सर्व मंगल मांगल्ये…

0
18
  • गिरिजा मुरगोडी

शारदीय नवरात्र… आपल्या संस्कृतीच्या कित्येक वैशिष्ट्यांचे उज्ज्वल पैलू लाभलेला; कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक, वैज्ञानिक सर्व दृष्टींनी महत्त्वाचा, निसर्गाशी जोडलेला असा सृजनोत्सव. नवोन्मेषाची पूजा, शक्तीची उपासना, दुष्टांचा संहार, सत्प्रवृत्तीचा जयघोष असे अनेक आयाम असलेला हा सण आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी असा नऊ दिवस साजरा केला जातो.

गौरी गणपतीची धामधूम संपते. वातावरणातला जल्लोष मावळू लागतो. लाडक्या गणरायाला जड, भारावल्या मनाने निरोप दिल्यानंतर काहीसं सुनंसुनं वाटत असतं. दगदगीनं शीण आलेला असतो, पण सगळं साग्रसंगीत निभावता आलं, गणरायाच्या चरणी लीन होता आलं, त्याच्या दयार्द्र कृपादृष्टीनं घर घर आश्वस्त झालं, उजळून निघालं, या जाणिवेनं मन समाधानानं, कृतार्थ भावनेनं भरून आलेलं असतं.
हे सगळं भारावलेपण रेंगाळत असतानाच आश्विन उजाडतो आणि पाठोपाठ चाहूल लागते शारदीय नवरात्राची. आणि पुन्हा एकदा उत्साहाचे, उत्सवाचे वारे वाहू लागतात, वातावरणातल्या आल्हादक झुळुकींसारखे! भक्तीचे, श्रद्धेचे, उपासनेचे कमलपुष्प मनामनांत उमलू लागते.
नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः।
नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्म ताम्‌‍॥
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।
शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते॥
शारदीय नवरात्र… आपल्या संस्कृतीच्या कित्येक वैशिष्ट्यांचे उज्ज्वल पैलू लाभलेला; कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक, वैज्ञानिक सर्व दृष्टींनी महत्त्वाचा, निसर्गाशी जोडलेला असा सृजनोत्सव. नवोन्मेषाची पूजा, शक्तीची उपासना, दुष्टांचा संहार, सत्प्रवृत्तीचा जयघोष असे अनेक आयाम असलेला हा सण आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी असा नऊ दिवस साजरा केला जातो आणि विजयादशमीच्या सणाने त्याची पूर्तता, सांगता होत असते.

हा संपूर्ण उत्सव देशभरात विविध अर्थपूर्ण प्रथा-परंपरांनुसार साजरा केला जातो. नऊ दिवस मुख्यतः आदिशक्तीची उपासना करण्याचा हा सण. आश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना केली जाते. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही सगळ्या चराचरात सामावलेली पंचतत्त्वं. देह, मन, आत्मा, बाह्यसृष्टी, सर्वत्र पिंडी-ब्रह्मांडी ही सामावलेली. आपल्या संस्कृतीत या पंचतत्त्वांना देवत्व दिलेलं आहे. त्यांच्या परमशक्तीची जाणीव असावी, त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावं, त्यांचं ऋणी असावं या भावनेचे संस्कार विविध परंपरांमधून केले गेलेले आहेत.
नवरात्रीच्या आरंभी होणारी घटस्थापना हेही त्याचंच उदाहरण होय. घट हे आकाशतत्त्व, त्यातील पोकळीत वायुतत्त्व, पाणी भरून ठेवलं जातं ते जलतत्त्व, अखंड तेवता दीप- अग्नितत्त्व, खालची माती पृथ्वीतत्त्व (घटही मृण्मय), पेरलेले धान्य हे नवनिर्मितीचं प्रतीक. आणि ही सर्व शक्तीचीच पूजा.
वर्षा ऋतू संपतानाच पृथ्वीचं समृद्ध, संजीवक चैतन्यरूप, नवधान्य हाती आल्याने समाधानी कृषिवर्ग… अशा आनंदमय वातावरणात घटस्थापना केली जाते. देव्हाऱ्यात अखंड तेवणारा नंदादीप, रोज वाढत्या क्रमाने सोडल्या जाणाऱ्या प्रफुल्ल फुलांच्या माळा, मनोभावे वाचला जाणारा सप्तशतीचा पाठ, स्त्री-सूक्त, देवी पुराण, ललिता सहस्र नामावली, भजन-पूजन, कुलदेवतानाम जप, निराहार राहून उपासना… असं सर्व मंगलमय भक्तीपूर्ण वातावरण असतं.

