Home Featured समितीकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी सुरू

समितीकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी सुरू

0

चार सदस्यीय चौकशी समितीकडून तपासकामाला गती; अहवालासाठी येत्या सोमवारपर्यंत मुदत

हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन या नाईटक्लबमधील भीषण आग दुर्घटनेच्या चौकशीसाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीने संबंधित अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावून तपासकामाला गती दिली आहे. येत्या सोमवारपर्यंत या प्रकरणाचा चौकशी अहवाल सादर करावा, असे निर्देश राज्य सरकारने यापूर्वीच दिले आहेत. त्यामुळे सदर समितीने तपासकामाला गती दिली आहे.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हा न्यायदंडाधिकारी अंकित यादव यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या समितीत दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा, फॉरेन्सिक सायन्सचे आशुतोष आपटे, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाचे उपसंचालक राजेंद्र हळदणकर यांचा समावेश आहे.

दुर्घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी सदर समितीने बर्च या नाईटक्लबला भेट देऊन पाहणी केली होती. त्यावेळी या समितीने सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआर जप्त केला होता. तसेच समितीने क्लबची सखोल तपासणी केली आणि यंत्रणेबद्दल माहिती जाणून घेतली होती.

त्यानंतर आता या प्रकरणात निलंबित अधिकारी तत्कालीन पंचायत संचालिका सिद्धी हळर्णकर, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तत्कालीन सदस्य सचिव शार्मिला मोंतेरो व इतरांची चौकशी सुरू केली आहे. तसेच या समितीकडून ज्या जागेत हा नाईटक्लब उभारला होता, त्या जागेची कागदपत्रे तपासण्याचे काम सुरू आहे. बर्च बाय रोमियो लेन हा नाईटक्लब मिठागरामध्ये उभारण्यात आलेला आहे. त्याच्या बांधकामासाठी परवाना घेण्यात आलेला नाही. ग्रामपंचायतीने दिलेल्या एका व्यापार परवान्याच्या आधारावर राज्य सरकारच्या इतर विभागांकडून परवाने मिळविण्यात आलेले आहेत, असे यापूर्वीच स्पष्ट
झालेले आहे.

सुनावणी पुढे ढकलली
बर्च नाईटक्लब आग प्रकरणात हडफडेचे सरपंच रोशन रेडकर आणि निलंबित तत्कालीन सचिव रघुवीर बागकर यांनी म्हापसा येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी 16 डिसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. रेडकर आणि बागकर या दोघांना अटक केल्यास त्यांची जामिनावर सुटका करण्याचे निर्देश न्यायालयाने कायम ठेवले आहेत.

रोशन रेडकर आणि रघुवीर बागकर यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जांसंदर्भात म्हापसा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने गोवा पोलिसांना नोटीस बजावली आहे. गोवा पोलिसांनी या अटकपूर्व जामीन प्रकरणाबाबत सविस्तर उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितला आहे. त्यामुळे न्यायालयाने उत्तर दाखल करण्यासाठी आणि युक्तिवाद करण्यासाठी दि. 16 डिसेंबर रोजी दुपारी 2.30 वाजेपर्यंत वेळ दिला आहे.

अग्निकांडप्रकरणी 50 जणांच्या जबान्या नोंद
हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन या नाईटक्लबमधील अग्नितांडवाच्या घटनेच्या तपासाला गती देण्यात आली आहेत. या भीषण आग दुर्घटनेशी संबंधित असलेल्या 50 हून अधिक व्यक्तींचे जबाब आत्तापर्यंत नोंदवून घेण्यात आले आहेत. त्यात सरकारी अधिकारी, कामगार आणि पीडितांचाही समावेश आहे, अशी माहिती गोवा पोलिसांनी काल दिली.

लुथरा बंधूंच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू
थायलंडमध्ये स्थानबद्ध करण्यात आलेल्या सौरभ आणि गौरव या लुथरा बंधूंच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या विषयावर गोवा पोलीस केंद्रीय तपास यंत्रणांशी सतत समन्वय साधून आहेत. दरम्यान, बर्च बाय रोमियो लेनचा कारभार हाताळणाऱ्या संशयित आरोपी भारत कोहलीच्या पोलीस कोठडीत आणखी सहा दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. त्याला नवी दिल्ली येथे अटक करून गोव्यात आणण्यात आले आहे.