व्यवसायिक महाविद्यालयांसाठी स्थानिक उमेदवार मिळणे अनेकदा शक्य होत नाही. त्यामुळे बाहेरील उमेदवारांची नियुक्ती करावी लागते. गोवा वैद्यकीय महाविद्यालयासारख्या संस्थांमध्ये प्राध्यापकांची नियुक्ती करण्यासाठी स्थानिक भाषेचे ज्ञान असण्याची गरज नाही, परंतु त्यांनी स्थानिक भाषा शिकून घेतल्या तर त्याचा फायदा होईलच, असे पर्रीकर यांनी एका प्रश्नावर सांगितले.
गोवा पोलीस खात्यासाठी तिसरी बटालियन स्थापन करण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. त्यामुळे १००७ पोलिसांची भरती करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पेडणे येथे बटालियनसाठी अतिरिक्त जागा ताब्यात घेण्यात येणार असून एक बटालियन फोंडा व मडगाव येथे असेल, अशी माहिती त्यांनी दिली.
गोवा लोकसेवा आयोगातर्फे भरण्यात येणारी पदे वगळता अन्य सर्व पदांवरील उमेदवारांसाठीची वयोमर्यादा दोन वर्षे वाढविण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय पुढील दोन वर्षे पर्यंतच लागू असेल, असे त्यांनी सांगितले.
गोवा लोकसेवा आयोगाने शिफारस केलेले भागशिक्षण अधिकारी व प्रथम श्रेणीतील शिक्षक मिळून सात नावे तत्वतः रद्द ठरविण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. भरती प्रक्रियेत त्रुटी असल्याचे आढळून आल्यानेच वरील निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. म्हापसा पालिका मंडळात प्रथम श्रेणी अभियंत्याचे पद भरण्यास मान्यता दिल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे पर्वरी येथील जीसीएकडील मैदान ताब्यात घेण्यावरही विचार सुरू असून तेथील लोकांना विश्वासात घेऊनच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
३८ सनदी अधिकार्यांना कोकणीचे धडे
आयएएस, आयपीएस, आयएफएस व आयईएस अधिकार्यांना राजभाषेचे धडे देण्यासाठीच्या वर्गांत पोलीस महासंचालक किशन कुमार यांच्यासह शिक्षण संचालक डी. जी. द्विवेदी, आयएएस अधिकारी बी. विजयन्, परिमल राय, बी. पी. राव, मोहनलाल, वन अधिकारी एस. के. अगरवाल, डॉ. सुदेश बक्षी तसेच गुन्हा अन्वेषण विभागातील अधीक्षक ओ. पी. मिश्रा, उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक विजय सिंह आदी ३८ अधिकार्यांनी कोकणी भाषेचे धडे गिरवल्याचे राजभाषा संचालनालयाचे संचालक प्रकाश वजरीकर यांनी सांगितले. वरील वर्गात या अधिकार्यांना कोकणी वाक्यरचना, प्रशासकीय नोंदी, शेरे, व्याकरण आदी शिकवण्यात आल्याचे तसेच दक्षिण व उत्तर गोव्यात त्यांना दौर्यावर नेऊन ग्रामीण लोकजीवनाचे दर्शन घडवण्यात आल्याचे वजरीकर यांनी सांगितले. या वर्गांचा समारोप सोहळा आज गुरुवार दि. २३ रोजी संध्याकाळी ३.३० वाजता सचिवालयातील परिषदगृहात संपन्न होणार असून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून हजार राहणार असल्याचे ते म्हणाले. २ जुलै ते ९ ऑगस्ट या दरम्यान वरील वर्ग घेण्यात आल्याचे ते म्हणाले.