– विशांत वझे
अमृत म्हणजे मरण नसलेला. डिचोलीतील अमृतसिंग हा अवलिया गलितगात्र, मरणासन्न सापांसाठी, सरपटणार्या प्राण्यांसाठी आणि वन्यजिवांसाठी नावाप्रमाणेच ‘अमृत’ ठरलेला आहे. अमृतसिंग यांनी एकमेव ध्यास घेतलेला आहे- वन्यजिवांचे संरक्षण करणे. त्यानुसार वन्यजिवांचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी त्यांचा सारा वेळ खर्ची जातो आहे. आपली ही आवड जोपासना त्यांना वेळकाळ कशाचेही भान नसते. केवळ वन्यजिवांच्या रक्षणासाठी त्यांनी आपले जीवन वाहिलेले आहे. पर्यावरण रक्षणात साप या प्राण्याला अतिशय महत्त्व आहे. त्यासाठीच तर ‘नागपंचमी’ हा सण साजरा केला जातो. या सणाच्या माध्यमातून ‘साप हा आपला शत्रू नसून मित्र आहे’ हेच बिंबवण्याचा प्रयत्न असतो.
नोकरी-उद्योगधंदा सांभाळून दूरदृष्टीने समाजकारण, पर्यावरण रक्षण यासाठी वावरणारी समाजात अनेक माणसे आहेत. परंतु वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनासाठी उद्योगधंदा सोडून, नोकरीवर तुळशीपत्र ठेवून रात्रंदिन काम करणार्या अमृतसिंग यांची जीवनशैली आगळीवेगळीच आहे!
लहानपणी वडिलांनी सापांना मारू नये, तेच आपले संरक्षक आहेत ही दिलेली शिकवण त्यांनी आपल्या जीवनातील एक व्रत म्हणून स्वीकारली आणि कुसुमाग्रजांच्या कवितेतील ‘समोर एकच तारा’ या ध्येयाने त्यांनी मार्गक्रमण आरंभिले. सगेसोयरे, मित्रपरिवार यांचीही वन्यजीव संवर्धनाच्या मोहिमेत त्यांनी गय केली नाही.
वन्यजिवांसमोर तहानभूक, धनदौलत यांना ते काडीचीही किंमत देत नाहीत. अगदी प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत अमृतसिंग यांची अखंड धडपड चालू आहे.
डिचोलीतील एका इमारतीत उंच ठिकाणी, अडगळीच्या जागी पारव्याचा जीव संकटात सापडला होता. दूरध्वनीवरून अमृत यांना पारव्याच्या संदर्भात फोन केला जातो, आणि मग अग्निशमन दलाची शिडी घेऊन हा पट्टा आपल्या जिवावर उदार होऊन वर चढतो आणि मरणाच्या दारात असलेल्या त्या पारव्यासारख्या पक्ष्याला जीवदान देतो.
विहिरीत गाय पडली होती. तिला वर काढण्यासाठी खोल पाण्याची पर्वा न करता अमृत खाली उतरतात आणि गाईला जीवदान देतात. एकेकाळी गोव्यात मुबलक प्रमाणात असलेले गुराढोरांचे गोधन आता गायब झाले आहे. रस्त्यावर ठाण मांडून असणारी गुरे अपघाताला कारण ठरू लागली आहेत. एका बाजूला भारतासारख्या गोपालकृष्णाच्या देशात गुराढोरांची हेळसांड केली जात आहे, तर दुसर्या बाजूला अमृतसिंग कसायापासून गुराढोरांचे रक्षण व्हावे, ३३ कोटी देवतांचे अधिष्ठान असलेल्या गाईचे रक्षण व्हावे यासाठी पोलीस, वनखाते, अबकारी, चेकनाके असताना बिनदिख्खतपणे मांसासाठी गुरांची होणारी आयात रोखण्यासाठी जिवावर उदार होऊन कार्य करत आहे.
सरकारी यंत्रणा, कायदेकानून यांचे सुरक्षाकवच असताना अमृतसिंगसारख्या कार्यकर्त्याला वीर औक्षणीचे सामर्थ्य कुठून प्राप्त होते? ही खरे तर विचार करणार्या प्रत्येक व्यक्तीसाठी चिंतनीय बाब आहे.
आज अमृतसिंग प्राण्यांप्रति सारे करतच आहे, त्यासाठी त्यांनी संपादन केलेली अद्भुत क्षमता, कार्यकर्त्याची शैली आणि ध्येयाप्रति असलेली श्रद्धा कारणीभूत आहे. अमृतसिंग ही व्यक्ती नसून ती एक झपाटलेली चळवळ आहे.
जीवनामध्ये माणसे सतत आपल्या भोवताली प्रतिकूल परिस्थिती असल्याचे रडगाणे गात असतात. परंतु अमृतसिंगसारखी माणसे आर्थिक परिस्थिती, मनुष्यबळ याची कमतरता असतानाही निर्भीडपणे आपल्या ध्येयासाठी जीव ओतून काम करत आहेत.
कधी अमृतसिंग सापांच्या विषाची तस्करी करणार्या टोळीचे बिंग फोडतो, कधी जलस्रोतात जिलेटिनद्वारे स्फोट करून मासेमारी करणार्यांवरती पोलिसी कारवाई करण्यास पोलिसांना भाग पाडतो, तर कधी जीवनासाठी संघर्ष करणार्या बिबट्याला संकटातून वाचवतो. हे सारे करण्यामागे अमृतसिंग यांच्यामधील अदम्य उत्साह त्यांच्या ध्येयानेच निर्माण केलेला आहे.
