वीज खात्याच्या डोक्यावर सुमारे ३०० ते ३५० कोटी रु., सार्वजनिक बांधकाम खात्याच्या डोक्यावर ३०० कोटी रु. तसेच अन्य विविध खात्यांच्या डोक्यावरही बरेच कर्ज होत,े असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या कर्जापैकी बरेच कर्ज आपण यापूर्वीच फेडले असल्याचे ते म्हणाले.
विकासकामांविषयी बोलताना ते म्हणाले की, पुढील ५ वर्षे राज्याचा मोठा विकास करायचे उद्दिष्ट असून त्यासाठी विकासकामांचा धडाकाच लावावा लागणार आहे. जुवारी पुलासह राज्यात विविध ठिकाणी आवश्यक असलेले पूल उभारण्याचा सरकारने जो निर्णय घेतला होता, त्याविषयी विचारले असता या पुलांसाठीची प्रक्रिया सप्टेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या १०० दिवासांत घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांविषयी बोलताना ते म्हणाले की, पेट्रोलचे दर खाली आणण्याचा निर्णय, मुलींसाठीची ‘लाडली लक्ष्मी’ ही योजना व लोकायुक्तासाठी उचललेली पावले हे सर्वांत महत्त्वाचे निर्णय होते. मात्र, त्याचबरोबर केवळ लोकायुक्ताची स्थापना झाल्याने भ्रष्टाचार नाहीसा होईल या भ्रमात कुणी राहू नये, असे ते म्हणाले. राज्यात शेती उत्पादन वाढवण्याचा तुम्ही निर्णय घेतला आहे, पण युवा वर्ग शेती करण्यासाठी पुढे येईल असे तुम्हाला वाटते का, असे विचारले असता शेती व्यवसाय अगोदर फायदेशीर बनवूया. तसे झाले की युवावर्गही शेती व्यवसायात येईल, असे ते म्हणाले. राज्यातील कायदा व सुव्यवस्था याविषयी विचारले असता सहा महिन्यापूर्वी होती, त्याच्यापेक्षा आता निश्चितच कायदा व सुव्यवस्था चांगली आहे, मात्र, आपण त्याबाबत समाधानी नसल्याचे ते म्हणाले. पोलीस खात्यात अजून आवश्यक त्या सुधारणा घडवून आणण्याची गरज आहे. या सुधारणा घडवून आणल्या तरच पोलीस क्रियाशील बनू शकतील, असे ते म्हणाले. राज्यातील कचरा साफ करून शहरे स्वच्छ बनवण्याचे जे उद्दिष्ट आहे त्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, हा कचरा उचलल्यानंतर त्याचे काय करायचे, त्याची कशी विल्हेवाट लावायची हा प्रश्न अजून सुटला नसल्याने शहरे साफ करण्याचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नसल्याचे ते म्हणाले. पण त्यावरही मार्ग काढण्यात येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. मागच्या सरकारने केलेल्या नोकरभरतीविषयी बोलताना ते म्हणाले की, त्यानी आवश्यक ती पदे भरलीच नाहीत. आरोग्य खात्याचे उदाहरण देताना ते म्हणाले की, डॉक्टर, नर्सेस ही पदे भरायची असताना ती भरण्याकडे दिगंबर कामत सरकारने दुर्लक्षच केले व जी पदे भरताना भ्रष्टाचार करण्यास वाव आहे ती ‘पेशंट अटेन्डंट’ यासारखी पदे भरली. तुमचे बरेचसे मंत्री हे नवे असल्याने प्रशासनावर त्याचा परिणाम होत आहे काय, असे विचारले असता ‘नाही’ असे उत्तर त्यांनी दिले. आपले मंत्री हे चांगले असून हळूहळू ते काम कसे करायचे ते शिकून घेतील, असे पर्रीकर म्हणाले. जुन्या व अनुभवी अशा भ्रष्ट मंत्र्यांपेक्षा हे नवखे मंत्री कितीतरी बरे अशी पुस्तीही त्यांनी यावेळी जोडली. जाहिरनाम्यात जी आश्वासने दिली होती ती सर्व आपण पूर्ण करणार असल्याचे ते म्हणाले. विरोधकांच्या मार्याला तोंड देण्यास तुम्ही सज्ज आहात काय, असे विचारले असता अवश्य. त्यांचे जे काही प्रश्न अथवा सरकारविषयीच्या तक्रारी असतील त्या त्यानी मांडाव्यात. उत्तरे देण्यास आपण तयार आहोत, असे ते म्हणाले. राज्यात विरोधी पक्ष आहे असे तुम्हाला वाटते काय, असे विचारले असता विरोधी पक्ष घडवण्याची जबाबदारी आपली नसल्याचे ते म्हणाले. मात्र, त्याचबरोबर विजय सरदेसाई यांच्यासारखे विरोधक आहेत अशी टिप्पणीही त्यानी केली.
* विकासकामांचा धडाका लावण्याची ग्वाही
* जुवारी पुलाची प्रक्रिया सप्टेंबरपर्यंत पूर्ण करणार
* पेट्रोल दरकपात, ‘लाडली लक्ष्मी’ व लोकायुक्त हे आजवरचे महत्त्वाचे निर्णय
* शेती फायदेशीर बनावी असा प्रयत्न
* जाहीरनाम्यातील सर्व आश्वासने पूर्ण करण्याचे आश्वासन