Home बातम्या सरकारचा ‘तो’ अध्यादेश म्हणजे बकवास : राहुल

सरकारचा ‘तो’ अध्यादेश म्हणजे बकवास : राहुल

0

 सध्या अमेरिकेत असलेल्या पंतप्रधान डॉ. सिंग यांनी या विषयावर आपण देशात परतल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा घडवू असे निवेदन केले आहे. मात्र विरोधी भाजपाने कोणताही स्वाभिमान शिल्लक असल्यास पंतप्रधानांनी राजिनामा द्यावा अशी मागणी केली आहे.

दिल्लीत आयोजित एक पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी वरील अध्यादेशाच्या अनुषंगाने सनसनाटी मतप्रदर्शन केले. केंद्रीय मंत्रिमंडळाने संमत केलेला सदर अध्यादेश म्हणजे सपशेल बकवास (कम्प्लिट नॉन्सेन्स) असल्याचे आपले वैयक्तिक मत आहे. हा अध्यादेश फाडून टाकून फेकून द्यावा असेही ते यावेळी म्हणाले. ‘माझ्या मते या वादग्रस्त अध्यादेशाबाबत सरकारने घेतलेला निर्णय चुकीचा आहे. तो एक राजकीय निर्णय होत आणि सर्व पक्ष तसे निर्णय घेतात. मात्र अशा प्रकारचा बकवास बंद करण्याची वेळ आता आली आहे. आम्हाला खरोखरच भ्रष्टाचार थांबवायचा असल्यास असल्या तडजोडी करून आम्हाला चालणार नाही’ असेही राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.

कलंकित नेत्यांना अभय देणार्‍या अध्यादेशाबाबतचा निर्णय कॉंग्रेस पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी २१ सप्टेंबर रोजी घेतला होता व २४ सप्टेंबर रोजी त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यानंतर मान्यतेसाठी तो राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आला. त्याला मान्यता देऊ नये अशी मागणी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने राष्ट्रपतींना भेटून केली आहे. या पार्श्‍वभूमीवर राहुल गांधी यांच्या सनसनाटी वक्तव्यामुळे पंतप्रधानपदाचे अवमूल्यन झाले असल्याची टीका भाजपाने केली आहे. भाजपच्या प्रवक्त्या मिनाक्षी लेखी यांनी पंतप्रधानांनी स्वाभिमान असल्यास राजीनामा द्यावा अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर पंतप्रधानांचे माजी सल्लागार संजय बारू यांनी पंतप्रधानांनी तातडीने भारतात परतावे असे मत मांडले. भाजप नेते अरूण जेटली यांनी राहुल गांधी यांचे वक्तव्य म्हणजे उशिरा झालेला साक्षात्कार अशा शब्दात संभावना केली.

कॉंग्रेसचे नेते तथा केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी राहुल गांधी यांना पाठिंबा दर्शविताना त्यांच्या वक्तव्यामुळे पंतप्रधानपदाचे अवमूल्यन होत नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच आमच्या तत्वांविषयी आठवण करून दिल्याबद्दल राहुलना धन्यवादही देत असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेवेळी राहुल गांधी सोबत असलेल्या अजय माकन यांनी राहुल गांधींचे मत हे कॉंग्रेसचे मत असल्याचे सांगितले.