28 C
Panjim
Sunday, September 27, 2020

सरकारी योजनांतच गुंतवणूक करा!

 

  • शशांक मो. गुळगुळे

एखाद्या गुंतवणुकीबाबत संशय वाटत असेल तर अशा गुंतवणुकीतील परताव्याचा विचार सोडून देऊन या गुंतवणुकीतून आपली मुद्दल घेऊन बाहेर पडावे. प्रत्येकाने आपल्या गुंतवणुकीबाबत सदैव दक्ष राहायला हवे.

 

आपल्या देशाची अर्थव्यवस्था अगोदरच अंथरुण धरून होती, त्यात आता या प्रदीर्घ ‘कोरोना’ची भर पडली. त्यामुळे माणसांप्रमाणे अर्थव्यवस्थाही ‘क्वारंटाईन’मध्ये गेली आहे. जगातले बरेच प्रगत देश- ज्यांच्याशी आपले आर्थिक व्यवहार होत असतात- अशा देशांच्या मानगुटीवरही ‘कोरोना’ बसला असल्यामुळे प्रत्येक देशाचेच अर्थव्यवस्था सावरण्यासाठी आता विलगीकरण झालेले आहे. म्हणजे प्रत्येक देशच ‘क्वारंटाईन’मध्ये गेला आहे.

या महामारीची झळ देशातल्या प्रत्येक माणसाला बसली आहे. प्रत्येक माणूस राज्य व केंद्र शासनाकडून मदतीची अपेक्षा करतो आहे. राज्यसरकारेही केंद्राकडून मदतीची अपेक्षा करीत आहेत. केंद्राकडे कुबेराचा खजिना थोडाच आहे, तरीही केंद्र सरकार जनतेचे जीवन जास्तीत जास्त सुसह्य व्हावे म्हणून योग्य निर्णय घेत आहे.

तरीही जे सातत्याने गुंतवणूक करतात त्यांनी सद्यस्थितीत कुठे गुंतवणूक करावी हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. कित्येक ज्येष्ठ नागरिक व अन्य काही नागरिकांची गुजराण ही गुंतवणुकीवर चालते. सध्याच्या परिस्थितीत देशाला आर्थिक मंदीतून बाहेर काढण्यासाठी उद्योगांना कर्जे कमी दराने उपलब्ध करून द्यावी लागणार व बँक कर्जावर कमी व्याजदर आकारू लागल्यावर बचतीवरही कमी व्याज देणार. सध्या सर्व सार्वजनिक उद्योगातील बँका बचतीवर साडेतीन ते चार टक्के व ठेव मुदतींवर ६ ते ६.५ दराने व्याज देत आहेत.

गुंतवणुकीत जेवढी जोखीम जास्त तेवढा परतावा अधिक व जेवढी जोखीम कमी तेवढा परतावा कमी हा गुंतवणुकीचा नियम आहे. पैसा कुठे गुंतविला जात आहे? यावर जोखमीचे स्वरूप अवलंबून असते. जादा व्याजदराच्या भूलथापांना बळी पडणारे किंवा शेअर बाजारात झटपट पैसा मिळविण्यासाठी चुकीची गुंतवणूक करून नंतर पश्‍चात्ताप करून घेणारी बरीच मंडळी आपण पाहतो. गुंतवणूक म्हटली की जोखीम ही आलीच. शासनाच्या गुंतवणूक योजनांत गुंतवणूक केली तरी त्यातही अल्पशी जोखीम असतेच. कर्ज देताना कर्ज देणारी संस्थाही जोखीम घेतच असते. सध्या गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांकडे बरेच पर्याय उपलब्ध आहेत.