आदिशक्ती देवी दुर्गेनं दुष्ट राक्षस महिषासुराशी केलेलं युद्ध आणि मिळवलेला विजय हे या सणाच्या केंद्रस्थानी आहे. यासंबंधीची पौराणिक कथा अशी-
महिषासुर राक्षसाने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या करून अमर होण्याचे वरदान मागितले होते. ब्रह्मदेवांनी असा वर दिला की पृथ्वीवर राहणारा कोणताही प्राणी, कोणताही देव, दानव त्याचा वध करू शकणार नाही. या वरदानामुळे उन्मत्त झालेल्या महिषासुराने स्वर्ग-पृथ्वी सर्वत्र आत्यंतिक अनाचार माजवला. त्यामुळे देव त्रस्त झाले. दुष्ट महिषासुराचे निर्दालन आणि सृष्टीचे रक्षण करण्यासाठी देवांच्या तेजातून माता आदिशक्ती दुर्गेचा जन्म झाला. देवी दुर्गा आणि महिषासुर यांच्यात सलग नऊ दिवस निकराचे युद्ध झाले. दहाव्या दिवशी माता दुर्गेने महिषासुराचा वध केला, म्हणून या नऊ रात्रींना नवरात्र आणि दसऱ्याला विजयादशमी म्हणतात.
हे नऊ दिवस देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना/रूपांना समर्पित आहेत. अनुक्रमे शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धीदात्री अशी या नऊ दिवसांना समर्पित माता दुर्गेची नऊ रूपं. अनेक रूपांचं वैशिष्ट्य, महत्त्व आणि उपासनाफल वेगवेगळे आहे.

