सरकारी कार्यालये, औद्योगिक वसाहती सुरू

0
148

 

>> लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतर रस्ते गजबजले

लॉकडाऊनच्या नियमात थोडी शिथिलता दिल्यानंतर राज्यातील सरकारी कार्यालये, औद्योगिक वसाहतीतील उद्योग सुरू करण्यात आल्याने राजधानी पणजीसह पर्वरी परिसरातील प्रमुख रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहनांच्या संख्येत काल एकदम वाढ झाली.

साधारण महिनाभर वाहनांविना सुनसुने बनलेले रस्ते पुन्हा एकदा दुचाकी व चार चाकी वाहनांनी गजबजू लागले आहेत. सरकारी, खासगी आस्थापनात काम करणारे कामावर जाण्यासाठी खासगी वाहनांचा वापर करू लागल्याने रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढली आहे. सरकारी कार्यालये कमीत कमी कर्मचार्‍यांसह सुरू करण्यात आली आहेत. कार्यालयाच्या कामकाजासाठी तीन पाळ्यांमध्ये वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. कर्मचार्‍यांना आवश्यक साधनसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सरकारी कार्यालयात नागरिकांची कामे पहिल्या टप्प्यात केली जाणार नाहीत. सरकारी यंत्रणेला गरजू कामांना प्राधान्य देण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली

 

पोलिसांकडून सूचना

राज्यातील सरकारी कार्यालये, उद्योग व्यवसाय सुरू करण्यास मान्यता देण्यात आल्यानंतर रस्त्यावरील वाहनांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी सामाजिक अंतर राखण्यासाठी दुचाकी वाहनांवर एक व्यक्ती आणि कारगाडीत दोन व्यक्तींना वाहतूक करण्याबाबत सूचना जारी केली. तथापि, या सूचनेची प्रथम टप्प्यात कडक कार्यवाही केली जात नाही. केवळ पोलिसांकडून दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना नवीन सूचनेबाबत माहिती देऊन पालन करण्याची सूचना केली जात आहे. तर, काही ठिकाणी वाहन चालकांवर कारवाई केली जात आहे.

राजधानी पणजीमध्ये वाढलेल्या वाहनांच्या वाहतुकीमुळे अनेक नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्ण नसल्याचे जाहीर करण्यात आलेले असले तरी, शेजारील राज्यात कोरोना रुग्ण आणि राज्यात संशयास्पद रुग्ण बांबोळी येथील गोमेकॉच्या कोरोना खास विभागात दाखल होत असल्याने सावधगिरी बाळगण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

या भागातील मुख्य रस्त्यावरील वाहनांची तपासणी करण्यासाठी पोलिसांनी रस्त्यावर ठिकठिकाणी बॅरिकेट उभी करून अडथळा तयार करून वाहनांची तपासणीचे काम हाती घेतले. दुचाकी व चारचाकी वाहन चालकांना नवीन सूचनेबाबत माहिती देऊन जागृती केली  केली आहे. ह्या जागृतीनंतर नवीन नियमांचा भंग करणार्‍याला दंड ठोठावण्यास सुरुवात केली जाणार आहे,

अशी माहिती पोलीस खात्याच्या सूत्रांनी दिली.

 

दुचाकीवरून एक तर

कारमधू दोघांना परवानगी

रस्त्यावरील पोलीस दुचाकी वाहनावर दोन व्यक्ती बसणार्‍यांना केवळ एकाच व्यक्तीला मान्यता असल्याची माहिती देऊन जागृती करीत होते. तसेच चारचाकी वाहनांमध्ये केवळ दोन व्यक्तींना प्रवास करण्यास मान्यता असल्याची माहिती देऊन वाहन चालकांना सामाजिक अंतर राखण्याची सूचना केली जात होती. पोलिसांकडून ठिकठिकाणी वाहने अडवून तपासणी केली जात असल्याने रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

लॉकडाऊनमधील नियम शिथिल करण्यात आल्याने पोलिसांनी दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी लागू केलेल्या नवीन नियमाबाबत वाहन चालकांत उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली आहे. वाहन असलेल्या कुटुंबासाठी हा नियम अन्यायकारक ठरत असल्याची चर्चा समाजमाध्यमावर सुरू झाली आहे.

पणजी कदंब स्थानकावर लोकांची वर्दळ वाढली. लॉकडाऊनमुळे साधारण  महिनाभर कदंब बसस्थानकावर शुकशुकाट होता. कदंब महामंडळाने राज्यातील सरकारी कार्यालये, उद्योग सुरू करण्यास मान्यता दिल्याने  प्रवासी वाहतूक सुरू केल्याने कदंब बसस्थानक पुन्हा एकदा प्रवाशांनी गजबजू लागले आहे.

राजधानी पणजी शहरातून विविध भागात कदंबच्या बस वाहतूक करून लागल्या आहेत. राज्याच्या विविध भागातून कदंब बसगाड्या राजधानीत दाखल होत आहेत. या कदंब बसगाड्यात मर्यादित प्रमाणात सरकारी कर्मचार्‍यांना प्रवेश दिला जात आहे.

राज्यातील २३ औद्योगिक वसाहतील काही उद्योग सुरू करण्यात मान्यता दिली आहे. संबंधित कंपनीला कर्मचार्‍यांची वाहतूक व इतर सुविधा उपलब्ध करण्याचे बंधन घालण्यात येत आहे. औद्योगिक वसाहतीतील फिल्ड मॅनेजरकडून उद्योग सुरू करण्यासाठी मान्यता दिली जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.