सध्याच्या कोरोनामुळे आपलीच काय, इतरही सर्व देशांची अर्थव्यवस्था पुढील तीन ते चार वर्षे अतिशय तणावग्रस्त राहणार आहे. नवीन रोजगार उपलब्ध होणारच याची खात्री नाही. पण रोजगारावर असलेल्यांचे रोजगार टिकले तरी पुष्कळ झाले! परदेशात स्थायिक झालेले कित्येक भारतीय तिकडील पाश तोडून परत स्वतःच्या देशात येत आहेत. अशांनाही येथे रोजगार मिळावा अशी आशा असणार. कोणतेही सरकार प्रत्येक भारतीयाचे समाधान करू शकणार नाही. ‘सबका साथ लेकिन सबको आनंद नहीं’ ही वस्तुस्थिती असणार आहे. पण शासनाची धोरणेही जास्तीत जास्त लोकांचे जीवन सुखी करणारे असावयास हवे.

शेअर बाजार, म्युच्युअल फंड, बँकांतील तसेच कंपन्यांतील मुदत ठेव, सोन्यात गुंतवणूक असे बचतीचे अनेक प्रकार आहेत. सोन्यात सध्या दोन प्रकारे गुंतवणूक करता येते. एक म्हणजे सोने धातू स्वरूपात विकत घेणे व दुसरे सोने बॉण्ड स्वरूपात विकत घेणे. जमीन खरेदी, सदनिकांत गुंतवणूक, सरकारी योजनांत गुंतवणूक असे विविध गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत.

शेअर बाजारात काही दिवस फार मोठी पडझड झाली. काही दिवस थोडासा सावरला असे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर नवीन गुंतवणूकदारांनी सध्या यात प्रवेश करू नये. अगोदरपासून ज्यांची गुंतवणूक आहे त्यांनी परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घ्यावेत. म्युच्युअल फंडात बाजाराशी निगडित फंडात गुंतवणूक करण्यापेक्षा ‘डेट’मध्ये गुंतवणूक करण्याच्या फंडात गुंतवणूक केल्यास परतावा कमी मिळाला तरी जोखीम कमी असते. सद्यस्थितीत जास्त जोखीम घेऊ नये. आणि कोणत्याही परिस्थितीत गुंतविलेली मूळ रक्कम बुडता कामा नये याबाबत दक्ष राहावे. बँकांतील गुंतवणुकीमध्ये सार्वजनिक उद्योगातील बँकांना प्राधान्य द्यावे. व्याज कमी मिळेल पण जोखीम नाही. कोरोनामुळे पुढची दोन-तीन वर्षे सर्व बँका तोट्यात जाण्याची शक्यता आहे. सोन्याच्या बॉण्ड्‌समध्ये गुंतवणूक करावी. हे बॉण्ड्‌स सरकारमार्फत विक्रीस काढले जातात. जोखीम कमी. साधारणपणे अडीच टक्के दराने व्याजही मिळते. धातूच्या स्वरूपात खरेदी केले तर व्याज मिळत नाही. कंपन्या चांगल्या असतील, ज्यांचा ट्रॅक रेकॉर्क चांगला आहे अशा कंपन्यांच्या मुदतठेवींत गुंतवणूक करण्यास हरकत नाही, पण यात जोखीम फार असते.

जमीन खरेदीत कटकटी फार असू शकतात. सर्व कायदेशीर बाजू नीट तपासाव्या लागतात. सद्यस्थितीत या गुंतवणुकीपासून लांब राहावे. सदनिका गुंतवणुकीला सध्या उठाव नाही. अगोदरच कित्येक तयार सदनिका विक्री न होता पडून आहेत म्हणून सध्या तरी यात गुंतवणुकीचा विचार करू नका. सरकारी योजनांत (सर्व प्रकारच्या) डोळे झाकून गुंतवणूक करावी. सरकारलाही सध्या राष्ट्रउभारणीसाठी पैशांची गरज आहे. एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून सरकारी योजनांत गुंतवणूक करावी.

