सर्वमित्र जनार्दन वेर्लेकर

0
27
  • डॉ. सोमनाथ कोमरपंत

चार दशकांहून अधिक काळ मडगावमध्ये सामाजिक, शैक्षणिक, वाङ्‌मयीन आणि सांस्कृतिक क्षेत्रात निष्ठेने कार्य करणारे जनार्दन वेर्लेकर आज ११ जून रोजी वयाची ७५ वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यांच्याविषयी अल्पसे….

चार दशकांहून अधिक काळ मडगावमध्ये सामाजिक, शैक्षणिक, वाङ्‌मयीन आणि सांस्कृतिक क्षेत्रात निष्ठेने कार्य करणारे जनार्दन वेर्लेकर आज ११ जून रोजी वयाची ७५ वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यांच्या कार्यकुशलतेकडे आणि चैतन्यशील व्यक्तिमत्त्वाकडे पाहून हे कुणाला खरे वाटणार नाही.

जनार्दन वेर्लेकर आणि माझी मैत्री १९६५ सालापासूनची. आजमितीला ती कायम राहिलेली आहे. ते केवळ माझे मित्र म्हणून मला मर्यादा घालायची नाही. ते गोव्यात आणि गोव्याबाहेर अनेक क्षेत्रांतील अनेकांचे मित्र आहेत. आपल्या प्रेमळ वागण्याने, मिठास वाणीने आणि समर्थ लेखनाने हे मित्र जोडलेले आहेत. संगीतप्रेम हा त्यांच्या जीवनातील मर्मबिंदू आहे. जिथे जिथे गाणे आहे, तिथे तिथे त्यांचे मन रमते. व्यवसायाने ते सनदी लेखापाल
आहेत. आपल्या व्यवसायात त्यांनी जम बसविला आहे. या व्यवसायामुळे ते सर्वांना ज्ञात आहेत. पण त्याहीपेक्षा सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या कार्यामुळे आणि संगीतक्षेत्रातील जाणकारीमुळे लोक अधिक प्रमाणात त्यांना ओळखतात.

जनार्दन वेर्लेकर हे मूळचे सांग्याचे. सांग्याचे मूळ नाव संगमपूर. या परिसराला फार मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. भजन, कीर्तन, गायन, लोककला आणि लोकपरंपरा जतन करणारी ही भूमी आहे. मारुतीगड आणि महादेव मंदिर येथे एका दिवसाचे भजन आणि भजनी सप्ताह तेथे होतो. संगीतक्षेत्रातील आणि भजनी गायकीतील दिग्गज मंडळी तेथे वर्णी लावायची. श्रावणी सप्ताहात पं. मनोहरबुवा शिरगावकर, दामाजी कोसंबे, तातोबा वेलिंगकर, रामनाथबुवा मठकर, मुकुंदबुवा मडकईकर, जयकृष्ण भाटीकर, काशीनाथ शिरोडकर, नंदकुमार पर्वतकर, गोपीनाथ वाळके, नाना शिरगावकर, आनंद शिरोडकर, आनंद चोडणकर, नरहरीबुवा वळवईकर, पं. सोमनाथ च्यारी व कृष्णा लक्ष्मण मोये या मोजक्या गुणीजनांचा उल्लेख केल्यावर तत्कालीन वातावरण कोणत्या प्रकारचे असेल याची कल्पना येईल. सारा आसमंत दुमदुमून जात असे. बालपणापासून जनार्दन वेर्लेकर आपल्या वडिलांसमवेत नमाने तेथे जात असत. या भजनी गायकीचा प्रगाढ संस्कार त्यांच्या मनावर झाला. त्यांच्या संगीतप्रवणतेची ही कोनशिला होय. हे संचित घेऊनच त्यांनी पुढच्या जीवनाची वाटचाल केली.

