राज्याच्या मुख्य सचिवांकडून मागवला अहवाल; मोपा-पेडणे येथील तरुणाने केली होती तक्रार
राज्यात गाजत असलेल्या सरकारी नोकरी घोटाळ्याची दखल राष्ट्रपतींच्या कार्यालयाकडून घेण्यात आली आहे. गोव्याच्या मुख्य सचिवांनी त्यासंबंधीचा अहवाल सादर करावा, असे निर्देश राष्ट्रपतींच्या कार्यालयातून मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत. मोपा पेडणे येथील ज्ञानेश्वर वरक या तरुणाने सरकारी नोकरी घोटाळ्याच्या अनुषंगाने राष्ट्रपती कार्यालयाकडे 10 डिसेंबर रोजी लेखी तक्रार ई-मेलद्वारे केली होती. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 डिसेंबरला त्याला उत्तरादाखल राष्ट्रपती कार्यालयाकडून ई-मेल प्राप्त झाला.
ज्ञानेश्वर वरक या तरुणाने सरकारी नोकरी घोटाळ्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि दक्षता खात्याकडे लेखी तक्रार केली होती.
नोकरी घोटाळ्यातील एक प्रमुख संशयित आरोपी पूजा नाईक हिने आपण 60 जणांना सरकारी नोकरी मिळवून दिल्याचा दावा केल्यानंतर, गेल्या पाच वर्षांत विविध खात्यांमध्ये झालेल्या सरकारी नोकरभरतीच्या परीक्षेवेळी उमेदवारांचे हजेरी पत्रक आणि ओएमआर शीटवरील सहीची फेरतपासणी करण्यात यावी, अशी मागणी ज्ञानेश्वर वरक यांनी आपल्या तक्रारीतून केली होती.
पैसे घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्यातील नोकऱ्या विकल्याचा आरोप पणजीचे आमदार आणि मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी भाजप सरकारच्या मागील कार्यकाळात केला होता. त्यानंतर दक्षता खात्याच्या तीन सदस्य समितीने सरकारला एक अहवाल दिला होता. या अहवालामध्ये परीक्षेवेळचे हजेरी पत्रक आणि ओएमआर शीट यांच्यावर असलेली उमेदवाराची सही, आणि शाहीची तपासणी करावी, अशी सूचना करण्यात आली होती. या समितीने आणखी काही सल्ले देखील सरकारला दिले होते.
मात्र सगळ्याकडे दुर्लक्ष करून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्या अहवालातील फक्त फेरपरीक्षा घेणे आणि पूर्वी ज्या ठिकाणी परीक्षा घेतली होती, त्या ठिकाणी घेऊ नये हे दोनच सल्ले स्वीकारले. याचाच परिणाम म्हणजेच राज्यातील नोकरी घोटाळा, असा आरोप वरक यांनी तक्रारीत केला होता.
गेल्या पाच वर्षांतील झालेल्या नोकरभरतीची फेरपडताळणी करण्यात यावी. त्यातून नेमका भ्रष्टाचार कुठे झाला, कोणी व कसे पैसे देऊन नोकऱ्या मिळवल्या आहेत ते स्पष्ट होईल, असे वरक यांनी म्हटले आहे.
दरम्यान, काही उमेदवारांना कनिष्ठ दर्जाच्या पदांच्या परीक्षेत अत्यंत कमी गुण मिळाले होते; मात्र नंतर वरिष्ठ पदांच्या परीक्षेत 98 ते 99 गुण मिळवण्यात त्यांनी यश मिळवले होते. गोवा पोलीस खात्यात असा सावळा गोंधळ सर्वात जास्त झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे अशा उमेदवारांनी कोणती जादूची कांडी वापरली हे शोधून काढण्याचे आव्हान आता सरकार पुढे उभे झाले आहे.