Home बातम्या सरकार मोपा विमानतळाच्या बाजूने

सरकार मोपा विमानतळाच्या बाजूने

0

पीपल फॉर मोपाला श्रीपाद नाईक यांची ग्वाही

मोपा विमानतळाविषयी कोणीही विरोध केला तरी विद्यमान सरकार मोपाच्या बाजूने पूर्णपणे असून आपणही पेडणेकरांच्या बाजूने राहणार असल्याची ग्वाही खासदार श्रीपाद नाईक यांनी काल आगरवाडा येथे दिली.

आगरवाडा येथे एका कार्यक्रमाला नाईक आले असता पीपल फॉर मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी भेट घेऊन मोपा विषयी सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली असता खासदार नाईक यांनी ही ग्वाही दिली.

यावेळी पीपल फॉर मोपा संघटनेचे अध्यक्ष देवेंद्र प्रभुदेसाई, वसंत उर्फ आबा शेटगावकर, सचिव ऍड. प्रसाद शहापूरकर, मोरजीचे माजी सरपंच धनंजय शेटगावकर, आबा उर्फ शांताराम राऊत, शाणू दाभोलकर, सखाराम कोरगावकर व इतर कार्यकर्ते हजर होते.

सध्या लोकसभेच्या निवडणुकांवर डोळा ठेवून पेडणे तालुक्यात होऊ घातलेल्या मोपा विमानतळाविषयी सरकार व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सावध भूमिका घेवून मोपाच्या विरोधात वेगवेगळ्या माध्यमातून वक्तव्य केले जात आहे. खासदार श्रीपाद नाईक यांनी आपली भूमिका मोपा विषयी जाहीर करावी, यासाठी संघटनेने खासदार नाईक यांची भेट घेऊन स्पष्टीकरण मागितले. खासदार नाईक यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना मोपा ही देशाच्या व पर्यटनाच्या दृष्टीने काळाची गरज असून आपण सदैव मोपा विमानतळाच्या समर्थनार्थ पेडणेकरांच्या बाजूने राहणार असून मोपा कुणीही रोखू शकणार नाही, पेडणेकरांनी बिनधास्त रहावे, अशी ग्वाही दिली. मोपा विमानतळामुळे केवळ पेडण्याचा नव्हे तर गोव्याबरोबरच देशाच्या विकासाला हातभार लागणार आहे, असे ते म्हणाले. मोपा विमानतळामुळे पर्यटनक्षेत्राचा व किनारी भागाचा गतीने विकास होईल, नवनवीन प्रकल्प येतील, जेणे करून इथल्या बेरोजगारीचा प्रश्‍न सुटणार आहे, असेही ते म्हणाले.

पेडणेकरांनाच नव्हे तर सबंध गोव्याला मोपा हवा आहे. जे काही विरोध करतात ते आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा अयशस्वी प्रयत्न करत असून त्यांच्या भूलथापाना कुणीही बळी पडू नये. विद्यमान सरकार मोपा केल्याशिवाय शांत बसणार नाही, आतापर्यंत भाजपाने जी जी जनतेला आश्‍वासने दिली, त्या आश्‍वासनांची पूर्तता केल्याचे खासदार नाईक यांनी सांगितले.