– प्रकाश आचरेकर, मुंडवेल, वास्को
सकाळी आपले वर्तमानपत्र उघडल्यावर पहिल्या किंवा दुसर्या पानावर, रस्त्यावर अमूक ठिकाणी अपघात होऊन एवढे लोक ठार झाल्याची वाईट बातमी आपण दररोज वाचत असतो. त्यापैकी जास्त असे अपघात दुचाकीस्वारांना झालेले असतात. या दुचाकीस्वारांच्या बहुतेक अपघातांत युवकच बळी पडल्याचे दिसून येते. या अपघातांतील बहुतांश लोक मेंदूला इजा झाल्याने दगावल्याचे वाचनात आले आहे. दुचाकीच्या अपघाताचा मार प्राणघातक असतो. एक व्यावहारिक ज्ञान. फुटबॉल खेळणार्या खेळाडूचे धावताना पडणे, ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. इथे मार न लागता खेळाडूच्या हातापायांना खरचटल्याचे आपण पाहत असतो. त्यानंतर सायकल चालवणारा माणूस वेगाने पडल्यास त्याला थोडा मार लागतो. सायकल फार जोरात असल्यास हात-पाय मोडू शकतो. पुढे मोटारसायकलचा वेग जास्त असल्याने वरून पडणे जास्त धोकादायक असते. या अपघातात माणूस दुसर्या वाहनाखालीही जाऊ शकतो, तेव्हा माणसाचे हातपाय मोडतात, जबर डोक्याला मार लागतो तर काही चेंदामेंदा झाल्याने जागेवरच ठार होतात. त्यावर उपाय म्हणून सरकारने दुचाकीस्वाराला हेल्मेटची सक्ती केलेली आहे. या कायद्यातून पाठीमागे बसणार्याला वा शहरी भागात दुचाकी चालवणार्याला माफी आहे. त्यात संध्याकाळ झाल्यावर रात्री कुठल्याही रस्त्यावर हेल्मेट घातलेला दुचाकीस्वार मिळणे अगदी विरळच आहे, कारण चालवणार्याला हे माहीत आहे की, रात्रीच्यावेळी पोलीस गस्तीवर नसतात.
पाहायला गेल्यास कदाचित भारतामध्ये गोवा हे राज्य दुचाकीचा स्वर्गच म्हणावा लागेल. गोव्यातील लोकसंख्या व दुचाकीचे परिमाण कुठल्याही राज्यापेक्षा जास्तच आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जगात कुठेही गोव्याशिवाय हेल्मेट नसताना दुचाकीस्वार मिळणे कठीण आहे. इकडे माणसाजवळ वाहन असणे प्रतिष्ठेचे मानले जाते. तेव्हा माणसाजवळ चारचाकी नसल्यास दुचाकी असलीच पाहिजे. म्हणून रस्त्यावरून माणसाने चालत जाणे कमीपणाचे मानले जाते. सरकारही दुचाकी घेण्यासाठी प्रोत्साहन देते. म्हणून बँका व संस्था दुचाकी घेण्यासाठी विविध सवलतींचे कर्ज देण्यास प्रोत्साहन देतात.
आजचे जग धावपळीचे झाले आहे. प्रत्येकाला प्रत्येक मिनिट हे मोलाचे वाटते. प्रत्येकजण आपला वेळ वाचवण्याच्या प्रयत्नात असतो व जीव धोक्यात घालून जणू टांगती तलवार डोक्यावर घेऊन, मोटारसायकलवर स्वार होऊन कामाधंद्याला जातो, तर काहीजण मौज म्हणून ती चालवतात, ही वेगळी गोष्ट. म्हणूनच घरची माणसे आपला दुचाकीने गेलेला माणूस केव्हा सुखरूप परत येतो याची वाट पाहतात.
