सरकारी खात्यातील रिक्त पदे भरण्याची प्रत्येक खात्याची जबाबदारी आहे. रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया आगाऊ सुरू करावी, असा निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने एक याचिका निकाताल काढताना बुधवारी राज्य सरकारला दिला. नियोजन आणि सांख्यिकी संचालनालयातील सांख्यिकी अधिकारी रंजन हिंदे यांनी खात्यातील रिक्त उपसंचालक पद भरण्याबाबत गोवा सरकारच्या मुख्य सचिवांविरुद्ध एक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठत दाखल केली होती. उच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. उपसंचालक पद येत्या 1 सप्टेंबरला रिक्त होणार आहे. या पदावर काम करणारा अधिकारी गतवर्षी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याला एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतवाढ 30 ऑगस्ट 2025 ला पूर्ण होणार आहे, अशी माहिती न्यायालयाला देण्यात आली. न्यायालयाने नियोजन आणि सांख्यिकी उपसंचालक पद भरण्याचा सरकारला निर्देश देऊन याचिका निकालात काढली आहे.