मडगाव ही जनार्दन वेर्लेकरांची कर्मभूमी. पण गावाशी असलेली नाळ त्यांनी आजही तोडलेली नाही. अजूनही त्यांच्या मनात त्या आठवणींचे नाद-निनाद उमटतात. ते भावनाप्रधान होतात. ‘गोमंत विद्या निकेतन’ ही गोव्यातील जुनी-जाणती संस्था. ती आता ११० वर्षांची झाली आहे. शतक ओलांडलेल्या या संस्थेने गोमंतकात संस्कृतिसंवर्धनाचे विधायक कार्य केलेले आहे. या संस्थेला उज्ज्वल परंपरा लाभलेली आहे. वेर्लेकर सध्या या संस्थेचे अध्यक्षपद भूषवीत आहेत. त्यांच्या उपक्रमशीलतेमुळे त्यांना तिसर्‍यांदा ही संधी मिळाली आहे. सर्वांना बरोबर घेऊन दर्जेदार कार्यक्रम करणे हा त्यांचा स्थायिभाव. आत्मभान आणि समाजभान ठेवून ते कार्यरत आहेत. हे उत्तरदायित्व जबाबदारीने पेलत असताना आपल्या आवडीच्या क्षेत्रांकडे ते लक्ष पुरवितात. कार्यनिष्ठा, निरलस वृत्तीने कार्य करणे आणि अभिरुचिसंपन्नतेचा आदर्श ठेवणे या त्रयीमुळे त्यांना ही ऊर्जा प्राप्त होत असावी.
वाचन हा त्यांचा आवडीचा छंद आहे. पण हे नुसते वरवरचे वाचन नसून व्यासंगी अभ्यासक अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे. मुंबईच्या ‘आयडियल बुक सर्व्हिस’ने ठेवलेले उत्कृष्ट वाचक म्हणून त्यांना सुवर्णपदक प्राप्त झाले होते. नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांच्या शुभहस्ते ते त्यांना देण्यात आले होते. या गोष्टीचा वेर्लेकरांना अतीव आनंद झाला. याचे कारण नाट्यप्रेम हीदेखील त्यांच्या मर्मबंधातील ठेव आहे. ध्यास, अभ्यास आणि परिशीलन या व्यासंगाच्या पायर्‍या आहेत. त्यांना कोणताही विषय वाचनासाठी वज्ये वाटत नाही. ललित वाङ्मय, वैचारिक वाङ्‌मय, चरित्र, आत्मचरित्र हे वाङ्‌मयप्रकार ते सारख्याच आस्थेने वाचतात. अभिरुचिसंपन्न आणि सुसंस्कृत होण्यासाठी वाचन हे उत्तम माध्यम आहे यावर त्यांची नितांत श्रदा आहे. वाचन-मनन-चिंतन त्यांना प्रिय आहेच. त्यांची स्मरणशक्ती तीव्र असल्यामुळे त्यांच्या वक्तृत्वामध्ये वाङ्‌मयीन संदर्भ येतात. श्रुतयोजनकौशल्य किती महत्त्वाचे असते हे त्यांच्या वक्तृत्वातून प्रत्ययास येते. चोखंदळपणे चांगल्या साहित्याचे वाचन करीत असताना आपल्याला आवडलेल्या पुस्तकाविषयी मित्रमंडळीना सांगणे हा त्यांचा स्थायी भाव. शिवाय आस्वादक अंगाने त्या पुस्तकांवर लिहिणे हा त्यांचा परिपाठ आहे. वृत्तिगांभीर्याबरोबर नर्मविनोद त्यांना प्रिय आहे. वाचन सर्वसमावेशक कसे असावे याचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी घालून दिलेला आहे. आपले वाचन अद्ययावत असावे याकडे त्यांचे कक्षाने लक्ष असते.
त्यांचा अत्यंत आवडीचा छंद म्हणजे शास्त्रीय संगीत ऐकणे हा होय. त्याच्या लगोलग येणारे नाट्यसंगीत आणि सुगम संगीत त्यांना तेवढेच प्रिय आहे.

