राज्यातील दुध उत्पादन येत्या तीन वर्षांत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट पशुसंवर्धन खात्याने ठेवले असून या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून कामधेनू योजनेखाली धनगर, अनुसुचित जाती व जमातींतील शेतकर्यांप्रमाणेच आता सर्वसामान्य गटातील शेतकर्यांनाही कामधेनू योजनेखाली म्हशी व गायी खरेदी करण्यासाठी ९० टक्के एवढे अनुदान देण्याचा खाते विचार करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्यात सध्या १ लाख ६५ हजार लिटर एवढे दूध उत्पादन होत असून येत्या तीन वर्षांत ते वाढवून ३ लाख लिटरपेक्षा जास्त करण्याचे खात्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, हे उद्दिष्ट साध्य करायचे झाल्यास जास्तीत जास्त शेतकर्यांना दुग्ध व्यवसायात आणावे लागणार आहे आणि म्हणूनच जास्तीत जास्त शेतकर्यांनी म्हशी व गायी खरेदी करण्यासाठी पुढे यावे यासाठीच कामधेनू योजनेखाली सर्वसामान्य गटातील शेतकर्यांनाही म्हशी व गायी खरेदी करण्यासाठी ९० टक्के एवढे अनुदान देण्याचा खाते विचार करीत आहे. खात्याचे मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी स्वत: त्यासाठी प्रयत्न चालवले असल्याचे खात्यातील सूत्रांनी स्पष्ट केले.
गोठ्यासाठीही ९० टक्के
अनुदानाचा विचार
गुरांच्या खरेदीबरोबरच गोठा बांधण्यासाठीही शेतकर्यांना ९० टक्के अनुदान देण्याबाबत सरकार विचार करीत आहे. आतापर्यंत ह्या शेतकर्यांना साधनसुविधा विकासाच्या नावाखाली गोठा बांधण्यासाठी १ लाख रु. (जास्तीत जास्त) एवढे अनुदान मिळत आहे. मात्र, आता त्यांना त्यासाठी ९० टक्के एवढे अनुदान देण्याचा खात्याचा विचार आहे. आणि ते प्रत्यक्षात उतरल्यास ह्या शेतकर्यांना केवळ गोठा बांधण्यासच ४ लाख रु. एवढे अनुदान प्राप्त होणार आहे.
कामधेनूखाली गुरांसाठी
वसतीगृहाचाही प्रस्ताव
कामधेनू योजनेचा उद्देश हा जसा दुग्ध उत्पादन वाढीचा आहे तसाच तो रोजगार वाढीचाही आहे. राज्यातील काही युवकांना त्यांच्याकडे स्वत:ची जमीन नसल्याने त्यांना दुग्ध व्यवसाय सुरू करता येत नाही. अशा लोकांची ही अडचण लक्षात घेऊन खात्याने आता अशा शेतकर्यांच्या गुरांसाठी वसतीगृहाची सोय करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्वावर प्रथम दोन तालुक्यात हे वसतीगृह उभारण्यात येणार आहे. १० ते १५ शेतकर्यांना आपल्या म्हशी व गायी ह्या वसतीगृहात ठेवता येतील तेथे पशु तज्ज्ञाची सोय असेल, दुध गोळा करून नेण्याची सोय असेल. तसेच शेतकर्यांना सहकारी तत्त्वावर गुरांचे खाद्य आणता येईल तसेच वसतीगृहाजवळ ह्या गुरांसाठी हिरव्या चार्याच्या कुरणाचीही सोय असेल. दरम्यान, कामधेनू योजनेखाली सध्या नागपुरी, मुर्रा, पंढरपुरी, सुरती आदी गायी तसेच गिर, साहिवाल, रेड सिंधी ह्या देशी गायी खरेदी करण्यासाठीही पशुसंवर्धन खाते अनुदान देत असल्याचे सुत्रांनी सांगितले.