या देवीरूपांची अनेक वैशिष्ट्यं आणि शक्ती प्रत्येक स्त्रीमध्ये काही प्रमाणात असते. प्रसंगोपात्त त्याची प्रचीतीही येते. कधी ती शैलपुत्रीप्रमाणे महाकालीचा अवतार धारण करते, तर कधी ब्रह्मचारिणीप्रमाणे आनंद आणि शांततेचं प्रतीक, कधी चंद्रघंटेप्रमाणे सौंदर्यमूर्ती आणि शौर्याचं प्रतीक असते. देवी कुष्मांडा तर विश्वाची सर्जनशील शक्ती. तशीच प्रत्येक स्त्रीही सर्जनशील, स्कंदमातेप्रमाणे नित्य अपत्य रक्षणार्थ सज्ज… अशी अनेक रूपांत, अनेक क्षमतांसह आदिशक्तीचा वास अंशरूपाने तिच्यात असतो. आदिशक्तीसमोर नतमस्तक होत असतानाच या सकल स्त्री-शक्तीचा गौरव करण्याचा हा महान उत्सव!
भारतीय संस्कृतीत असलेले स्त्रीचे महत्त्व आणि तिला दिला जाणारा सन्मान अधोरेखित करणारी नवरात्रीतील आणखी एक प्रथा म्हणजे कन्यापूजन. या प्रथेनुसार नऊ कुमारिकांचे यथासांग पूजन केले जाते. त्यांना मिष्टान्न भोजन करविले जाते. देवीरूप मानून वयानुसार त्यांना त्रिमूर्ती, कल्याणी, रोहिणी, कालिका, चण्डिका, शांभवी, दुर्गा, सुभद्रा अशा देवीच्या वेगवेगळ्या रूपांच्या नावांनी संबोधले जाते. मनोभावे केल्या जाणाऱ्या या देवीरूप कन्यापूजन विधीमागे केवढी उदात्त जाण आणि भावना आहे.
असा श्रद्धा-भक्तीचा रंग या सणाला आहेच, पण लोकसंस्कृती आणि परंपरेचा हर्षभरा रंगही या उत्सवात मिसळलेला आहे. महाराष्ट्रात पारंपरिक गोंधळ, जोगवा आणि हादगा किंवा भोंडला खेळण्याची परंपरा आहे. आमच्या लहानपणी आम्ही नवरात्रात रोज खूप उत्साहानं भोंडला खेळत असू. हस्त नक्षत्राचं आणि समृद्धीचं प्रतीक म्हणून पाटावर हत्तीचं चित्र काढून तो मध्यभागी ठेवला जातो आणि त्याभोवती फेर धरून मुली वेगवेगळी पारंपरिक लोकगीतं म्हणतात-
ऐलमा पैलमा गणेश देवा
माझा खेळ मांडून दे करीन तुझी सेवा
मांडला गं मांडला वेशीच्या दारी…
अशी सुरुवात करून-
एक लिंबू झेलू बाई दोन लिंबं झेलू
दोन लिंबं झेलू बाई तीन लिंबं झेलू….
असं करत करत पाच लिंबू झाले की
पाचा लिंबाचा पानोसा। माळ घाली हनुमंता
हनुमंताची निळी घोडी। येता जाता कमळं तोडी
कमळाच्या पाठीमागे लपली राणी। अगं अगं राणी इथं कुठं पाणी
पाणी नव्हे यमुना जमुना…
असं करत लांबलचक गाण्यांच्या माळा ओवत जात असू. ‘ऐका हो शंकरा बोलाचा अर्थ करा। ऐकले गं पार्वती बोलाचे अर्थ किती।’ असं एखादं गमतीदार कोड्यासारखं, तर काही काही लहानग्या माहेरवाशिणींच्या सासरबद्दलच्या भावनांना वाट करून देणाऱ्या-
अक्कण माती चिक्कण माती
अश्शी माती सुरेख बाई…
अशी सुरुवात करून तिथे जातं रोवणं, सपीठी काढणं, करंज्या करणं, इतमामानं माहेरी धाडणं इ. सगळे टप्प्याटप्प्याने होत शेवट मात्र-
अस्स माहेर सुरेख बाई खायला मिळतं
अस्सं सासर द्वाड बाई कोंडोनी मारितं
अशी ठसक्यात सांगत सांगता होते. हादग्याची खूप पारंपरिक गीतं आहेत. जगण्यातले अनुभव, देवीची भक्ती, सासू-सुनेचे संवाद असे अनेक पैलू असलेली. रोज संध्याकाळी नटून-थटून एकेका मैत्रिणीच्या घरी/अंगणात जमणं, पाटाभोवती फेर धरून भोंडल्याची गाणी म्हणणं आणि नंतर खिरापती ओळखणं (प्रत्येकीनं काही खाऊ आणलेला असे ते ओळखण्याची एक गंमत असे. नंतरच तो वाटला जाई.) शेवटी अंगत-पंगत करून मजेमजेत खाऊचा चट्टामट्टा. अशी सगळी धमाल असे.

