सरकारी कार्यालयांचे कामकाज १५ पासून तीन पाळ्यांत सुरू

0
130

 

राज्यातील सरकारी कार्यालयांचे कामकाज येत्या १५ एप्रिल २०२० पासून पूर्ववत केले जाणार आहे. सरकारी कार्यालयातील कर्मचार्‍यांची गर्दी टाळण्यासाठी ५० टक्के कामगारांना आलटून पालटून कामावर बोलविण्याची सूचना करण्यात आली आहे. कार्यालयातील कामांसाठी कर्मचार्‍यांचे तीन गट, कामाच्या ठिकाणी सॅनिटायझर्स, हॅण्ड वॉश, पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्याची सूचना करण्यात आली आहे.

लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा देणारी खाती वगळता अन्य खात्याचा कारभार ठप्प झाला. राज्य सरकारने सोमवार १३ एप्रिलपासून ठप्प कारभार पुन्हा सुरू करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली. या दिवशी सरकारी कार्यालयात आएएस, गोवा नागरी सेवा, खाते प्रमुख, कनिष्ठ अभियंते या पातळीवरील अधिकार्‍यांनी कार्यालयात उपस्थिती लावली. सरकारी कार्यालयात कर्मचार्‍यांची गर्दी टाळण्यासाठी खातेप्रमुखांना योग्य नियोजन करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे खातेप्रमुखांकडून कर्मचार्‍यांसाठी वेळापत्रके तयार करण्यात आली आहेत.

तीन पाळ्यांत कामकाज

१५ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंतच्या काळासाठी सरकारी कार्यालयातील  कामगारांचे कामासाठी सकाळी ९ ते संध्याकाळी ४, सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५ आणि सकाळी १० ते संध्याकाळी ६ अशा काळात काम करण्यासाठी तीन गट तयार करण्याची सूचना केली आहे. काही सरकारी कर्मचारी घरातून काम करणार आहेत. घरातून काम करणारे कामगार मोबाईलवर उपलब्ध असले पाहिजे. तसेच, कार्यालयात येण्याची सूचना केल्यास त्यांना कार्यालयात यावे लागेल. खातेप्रमुखांनी कर्मचार्‍यांच्या बैठका घेऊ नयेत. गरज भासल्यास व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून विचारविनिमय करावा, असे आदेशात म्हटले आहे.

कदंब बससेवा

सरकारी कर्मचार्‍यांच्या सोयीसाठी कदंब महामंडळाकडून बससेवा उपलब्ध केली जात आहे. लॉकडाऊनच्या काळात कदंब महामंडळाकडून ३१ बसगाड्या सरकारी कर्मचार्‍यांच्या वाहतुकीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.