सर्व संघटनांना विश्वासात घेऊन टॅक्सी धोरणाचा मसुदा बनवणार

0
11

राज्य सरकारने टॅक्सी धोरणाचा नवीन मसुदा तयार करण्याचे काम सुरू केले असून, या मसुद्याला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी राज्यात सर्व टॅक्सी संघटनांना विश्वासात घेतले जाणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
राज्य सरकारने 10 सप्टेंबरपर्यंत नवीन टॅक्सी धोरणाचा मसुदा तयार करण्याचे आश्वासन टॅक्सी संघटनांना दिले होते. नवीन टॅक्सी धोरणाच्या मसुद्याचा पाठपुरावा करण्यासाठी राज्यातील विविध टॅक्सी संघटनांचे प्रतिनिधी काल पर्वरी येथे सचिवालयाच्याजवळ जमले होते. टॅक्सीचालकांनी नवीन टॅक्सी धोरणाच्या मसुद्याबाबत विचारणा करण्यास सुरूवात केली. तसेच, मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी आग्रह धरला; मात्र पोलिसांनी टॅक्सी संघटनाच्या प्रतिनिधींना सचिवालयाच्या प्रवेशद्वाराजवळ रोखून धरले.

राज्यातील टॅक्सी व्यावसायिकांनी नवीन धोरणाच्या मसुद्यासाठी आपला व्यवसाय सोडून आंदोलन करण्याची गरज नाही. राज्यातील टॅक्सीचालकांनी सरकारवर विश्वास ठेवावा. नवीन टॅक्सी धोरण 10 सप्टेंबरला तयार करण्याचे आश्वासन दिले होते. या धोरणाचा मसुदा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

टॅक्सी संघटनेचे प्रतिनिधी काय म्हणाले?
राज्य सरकारने टॅक्सी संघटनांना बोलावून टॅक्सी धोरणाच्या मसुद्याला 10 सप्टेंबरला अंतिम स्वरूप देण्याची घोषणा केली होती. तथापि, याबाबत आम्हांला कोणीही काही माहिती दिली नाही. आम्ही काही आमदारांना फोन केले, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे टॅक्सी संघटनाच्या प्रतिनिधींना पर्वरी येथे यावे लागले, अशी माहिती टॅक्सी संघटनेचे नेते चेतन कामत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

टॅक्सी धोरणाचा मसुदा तयार करायला आणखी 8 दिवस लागण्याची शक्यता आहे. टॅक्सी मसुदा जाहीर करण्यापूर्वी राज्यात सर्व टॅक्सी संघटनांना विश्वासात घेतले जाणार आहे. टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींना मसुदा दाखवून त्यांच्या शंकांचे निरसन केले जाईल.

  • डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.