परताव्याचा दर हा गुंतवणुकीनुसार बदलतो. काही परताव्यांचे दर निश्‍चित असतात. ते म्हणजे मुदतठेवींतील गुंतवणूक. शेअरचे दर शेअर बाजार चालू असताना सतत वर-खाली होत असतात. याला ‘व्होलटाइल मार्केट’ म्हणतात. डॉलरचे दरही व्होलटाइल असतात. शेअर विकत घेताना किंवा डॉलर विकत घेताना किंवा विकताना जो दर बाजारात असेल त्या दराने तुम्हाला व्यवहार करावे लागतील. कुठेही गुंतवणूक केली तरी बाजारातली स्थिती, शासकीय निर्णय, आंतरराष्ट्रीय परिस्थिती, युद्ध किंवा युद्धसदृश्य परिस्थिती, आर्थिक मंदी, नैसर्गिक कोप, गुंतवणूक स्वीकारणार्‍या संस्थांच्या पदाधिकार्‍यांचा भ्रष्टाचार या सर्वांचा परिणाम गुंतवणुकीवर होतो.

गुंतवणूक करताना अव्वल असणारी एखादी कंपनी, संस्था किंवा उद्योगगृह तसेच यंत्रणा कालौघात अव्वल राहीलच असे नाही. काही कारणांनी ती अडचणीतही येऊ शकते. सहारा उद्योगात गुंतवणूक केलेले आज हात चोळीत बसले आहेत. बांधकाम उद्योगातील कंपनी डीएसके समूह. त्यांच्या फाजील आत्मविश्‍वासामुळे आज कंपनीचे प्रवर्तक/भागीदार/संचालक गजांआड आहेत व गुंतवणूकदार ज्यांच्यात प्रामुख्याने मराठी भाषिक फार मोठ्या प्रमाणावर आहेत ते रडत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदाराने अधिक परताव्याच्या मागे न जाता, सुरक्षित गुंतवणूक करावी हे उत्तम! पैसे एकाच ठिकाणी न गुंतविता ते अनेक ठिकाणी गुंतवावेत. कारण सर्व गुंतवणुकीचे पर्याय एकाचवेळी अडचणीत येण्याची शक्यता फार कमी असते. व्याज किंवा लाभांश कमी मिळाला तरी चालेल, पण मुद्दल सुरक्षित राहावयास हवी हा गुंतवणूकदाराचा दृष्टिकोन असावयास हवा. सार्वजनिक उद्योगातील बर्‍याच बँका ज्यांचे बुडित कर्जांचे प्रमाण बरेच असल्यामुळे त्या गेली काही आर्थिक वर्षे तोट्यात होत्या. परिणामी भागधारकांना लाभांश देत नव्हत्या आणि आता तर केंद्र सरकारने फतवा काढून कोरोनामुळे आर्थिक संकट उभे राहिले असल्यामुळे कोणत्याही कंपनीने/बँकांनी/पतसंस्थांनी/लोकमान्यसारख्या संस्थांनी लाभांश देऊ नये असे सांगितले आहे.

सहकारी बँकांचे शेअर ज्यांच्याकडे आहेत त्यांनी ते परत करावेत व स्वतःचे पैसे घ्यावेत. या शेअरमुळे अगोदरसारखी करसवलतही मिळणार नाही व लाभांशही नाही. मग ही डेड इन्व्हेस्टमेंट हवी कशाला? एखाद्या गुंतवणुकीबाबत संशय वाटत असेल तर अशा गुंतवणुकीतील परताव्याचा विचार सोडून देऊन या गुंतवणुकीतून आपली मुद्दल घेऊन बाहेर पडावे. प्रत्येकाने आपल्या गुंतवणुकीबाबत सदैव दक्ष राहायला हवे.

हलगर्जीपणा नको

हलगर्जीपणे गुंतवणूक करणे हा सर्वात मोठा धोका व जोखीम मानली जाते. मुद्दल व व्याज हे दोन्ही गमावण्याची भीती यात असते. अनेक कंपन्या, खाजगी वित्तीय संस्था या कमी दिवसांत जादा व्याजदराचे प्रलोभने दाखवितात. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन योजना जाहीर करतात. याला गुंतवणूकदार भरीस पडतो. परिणामी त्याचे पैसे अडकतात/बुडतात. मार्केटचा व्याजाचा जो ‘ट्रेण्ड’ आहे त्याहून जर अधिक व्याज देणारी योजना असेल तर त्यात धोका आहे हे समजून अशात गुंतवणूक करू नये. अशा योजनांत बुडालेले पैसे मिळण्यासाठी न्यायालयात दाद मागायलाही बराच पैसा लागतो. कुठेही गुंतवणूक करताना त्या कंपनीचे/पतसंस्थेचे क्रेडिट रेटिंग तपासून घ्यावे. कर्जरोख्यांत गुंतवणूक करताना क्रेडिट रेटिंग न तपासता गुंतवणूक करू नये. कोणत्याही कंपनीचे शेअर फार घसरले आहेत, कमी किमतीत मिळत आहेत म्हणून विकत घेऊ नका. अशांत गुंतवणूक करणे ही फार मोठी जोखीम ठरू शकते.