होंडा येथून अमृतसिंग यांना फोन येतो. मोटरसायकलने ते त्वरित तिथे पोचतात. घरात फणा उभारून फुसफुस फूत्कार सोडत नाग उभा आहे. घरातल्या मंडळीची भीतीने गाळण उडालेली आहे. आजूबाजूचे लोक नाग असल्याने लांबून पाहणे पसंत करतात. अमृतसिंग एकटेच तेथे जातात आणि नागासारख्या त्या जहाल सापाला शिताफीने पकडून पिशवीत बंद करतात. त्याला मोटरसायकलने घेऊन जात असताना तो पिशवीच्या आतून अमृतसिंग यांचा चावा घेतो. अमृतसिंगना याची कल्पना येते. आणीबाणीच्या या प्रसंगात नागाने दंश केलेला असतानाही अमृतसिंग त्याला झिडकारून न टाकता पुन्हा शिताफीने पिशवीत घालतात आणि नागाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करतात. केवळ सापासाठी आपला क्षणाक्षणाचा जीव धोक्यात घालून, त्या जीवनमरणाच्या परिस्थितीतही ते सापाला मुक्त केल्यानंतरच दवाखान्यात दाखल होतात. अंगी विष भिनलेले असताना, असह्य वेदना होत असताना त्यांच्याकडे डॉ. शेखर साळकर पोचतात व त्यांना मणिपाल इस्पितळात हलवून उपचार केले जातात. जवळपास महिनाभर मृत्यूशी झुंज देत अमृतसिंग मृत्यूवर विजय मिळवतात.
राजनाग म्हणजे भुजंग. जगात जहरी सापांत सम्राट म्हणून गणला जाणार्या या सापाचा दंश म्हणजे भारतासारख्या देशात मृत्यूच. गोव्यात आणि भारतातल्या अन्य इस्पितळांतही राजनागाच्या दंशावर विषप्रतिबंधक लस उपलब्ध नाही. त्यामुळे किंगकोब्रा म्हटला की पाहणार्यांना धडकीच भरते.
परंतु अमृतसिंग यांनी आजपर्यंत १६ भुजंग राजनागांना जीवदान देण्याचे अतुलनीय कार्य केलेले आहे. हजारो सापांना आणि सरपटणार्या प्राण्यांना जीवनदान देण्याचे कार्य करणार्या अमृतसिंग यांनी डिचोलीत ‘ऍनिमल रेस्न्यू स्कॉड’ या नावाची संस्था स्थापना केलेली आहे. सापांना जीवदान देण्याचा आपल्याला मिळालेला वारसा परिसरातल्या तरुणांनीही पुढे चालवावा यासाठी अमृतसिंग त्या तरुणांना या संस्थेमार्फत प्रशिक्षण देण्यासाठी धडपडत असतात. आजपर्यंत २२ किंगकोब्रांना जीवनदान देताना अमृतसिंग यांनी स्वतः १६ व कार्यकर्त्यांनी ६ भुजंगांना जीवदान देण्याची किमया केलेली आहे.
दिसला साप की हाण काठी हे एकेकाळी गोव्यात जे सर्रास चित्र दिसत होते त्यात अमृतसिंग यांनी आमूलाग्र क्रांती घडवून त्यांना या वृत्तीतून परावृत्त केले आहे. त्यामुळे दिसला साप की करा फोन अमृतसिंगला असे समीकरणच निर्माण झाले आहे.
गोव्याच्या वेगवेगळ्या भागांत कुठे जॉन फर्नांडिस, तर कुठे विठ्ठल शेळके यांसारखे तरुण साप व सरपटणार्या प्राण्यांना वाचवण्यासाठी धडपडत आहेत. वन्यजिवांना वाचवण्यासाठी जिवावर उदार होत आहेत. आपली चळवळ सीमित न ठेवता अमृतसिंग सापाच्या अस्तित्वासाठी सतत धडपडत असतात. आपल्या परिसरात खरे तर केवळ चारच साप विषारी आहेत. ते म्हणजे नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे. हे चार विषारी साप वगळता आपल्या परिसरात आढळणारे अजगर, हरणहोळ, धामण, मांडुळ, पाणसर्प हे बिनविषारी असताना त्यांचीही आपण क्रूरपणे हत्या करतो. माणसांप्रमाणे सापालाही जगण्याचा अधिकार आहे, हे समजून घेण्याची मानसिकता लोप पावलेली आहे. त्यामुळे विषारी सापाच्या भीतीने बिनविषारी सापांची हत्या केली जात आहे. पूर्वजांनी याच कारणासाठी श्रावणात नागपंचमी, भाद्रपदात अनंत चतुर्थी यांसारखे उत्सव-विधी सापांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी निर्माण केलेले आहेत. परंतु आपण अमानवीपणे वागून सापांना यमसदनी पाठवण्यासाठी नेहमीच टपलेलो असतो.
अशा परिस्थितीत अमृतसिंग वर्षाला किमान १२०० ते १७०० सापांचे राज्यभरातून रक्षण करतात. आपल्या सुमारे २५० शिलेदारांना त्यांनी प्रशिक्षित करून हे सेवाकार्य करण्याची प्रेरणा दिलेली आहे.
आपले ध्येय निश्चित करून, सार्थ श्रद्धा ठेवून, कुणाची व कशाचीही पर्वा न करता अमृतसिंग सापांचे रक्षण करताहेत, हे खरे तर प्रसंशनीय आहे. पत्नी व दोन मुलांसोबत साध्या पद्धतीने जीवन जगणार्या अमृतसिंग यांना पैसा, प्रतिष्ठा हात जोडून उभी असताना त्यांच्याशी वैरत्व पत्करून वन्यजिवांच्या अस्तित्वासाठी सातत्याने धडपडत आहेत. त्यांची ही मानसिकता समाजाला, तरुणांसाठी प्रेरणा देणारी आहे.