गुजरातमध्ये गरबा-दांडियाची धूम असते. ही गुजरातची पारंपरिक लोकनृत्ये नवरात्रोत्सवात देवीच्या पूजन-भक्तीसह आनंदाने केली जातात. नक्षी व छिद्रे असलेला, मध्ये दीप प्रज्वलित करून ठेवलेला मातीचा घट्ट (गार्बो) मध्यभागी ठेवला जातो आणि त्याभोवती फेर धरून देवीची गीते गात, लयबद्ध गिरक्या घेत घेत, ठेक्यावर टाळ्या वाजवून हलक्या पदन्यासांसह हे नृत्य केले जाते. रंगीबेरंगी चमकदार घागरे घालून नृत्य करण्यात, गीते गाण्यात तल्लीन झालेल्या महिला, मुली खूप आनंदी आणि सुरेख दिसत असतात. हा दिवा, घट हे जीवनाचे आणि सर्जनशक्तीचे प्रतीक मानले जाते, तर हातात रंगीबेरंगी दांडिया घेऊन, गोलाकार फेर धरून पारंपरिक पोषाखातील स्त्री-पुरुष जेव्हा दांडिया नृत्य करतात तेव्हा ते करणाऱ्यांचे आणि पाहणाऱ्यांचेही भान हरपून जाते. दांडिया काठ्या एकमेकांवर तालबद्ध रीतीने आपटत जलद गतीने थिरकत संगीताच्या साथीने केलेले हे कलात्मक, जोशपूर्ण उत्साही नृत्य आणि तो सगळा सोहळा भारावून टाकणारा असतो. दांडिया नृत्याचा धागा श्रीकृष्ण आणि राधा-गोपींच्या रासक्रीडेशी जोडलेला आहे. रात्री उशिरापर्यंत हा सोहळा चाललेला असतो. आता केवळ गुजरातमध्येच नव्हे तर देशभर गरबा-दांडिया अत्यंत होसेने, उल्हासा-जल्लोषात खेळला जातो. त्याची लोकप्रियता अधिकाधिक वाढत असलेली दिसून येते.
बंगालमध्ये नवरात्र गाजते ती दुर्गापूजा उत्सवाने. बंगाली संस्कृतीचा सर्वात महत्त्वाचा, अत्यंत भव्य स्वरूपात साजरा केला जाणारा हा उत्सव फार सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण असा आहे. मुख्य उत्सव षष्ठीपासून सुरू होतो आणि विजयादशमीला संपन्न होतो. या दुर्गादेवीची पूजा लक्ष्मी, सरस्वती, गणेश आणि कार्तिकेय या दैवतांसोबत केली जाते. कोलकात्यासह संपूर्ण बंगालमध्ये हजारो भव्य कलात्मक मांडव उभारले जातात. पारंपरिक पद्धतीच्या सुरेख, सुघड, सुबक मूर्तींची स्थापना होते. रोज पूजन, महाप्रसाद, आरती, विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतात. कुमारी पूजा, संधिपूजा, धुनुची नृत्य, सिंदूर खेला असे वेगवेगळे परंपरागत विधी केले जातात. देवीसमोर धूपदाणी घेऊन पारंपरिक ढोल-ताशांच्या तालावर केलेले नृत्य गुंगवून टाकणारे असते. जोशपूर्ण आणि ऊर्जादायी. संपूर्ण बंगाली समाज एकत्र येऊन अतिशय आपुलकीने, श्रद्धेने, भक्तिभावाने, आत्मीयतेने हा उत्सव साजरा करतो. आता दुर्गापूजा केवळ बंगालपुरती मर्यादित राहिली नसून ज्या-ज्या शहरा-गावांमध्ये बंगाली लोक स्थायिक झाले, त्या-त्या ठिकाणी त्याच इतमामात हा उत्सव साजरा होतो.

नवरात्र उत्सवाच्या सामाजिक स्वरूपामध्ये काही वर्षांपासून एका आधुनिक संकल्पनेची भर पडली आहे. नऊ दिवसांचे नऊ रंग… प्रत्येक दिवसाचा एकेक ठरावीक रंग आणि त्यानुसार वस्त्रे परिधान करणे. यामागे कोणतीही धार्मिक परंपरा नसून आधुनिक काळातील व्यावसायिक कल्पकता आहे. काही वर्षांपूर्वी एका वृत्तपत्राने काहीसा कमी झालेला वृत्तपत्राचा खप व लोकप्रियता वाढवण्यासाठी ही कल्पना आणली आणि अल्पावधीतच ती प्रचंड लोकप्रिय झाली. आता सगळीकडेच हे अनुसरलं जात असल्याचं दिसून येतं. विविध आस्थापने, कार्यालये, महाविद्यालये, मंदिरे, अगदी हॉस्पिटलमधील डॉक्टर्ससुद्धा हौसेने गंमत म्हणून उत्साहाने, आनंदाने एका रंगाच्या विविध छटांच्या साड्या, कुर्ते घालून वावरत असतात. हे बघणेही मजेदार असते. हे नऊ रंग देवीच्या नऊ रूपांचे (नवदुर्गा) प्रतीक मानले जातात. प्रत्येक रंग देवीच्या विशिष्ट गुणाचे व ऊर्जेचे प्रतिनिधित्व करतो.

