू पडले. तो अधिक सूक्ष्म झाला, अधिक गहिरा बनला.

साहित्य संघात बापूंच्या वाट्याला आलेली आणखी एक मोठी भूमिका म्हणजे वि. वा. शिरवाडकरांच्या कौंतेयमधील कर्णाची. या नाटकात समोर कुंतीची भूमिका करणार्‍या दुर्गाबाई खोटे होत्या, पण त्यांच्यासमोर नवखे दत्ताराम पाय रोवून उभे राहिले आणि रसिकांना त्यांनी जिंकून घेतले. शिरवाडकरांच्याच वैजयंतीनाटकात जयपालची त्यांची भूमिकाही लोकप्रिय झाली आणि दत्ताराम वळवईकर हा गोव्यामधून मुंबईत आलेला एक कलाकार मास्टर दत्ताराम बनून नानासाहेब ङ्गाटक, गणपतराव बोडस, केशवराव दाते, चिंतामणराव कोल्हटकर या श्रेष्ठ नटांच्या पंक्तीत जाऊन बसला. साहित्य संघाच्या या नाट्योत्सवाच्या कालखंडानंतर मास्टर दत्ताराम व्यावसायिक रंगभूमीवर स्थिरावले. विविध कंपन्यांच्या नाटकांमधून नाईटवर कामे करायला लागले. त्यात ललितकलादर्श, संयुक्त महाराष्ट्र नटसंघ अशा कंपन्यांचा समावेश होता. अनेक नाटकं तोंडपाठ असलेल्या बापूंना नाटकांत काम करण्यासाठी अनेक ठिकाणांहून निमंत्रणे येऊ लागली. तेव्हापासून बापूंनी डायरी बाळगायला सुरुवात केली. एका कंत्राटदाराला एकदा तारीख दिली की कुठल्याही परिस्थितीत ती बदलायची नाही हा बापूंचा दंडक होता. कोणी जादा पैसे देऊ केले तरी ते दिलेली तारीख नाही बदलायचे. प्रयोग संपल्यावर निर्मात्याने दिलेलं नाईटचं पाकीट त्यांनी कधीही उघडून बघितलं नाही. घरी गेल्यानंतर ते पाकीट थेट आपल्या पत्नीच्या हातात देण्याचा रिवाज त्यांनी कधी मोडला नाही. नाटक संपल्यावर नाटकावर चर्चा करत ते कधी थांबले नाहीत आणि आताची नाटक मंडळी करतात असा नाटकाचा चौथा अंकही त्यांनी कधी केला नाही. थोडासा कडक चुना लावलेल्या पानाच्या विड्याचं एक व्यसन सोडलं तर दुसरं कुठलंच व्यसन दत्तारामबापूंना आपल्या जाळ्यात अडकवून ठेवू शकलं नाही.

दि गोवा हिंदू असोसिएशन या संस्थेनं रायगडाला जेव्हा जाग येतेया नाटकातील शिवाजीची भूमिका आणि दिग्दर्शनाची जबाबदारी अशा दोन्ही गोष्टी मा. दत्तारामांच्या हाती सोपवल्या हा त्यांच्या कारकिर्दीमधला एक टर्निंग पॉईंट मानावा लागेल. इथून त्यांनी जी झेप घेतली ती पुढची विसेक वर्षे दत्ताराम या एकाच नावाने रंगभूमी झपाटली गेली. ‘मत्स्यगंधामधील भिष्म, ‘ययाती आणि देवयानीमधील ययाती, ‘पंडितराज जगन्नाथमधील मन्सुर खान, ‘दुरितांचे तिमिर जावोमधील बारटक्के, ‘बेबंदशाहीमधील संभाजी, ‘पुण्यप्रभावमधील वृंदावन, ‘भावबंधनमधील धोंडिराज, ‘संन्याशाचा संसारमधला शंकराचार्य, ‘श्रीमधला कुसुमाकर, ‘ललिटलेखमधला निशिकांत, ‘मानापमानमधली लक्ष्मीधर, ‘एकच प्यालातील सुधाकर अशा अनेक भूमिका त्यांनी अजरामर करून टाकल्या आहेत. यांशिवाय कुणाच्याही नावावर नसेल अशा विक्रम दत्तारामबापूंच्या नावावर आहे. किमान वीस ते पंचवीस नाटकांत कधी ना कधी त्या नाटकातील सर्व भूमिका पुरुष व स्त्री मिळून त्यांनी साकारल्या आहेत. उदाहरणार्थ, ‘सौभद्रमध्ये अर्जुन, नारद, सुभद्रा, कृष्ण, रुक्मिणी, बलराम, विदुषक अशा सगळ्याच भूमिका बापूंनी केल्या आहेत. अभिनयाचे इतके वैविध्य नटेश्‍वराने आणखी कोणाला बहाल केले असेल असे मला वाटत नाही. बालगंधर्व दीनानाथ म्हटले की त्यांच्या स्त्रीभूमिका आठवतात. बोडस, ङ्गाटक ही नावे घेतली की गद्यभूमिका डोळ्यांसमोर येतात. पण संगीत भूमिकांपासून गद्यभूमिकांपर्यंत आणि गंभीर प्रकृतीपासून विनोदी प्रकृतीपर्यंत सर्व प्रकारच्या अभिनयाच्या छटा साकारणारा एकमेव नाट्ययोगी म्हणजे मास्टर दत्ताराम आणि मास्टर दत्तारामच!