Home बातम्या सरकार पाडण्यासाठी मलाही निमंत्रण होते

सरकार पाडण्यासाठी मलाही निमंत्रण होते

0

आमदार लोबो यांची कबुली

विद्यमान भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार पाडण्याच्या बैठकीचे निमंत्रण आपल्याही होते. मात्र आपण त्या बैठकीला गेलो नाही असा गौप्यस्फोट सत्ताधारी भाजप आमदार मायकल लोबो यांनी काल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर विदेश दौर्‍यावर असताना राज्यात सरकार पाडण्यासाठी बैठका झाल्याच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. या विषयीचे पडसाद भाजप राज्य कार्यकारिणी बैठकीतही उमटले होते.

आपल्याला काही अपक्ष व विरोधी आमदारांनी गृहीत धरले असल्याचा दावा लोबो यांनी वृत्तवाहिनीवरील मुलाखतीवेळी केला आहे. मंत्री व काही आमदार यांच्यात मतभेद असल्याची कबुली यावेळी लोबो यांनी दिली. याच अनुषंगाने बोलताना पर्यटनमंत्री दिलीप परूळेकर यांची कार्यपद्धती आपल्याला आवडत नाही असे ते म्हणाले. मंत्री या नात्याने त्यांनी आमदारांना विश्‍वासात घ्यायला हवे असे ते म्हणाले.

भाजपने यापुढे जोसेफ सिक्वेरा यांना तिकीट दिले तरी आपली हरकत नाही. सिक्वेरा हे तिकीटासाठी इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले.

किनारी भागात युवकांमध्ये अंमली पदार्थ सेवनाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. हा व्यवहार करणारे बहुतेक गोमंतकीय आहेत. मात्र त्यात राजकारणी नाहीत असा दावा त्यांनी केला.