सर्व फेरीबोटींची तात्काळ तपासणी करा

0
12

चोडण फेरीबोटप्रकरणी काँग्रेसची मोर्चाद्वारे मागणी

चोडण येथील फेरीधक्क्यावर एक फेरीबोट बुडाल्याच्या धक्कादायक घटनेनंतर गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांच्या नेतृत्वाखालील काल काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बेती येथील नदी परिवहन खात्याच्या (आरएनडी) कार्यालयावर मोर्चा काढला. यावळी खात्याचे अधीक्षक विक्रमसिंह राजेभोसले यांना घेराव घालून त्यांच्यावर प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्नांचा भडिमार करून त्यांना भंडावून सोडले. राज्यातील 18 जलमार्गावरील फेरीबोटींतून दररोज सुमारे 30 हजार नागरिक प्रवास करतात. प्रवाशाच्या सुरक्षेसाठी सर्व जलमार्गावरील फेरीबोटींची तात्काळ तपासणी करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केली.
चोडण येथील घटनेमुळे नदी परिवहन खात्याचा भोंगळ कारभार उजेडात आला आहे. फेरीबोटीची तपासणी केली जात नाही. प्रवाशांच्या सुरक्षेकडे योग्य प्रकारे लक्ष दिले जात नाही, असा आरोप श्री. पाटकर यांनी केला.
राज्यातील जलमार्गावरील फेरीबोटीचे सुरक्षा ऑडिट करण्यात आले आहे का ? असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पाटकर यांनी उपस्थित केला.

आयआरएस प्रमाणपत्र घ्या
जलवाहतूक कायद्यानुसार ठरावीक अंतरापर्यंत जलवाहतूक करणाऱ्या फेरीबोटींना आयआरएस प्रमाणपत्र आवश्यक आहे. तथापि, गोव्यातील फेरीबोटीकडे हे प्रमाणपत्र नाही. सर्व फेरीबोटींसाठी आयआरएस प्रमाणपत्र घ्यावे, अशी मागणी पाटकर यांनी केली.
मोठ्या पावसामुळे फेरीबोटीत पाणी घुसले व त्यामुळे फेरीबोट बुडाली अशी हास्यास्पद उत्तरे दिली जात आहे. पाऊस केवळ एकाच फेरीबोटीवर पडला का, अयोग्य उत्तरे देऊन लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका. जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रयत्न करू नका, असेही पाटकर यांनी सांगितले.