माणसाची एकाच वेळी तीन-चार कामे असतात. यावेळी आपले स्वतःचे वाहन असणे अत्यंत गरजेचे झाले आहे. नाहीतर मार्गावर असलेल्या खासगी बसगाड्या ठराविक वेळेवर आहेत. म्हणजे काही ठिकाणी काही वेळा एका तासाहून जास्त अंतराने बस सुटते, तसेच बसगाड्यांच्या मालकांचा हा धंदा असल्याने पैशांसाठी प्रवाशांना कोंबून नेत असतात. त्यात उन्हाळ्याच्या दिवसांत शाळांना सुट्टी असताना खासगी बसमधून प्रवास करणे हे अत्यंत त्रासदायक असते. सरकार डोळ्यांवर पट्टी बांधते व रस्ता रुंद केल्याची बढाई मारते.
गोव्यात पणजी – वास्को व पणजी – मडगाव या दोनच मार्गांवर पूर्ण सरकारी कदंब बसची सोय आहे. इतर ठिकाणी मोजक्याच कदंब बसेस आहेत. तसेच शहरातील स्थानिक वाहतूक खासगी बसने केली जाते. इथे बसमालक माणसांना माणूस म्हणून पाहत नाही. तर ती मालगाडी कशी बस नेतात.
आता गोव्यामध्ये टॅक्सी व रिक्षा आहेत. पण मुंबईमध्ये जसे सर्वसामान्य लोक बिनधास्तपणे सरकारने ठरविलेले मीटरनुसार भाडे देतात आणि हे टॅक्सी अथवा रिक्षा भाडे जवळजवळ बसएवढेच असते. म्हणून रिक्षा व टॅक्सी तिथे भरलेल्या त्या रस्त्यावरून जाताना दिसतात. स्टँडवर तिथे त्या अल्पकाळच सापडतील. तिकडील टॅक्सी वा रिक्षाचालक कष्टाळू आहेत. त्यांना विश्रांती ही माहितच नाही. तर इकडील टॅक्सी वा रिक्षा या पर्यटक अथवा बाहेरून आलेल्या गोवेकरांसाठीच आहे. इकडील गोवेकरांना परवडणार्या नाहीत. तसेच रिक्षाचे भाडे भरमसाट असते. इकडील टॅक्सी वा रिक्षाचालक मोठा मासा कधी मिळेल याची वाट पाहत असतात. हे लोक मोजकीच भाडी मारून सुशेगाद स्टँडवर गप्पा मारत बसलेले असतात.
शेजारील राज्यात सहा सिटरच्या रिक्षा व व्हॅन टॅक्सी दोन गावांमध्ये बसच्या दराने भाडे आकारून ये-जा करतात. तिथे प्रवाशांची वेळ व पैशांची बचत होतेच, शिवाय प्रवास सुखाचा व बहुमोलाचा जीवही सुरक्षित राहतो. इथे रस्ते सुंदर व रुंद आहेत. त्यावर आलिशान, सुंदर गाड्यांची वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. त्या चारचाकी गाडीमध्ये एकटाच प्रवासी प्रवास करीत असलेला पाहावयास मिळतो. प्रत्येक बसस्टॉपवर मात्र प्रवाशांची गर्दी असते. त्यांना गर्दीच्या सार्वजनिक बसमध्ये प्रवास करायची वाट पाहत राहावे लागणार.
या सार्यांचा सरकारने पूर्ण विचार करून खासगी दुचाकी व चारचाकी वाहन चालकांना आताच सार्वजनिक बस वाहनांकडे वळविले पाहिजे. त्यात आरोग्य, पर्यावरण, समाजामधील आपुलकी, खर्या गोव्याचे रक्षण होईल. वाहतूक ही केवळ धंदा म्हणून न समजता सेवा म्हणून समजली गेली पाहिजे. त्यासाठी ज्यादा बसगाड्या, टॅक्सी-रिक्षा पद्धतीत सुधारणा हवी. तेव्हा आपला सुशेगादपणा सोडून मेहनती झाले पाहिजे. त्यात आम आदमीला सुखाचा व आरामाचा प्रवास करण्यास मदत होईल. त्याशिवाय तरुणांचा दुचाकी अपघातांपासून बचावही होईल.