संगीतोपासकाला जीवनसाधना आणि कलासाधना यांमधील अद्वैत जाणून ते आत्मसात करावे लागते. संगीताचा रसास्वाद घेणार्‍याला थोड्या-फार फरकाने याच प्रक्रियेतून जावे लागते. हे आत्मभान जनार्दन वेर्लेकर यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे. संगीतोपासक व्यक्तीला ऐतिहासिक कलापरंपरेचे आकलन करून घ्यायचे असते. वेगवेगळ्या घराण्यांनी या रागदारी संगीतात कशी भर घातली आणि कोणकोणते प्रयोग केले याची इत्यंभूत माहिती असावी लागते. संगीतक्षेत्रातील दिग्गजांनी जीवनसाधना आणि समांतरप्रक्रियेने संगीतसाधना कशी केली याचे ज्ञान ग्रहण करावे लागते. जनार्दन वर्लेकर यांनी संगीतकलेचा असा सर्वांगांनी अभ्यास केला आहे. पूर्वसंचिताचे देणेही त्यांना लाभलेले आहे. त्यांनी संगीतमैफलीची केलेली रसग्रहणे आणि दिग्गजांच्या व्यक्तिमत्त्वाचा त्यांनी करून दिलेला परिचय रसमय असतोच. तो वाचणे हा अनिर्वचनीय आनंदानुभव असतो. असे शेकडो लेख त्यांनी अनेक नियतकालिकांमधून आणि अग्रगण्य दैनिकांच्या साप्ताहिक आवृत्तींमधून लिहिले आहेत. ते एकत्रित करून ग्रंथरूपाने आले तर तो महत्त्वाचा सांस्कृतिक दस्तऐवज ठरेल. आजवर गाजलेल्या संगीतमैफलींचे आलोकदर्शन त्यातून घडेल आणि तत्कालीन गायक कलाकारांच्या कर्तृत्वाचा देदीप्यमान आलेख ठरेल.

मराठीच्या मुख्य धारेत कृ. द. दीक्षित, वा. ह. कुलकर्णी, गोपालकृष्ण भोबे, गो. रा. जोशी, डॉ. वि. भा. देशपांडे, रामकृष्ण ऊर्फ तात्या बाक्रे, अरविंद गजेंद्रगडकर इत्यादी जाणकारांनी विलक्षण वृत्तीने हे कार्य आजमितीला केलेले आहे. गोमंतकातील गतपिढीतील मलबाराव सरदेसाई, प्रभाकर आंगले आणि रंजना कश्यप इत्यादिकांनी सरसरमणीय आणि अभ्यासपूर्ण स्वरूपात संगीतकलामैफलीची वर्णने केली आहेत. हा समृद्ध वारसा पुढे चालविण्याचा प्रयत्न वेर्लेकर सर्व प्रकारचे व्याप सांभाळून निष्ठेने करीत आहेत.

जनार्दन वेर्लेकर यांनी प्रतिभावंत संगीतकारांपैकी कुणाकुणावर लिहिले असे विचारण्यापेक्षा कुणाकुणावर लिहिले असे विचारावे लागेल. सुरुवातीच्या काळात पं. जीतेंद्र अभिषेकी यांच्यावर त्यांनी ‘एक अष्टावधानी स्वरयात्री’ हा अप्रतिम लेख लिहिला. ‘सूरलयीच्या नंदनवनातील कल्पतरू’ हा मल्लिकार्जुन मन्सूर यांच्यावरील लेखात त्यांच्या सम्यक व्यक्तिमत्त्वाचा मागोवा घेतला.
वेर्लेकर सातत्याने ख्यातनाम गायक-गायिकांवर आणि त्यांच्या संगीत मैफलींवर लिहीत आलेले आहेत. मास्टर दीनानाथ, लतादीदी, आशाताई भोसले, किशोरी आमोणकर, हृदयनाथ मंगेशकर, पं. भीमसेन जोशी, श्रुती सडोलीकर आणि अन्य प्रख्यात गायकांच्या गायनकलेवर अभ्यासपूर्ण लेख त्यांनी लिहिलेले आहेत. संगीत मैफलीचे ते रसग्रहण करीत असतात.

संगीतशास्त्रातील विशिष्ट परिभाषा वापरावी लागते. संज्ञा आणि संकल्पना समजावून घ्याव्या लागतात. प्रसंगविशेषी या परिभाषेचे उपयोजन त्यांनी केले आहे. पण ते वाजवीपुरतेच. त्यांचा ‘जार्गन्’ त्यांनी होऊ दिलेला नाही. मर्मग्राही विवेचन, समरसता आणि रसमयता या त्रिविध गुणांमुळे त्यांचे हे लेखन वाचनीय झालेले आहे. संगीताच्या क्षेत्रात ताल, लय, सूर सांभाळणार्‍या आणि गाण्यातील उत्कटता रसिकांच्या हृदयापर्यंत पोचविणारा वाद्यवृंद, सांथसंगत करणारे कलाकार यांच्या कलागुणांची बूज राखावी लागते, ती त्यांनी ठेवलेली आहे. पं. तुळशीदास बोरकर यांच्यासारख्या कुशल हार्मोनिअमपटूला ‘पद्मश्री’ मिळाली तेव्हा त्यांनी उत्स्फूर्तपणे त्यांच्यावर लेख लिहिला, हे याच रसिकतेचे द्योतक आहे.