शेअर बाजारात गुंतवणूक असणार्‍यांनी रोजच्या रोज त्यांची गुंतवणूक असलेल्या शेअरच्या किमतींकडे लक्ष द्यावे. एखाद्या कंपनीचे शेअर सारखे घसरत असतील तर ती धोक्याची घंटा समजून ते विकून आपले मिळतील तेवढे पैसे घ्यावेत. आपल्याला कधीकधी अकस्मात पैशांची गरज भासू शकते, त्यामुळे आपली काही गुंतवणूक ही सहज ‘लिक्विड’ होणारी हवी.

 

 

 

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

पर्यटनावर कोरोनाचे सावट

सौ. प्रतिभा वासुदेव कारंजकरफोंडा खरं तर बरेच महिने घरात राहून लोक उबगले आहेत. पण बाहेर कुठे पडायला घाबरत...

गारवा तुझ्या आठवणींचा

सुरज गायकवाड ‘‘आई, दूध उतू चाललंय! आणि ती खिडकी बंद कर ना, पावसाचं पाणी सर्वत्र ओट्यावर पसरलंय.’’ निशाचा...

कावळ्याची शिकवण

पल्लवी भांडणकरफोंडा कावळासुद्धा किती निसर्गप्रेमी आहे ना! माणसाप्रमाणे स्वार्थी नाही काही. झाडाला कुठेही न दुखावता आपल्याला हवी असलेली...

‘मानसिकता’ बदलायला हवी ः ल्यूक कुतिन्हो

समग्र आरोग्यसेवेच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवलेले आणि जीवनशैली प्रशिक्षक असलेले ल्यूक कुतिन्हो मारिया फर्नांडिस यांनी बालपणीचे जीवन परदेशात निरनिराळ्या ठिकाणी व्यतीत...

विदारक साटेलोटे

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून बाहेर निघालेली अमली पदार्थ व्यवहाराची भुते आता बॉलिवूडमधील बड्या बड्यांचे बुरखे फाडत निघालेली आहेत. आतापर्यंत दीपिका पडुकोण,...

ALSO IN THIS SECTION

युद्धसज्जता आणि मुत्सद्दीपणा

प्रा. अशोक ढगे युद्धासाठी लष्कर सातत्यानं सज्ज ठेवावं लागतं. गेल्या पाच महिन्यांपासून भारत आणि चीनमधले संबंध तणावपूर्ण बनले...

गद्य-पद्य वेचे आणि मुलांची जडणघडण

(पुन्हा एकदा…) डॉ. सोमनाथ कोमरपंत कविता सूत्रमय असते; म्हणून ती लक्षात राहते. ती मंत्रमुग्ध आहे;...

दिवाळी अर्थव्यवस्थेला उजाळा देईल?

शशांक मो. गुळगुळे दिवाळी या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी साजरी करू, पण जीवच गेला तर काय करणार?...

अनलॉक

पौर्णिमा केरकर ‘मी’चा सुजाण प्रगल्भ विचारच ‘कोरोना’ला हरवू शकतो! ‘कोरोना’सोबत जगण्याची सवय तर आता करावीच लागेल. हा नवा...

कावा

दत्ताराम प्रभू-साळगावकर अशा लोकांचं वागणं प्रामाणिकपणाचं म्हणजे जणू ‘साधू’सारखं वाटतं. पण ते असतात पक्के संधी‘साधू’! आपण महत्त्वाचे निर्णय...