सरकारने ताब्यात घेतलेल्या जीवनावश्यक वस्तू त्वरित जनतेला पुरवाव्यात ः कॉंग्रेस

0
117

 

गोवा सरकारने जीवनावश्यक वस्तूंचा आपल्या ताब्यात ठेवलेला साठा विनाविलंब मुक्त करावा तसेच सार्वजनिक वितरण संस्थेद्वारे तो राज्यातील लोकांना पुरवण्याची सोय करावी अशी मागणी काल कॉंग्रेस पक्षाने एका पत्रकाद्वारे केली. सरकारने जीवनावश्यक वस्तूंचा साठा आपल्या ताब्यात ठेवल्याने राज्यात या वस्तूंची कृत्रिम टंचाई निर्माण झाली असल्याचे पक्षाचे प्रसार माध्यम निमंत्रक ट्रॉजन डिमेलो यांनी स्पष्ट केले आहे.

जीवनावश्यक वस्तू परराज्यातून घेऊन येणारी वाहने सरकारने राज्याच्या सीमांवर अडवू नयेत. तसेच राज्यातही एका शहरातून दुसर्‍या शहरात जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणार्‍या वाहनांना अडथळा करू नये अशी सूचना श्री. डिमेलो यांनी केली आहे. राज्यातील औषधालयांतही वेळच्यावेळी औषधांचा पुरवठा होईल याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राज्यातील लोकांना घरपोच जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी कित्येक कॉंग्रेस कार्यकर्ते स्वयंसेवक बनण्यास तयार आहेत. मात्र या कार्यकर्त्यांना सरकार पासेस मंजूर करत नसल्याने मनात असूनही या कॉंग्रेस कार्यकर्त्यांना लोकांना सेवा देता येत नसल्याचे डिमेलो यांनी म्हटले आहे.

राज्यातील उपजिल्हाधिकारी व अन्य प्रशासकीय अधिकार्‍यांनी कॉंग्रेस तसेच अन्य बिगर भाजप कार्यकर्त्यांना व समाजसेवकांना स्वयंसेवक पासेस न देण्याचे जे धोरण अवलंबिले आहे त्याला कॉंग्रेस पक्षाने तीव्र आक्षेप घेतला आहे असे डिमेलो यांनी स्पष्ट केले आहे. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी या संबंधी राज्याचे मुख्य सचिव परिमल राय यांच्याकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे असेही डिमेलो यांनी म्हटले आहे.

सध्या़ पूर्णत्वाकडे आलेले मडगाव येथील जिल्हा इस्पितळ ताब्यात घेऊन पंधरा दिवसांच्या आत ते सुरू केले जावे यासाठी कॉंग्रेस आमदार ऍलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी ऑनलाईन सह्यांची मोहीम सुरू केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर सरकारने वरील इस्पितळ सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगून सरकारच्या या निर्णयाचे कॉंग्रेस पक्ष स्वागत करत असल्याचे डिमेलो यांनी स्पष्ट केले.

गोवा़ प्रदेश कॉंग्रेस समितीची काल पक्षाचे गोवा प्रभारी चेल्लाकुमार यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली. या बैठकीत पक्षाच्या गट समित्यांना लोकांना मदत पुरवण्यासाठी केलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला.

 

पक्षाचे तीन नियंत्रण कक्ष

यावेळी पक्षाने लोकांच्या मदतीसाठी तीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला. पणजी नियंत्रण कक्ष ः जेम्स आंदार (९८२३११८३५१, ९७६५२४८३५१)  सुदिन नाईक (९८९०७०८६६०).

म्हापसा नियंत्रण कक्ष ः विजय भिके (९३७०९८३४७६), रोमा फर्नांडिस (९१४६३९४१२४) व भोलानाथ घाडी (९८२२१५५८७७).

मडगाव ः ज्यो डिसोझा (९८२३०६१९६५) व विठोबा देसाई (९८५०१३१२२७).