Home बातम्या समुद्राची पातळी एक मीटरने वाढणार

समुद्राची पातळी एक मीटरने वाढणार

0

तापमानवाढीमुळे आणखी ८८ वर्षांनी म्हणजेच २१०० सालापर्यंत समुद्राची पातळी आणखी एक मीटरने वाढणार असून त्यामुळे जगभरातील समुद्रानजीकचे शेकडो गाव पाण्याखाली येऊन मोठा हाहाकार माजण्याची भीती जर्मनीस्थित समुद्र वैज्ञानिक व्हिक्टर स्मेटेचके यानी काल व्यक्त केली.

गोवा समुद्र विज्ञान संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त काल संस्थेच्या सभागृहात ‘भविष्यातील समुद्री आव्हाने’ या विषयावर बोलताना त्यांनी वरील भीती व्यक्त केली.

जगभरातील अनियंत्रित प्रदूषणामुळे महासागरांवर विपरीत परिणाम होऊ लागला असून समुद्री पाण्याचा स्तर कधी नव्हे एवढा वाढू लागला आहे. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यास जगाला अपयश आल्यास महासागर रौद्ररूप धारण करून जगभरातील कित्येक गावांना गिळून टाकण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. किनारपट्टीवर असलेल्या गोव्यासारख्या प्रदेशांना त्याचा सर्वाधिक फटका बसेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. भविष्यात होऊ घातलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे करोडो लोक बेघर व निर्वासित होण्याची भीती व्यक्त करतानाच या लोकांचे पुनर्वसन कसे व कुठे करायचे हा प्रश्‍न निर्माण होणार असल्याचे ते म्हणाले.

प्रदूषण व तापमानवाढीमुळे महासागरातील सगळी गणितेच बदलू लागलेली असून समुद्रातील अन्न साखळीवरही त्याचा गंभीर परिणाम झाला असल्याचा इशाराही त्यानी दिला. समुद्रातील वाढते प्रदूषण, तापमानवाढ व त्याचा परिणाम म्हणून वाढू लागलेली समुद्री पाण्याची पातळी याच्यामुळे मत्स्यजातींतही बदल होऊ लागले असल्याची माहिती स्मेटेचेक यांनी दिली.

६०च्या दशकापर्यंत महासागरात ३ लाख देवमासे होते, मात्र, नंतर त्यांची संख्या झपाट्याने कमी झाल्याचे ते म्हणाले. महासागराच्या आरोग्याच्या दृष्टीने ती घातक अशी बाब ठरल्याचे त्यानी नमूद केले. पृथ्वीच्या अस्तित्वासाठी मानव, मत्स्यजाती व जनावरे यांची सगळ्यांची आवश्यकता असून त्यांच्या संगतीने राहण्याचा निर्धार करून जर मानवाने त्यांची शिकार करण्याचे बंद केले तर ते पृथ्वीसाठी हिताचे ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

आज महासागरात अनियंत्रित अशी मच्छिमारी चालू असून त्यामुळे सागराचे मोठे नुकसान होत असल्याचे त्यांनी खेदपूर्वक सांगितले.