गावा-गावांतील देवी मंदिरांमध्ये रोजच्या रोज सुंदर आरास, देवीची फुलांनी सजविलेली वेगवेगळी कलात्मक आसनं, मखरं, देवीचं साजरं तेजस्वी रूप, सुंदर वस्त्रालंकार, दर्शनासाठीची प्रचंड गर्दी, महिलांची देवीची ओटी भरण्याची लगबग, रोज संध्याकाळी भजन, कीर्तन, प्रवचनं हे सगळं वातावरण ऊर्जादायीच!
नवरात्रीच्या नऊ रात्री गोव्यातील प्रमुख मंदिरांमध्ये ‘मखरोत्सव’ हा अतिशय सुंदर, वैशिष्ट्यपूर्ण आणि अद्वितीय उत्सव साजरा केला जातो. सुरेख नक्षीकाम केलेला मोठा झुल्यासारखा लाकडी आकृतिबंध, रंगीबेरंगी कागद, रंगीत काचांची नक्षी, सुगंधी फुलं, हार, देखणी तोरणं यांनी सजवला जातो. हेच मखर. नवरात्रीमध्ये रोज रात्री देवीच्या उत्सवमूर्तीला वा मुख्य देवतेला या मखरामध्ये विराजमान केले जाते. त्यानंतर ढोल, ताशा, झांज, घंटा अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात, भजनाच्या सुरांमध्ये मखराला हळुवारपणे पुढे-मागे, डावीकडे-उजवीकडे झोके दिले जातात. वाद्यांचा गजर, नाद हळूहळू वाढू लागतो, त्याप्रमाणे मखराला झोके देण्याचा वेगही वाढत जातो. त्यावेळी रोमांच उभे करणारे, भक्तिरसात न्हाऊन काढणारे, दंग करणारे, भारावून टाकणारे वातावरण निर्माण होते. या मेळाच्या उत्कर्षबिंदूचा अनुभव तर अक्षरशः शब्दातीतच!
रिपुसंहारक महिषासुरमर्दिनी, धनदौलत समृद्धीची देवी महालक्ष्मी यांच्या पूजनाबरोबरच वाणी, बुद्धी, ज्ञान, विद्येची देवता महासरस्वतीच्या पूजनाला नवरात्रीत महत्त्वाचं स्थान आहे. शारदीय नवरात्रातील सप्तमी ते नवमी हे दिवस सरस्वतीपूजनाचे असतात. तसेच दसऱ्याला घराघरांत सरस्वतीपूजन, पुस्तके, वाद्ये, पाटी, लेखन-साहित्य यांची पूजा केली जाते.
काही ठिकाणी नवमीला तर काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी आयुधांची पूजा केली जाते. पूर्वी राजे या दिवशी सीमोल्लंघन करून युद्धासाठी कूच करत. त्याआधी शस्त्रांची पूजा केली जाई.
शमी वृक्षाचे पूजन करून शमीची वा आपट्याची पाने एकमेकांना देऊन अभीष्टचिंतन करण्याची प्रथा समृद्धी आणि नात्यांमधील आपुलकी टिकवण्याची सदिच्छा दर्शवते.

दसऱ्याच्या दिवशी असत्यावर सत्याचा, दुष्प्रवृत्तीवर सत्प्रवृत्तीचा विजय म्हणून अनेक ठिकाणी रावणदहन केले जाते. श्रीरामाने दसऱ्याच्या दिवशी रावणाचा वध केला होता. या विजयाचे प्रतीक म्हणून रावण दहन केले जाते.
असा हा जीवनाचे सगळे रंग उजागर करणारा सण-उत्सव प्रतीकरूपाने मनामनात सार्थपणे झिरपू दे. ज्या स्त्री-शक्तीची, मातृशक्तीची उपासना करतो त्या स्त्रीला समाजाच्या सर्व स्तरांमध्ये यथोचित सन्मान मिळत राहू दे. कोणत्याही स्वरूपात होणारी उपेक्षा, अवहेलना संपुष्टात येऊ दे. जगभरात उफाळलेल्या दुष्टप्रवृत्तींना आळा बसू दे. समाजात, राजकारणात उदंड झालेल्या विघातक शक्ती, अमानवी कृत्ये, राक्षसी वृत्ती यांचे दहन होऊ दे. कुटुंबांमधलं दुरावलेपण मिटू दे. अंतरंगातील नकारात्मक भावभावना लोप पावू देत. अज्ञानाचा अंधार दूर होऊ दे. सर्व धरती सुजलाम्‌‍ सुफलाम्‌‍ होऊ दे. नवोन्मेषांचे अंकुर बहरत राहू देत. समाधानाची ब्रह्मकमळं मनामनांत, समाजात, राज्यात, देशात, जगभरात उमलू देत. या उत्सवाच्या आनंदलहरी खऱ्या अर्थाने सर्वत्र लहरत राहू देत!
या देवी सर्वभूतेषु तुष्टिरूपेण संस्थिता
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