गोमंतक ही पूर्वीपासून संगीताची भूमी म्हणून ओळखली जात आहे. पण मुक्तीनंतरच्या काळात या क्षेत्रात उत्थानपर्व उजाडले. कवळे येथील ‘सम्राट क्लब’ने शानदार पद्धतीने शास्त्रीय संगीताच्या मैफली घडवून आणल्या. ‘गोवा कला अकादमी’ने सूरश्री केरकर संगीत महोत्सव सुरू केला. आता तर गोव्यात अनेक ठिकाणी शास्त्रीय संगीताचे महोत्सव सुरू झाले आहेत. जनार्दन वेर्लेकर या महत्त्वाच्या संगीत मैफलींना हजर राहतात. त्या मैफलींचा मर्मज्ञतेने रसास्वाद घेतात. तेवढ्याच आत्मीयतेने त्या मैफलींचे रसग्रहण करणारे लेख लिहितात. संगीताची भूमी नांगरल्याशिवाय अस्सल रसिकतेची रोपटी वाढणार नाहीत, याची त्यांना जाणीव आहे. म्हणूनच समाजसन्मुख वृत्तीने त्यांनी हे लेखनकार्य मोठ्या निष्ठेने चालू ठेवलेले आहे. त्यांच्या या लेखनाचे अनेक चाहते आहेत. केवळ गोव्यातच नव्हे तर पुण्याला होणार्‍या सवाई गंधर्व संगीत संमेलनाला ते जात. संगीतावरील त्यांचे ममत्त्व मौलिक स्वरूपाचे आहे. गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर आणि त्यांच्या सुकन्या ख्यातनाम गायिका किशोरी आमोणकर कुर्डी गावच्या रवळनाथ मंदिरात संगीतमहोत्सव घडवून आणत असत. आपल्या संगीतप्रेमी सुहृदांसमवेत वेर्लेकर त्या मैफलींना हजर राहत. अशा एका महोत्सवाच्या प्रसंगी मोगुबाई कुर्डीकरांच्या हयातीतच वेर्लेकरांनी त्यांच्यावर लेख लिहिला होता.

संगीताव्यतिरिक्त संगीत नाट्यपरंपरा आणि नवनाट्य हा वेर्लेकरांच्या आवडीचा विषय आहे. म्हणूनच दीडशे वर्षांच्या संगीत नाट्यपरंपरेचे दर्शन घडविणारे डॉ. श्रीराम संगोराम यांच्याशी वेर्लेकरांचे मैत्र जुळून आले. ज्या व्यक्तींनी या विषयावर सकस लेखन केले आहे, त्यांच्याशी वेर्लेकर संपर्क ठेवतात. कमलाकर नाडकर्णी, गो. रा. जोशी आणि डॉ. वि. भा. देशपांडे इत्यादी ज्येष्ठ नाट्यसमीक्षकांशी त्यांची मैत्री जुळली ती यामुळेच.

नव्या पिढीतील डॉ. राजीव नाईक, मकरंद साठे, अमरेंद्र धनेश्‍वर, अंबरीश मिश्र व अविनाश भडकमकर यांचे नवनाट्यातील कर्तृत्व महत्त्वाचे. त्यामुळेच जनार्दन वेर्लेकरांचे ते निकटवर्ती झाले.
नवसाहित्यात नवी संवेदनशीलता आणणार्‍या मंदियाळीशी त्यांचे मैत्र आहे. जुन्या आणि नव्या पिढीतील अनेकांना वेर्लेकर आपलेच आहेत असे वाटते. समाजमानसात ज्यांच्याविषयी आदराची भावना आहे असे समर्पित वृत्तीने कार्य करणारे रामकृष्णबाब नायक वेर्लेकरांविषयी आपुलकी बाळगून आहेत.

जनार्दन वेर्लेकर यांच्या अमृतमहोत्सवपूर्तीच्या प्रसंगी ते शतायुषी व्हावेत अशी शुभेच्छा प्रकट करतो. ज्या प्रकारचे विधायक कार्य ते करीत आहेत त्यात त्यांना यश प्राप्त होवो. निरामयता लाभो. त्यांच्या कार्यात साथसंगत करणार्‍या सौ. वहिनींना आणि कुटुंबीयांस या प्रसंगी शुभेच्छा!