Home बातम्या समाजासाठी योगदानही हवे

समाजासाठी योगदानही हवे

0

– रमेश सावईकर

गणेश चतुर्थी हा हिंदूंचा महत्त्वाचा असा उत्सव मोठ्या उमेदीने, उत्साहाने, भक्तीभावाने मंगलमय वातावरणात साजरा केला जातो. प्रतिकूल परिस्थितीची झळ भक्तगणांना लागली तरी त्यावरती मात करून भाविक गणरायाचे स्वागत करण्यास कुठेही कमी पडत नाहीत. उलट गणरायाच्या आगमनाने विघ्नांचा नाश होऊन आनंद द्विगुणित होतो नि भक्तिरसात सारे भाविक न्हाऊन चिंब भिजून जातात. ही सारी किमया त्या विघ्नहर्त्या, सुखकर्त्या गजाननाची असते असेच म्हणावे लागेल.

गणराया, गजानन किंवा गणपती हा बुद्धिदाता, सुखकर्ता म्हणून गणला जातो. सर्व देवांमध्ये आराध्य दैवत म्हणून प्रथम पूजनाचा मान गणरायाला जातो. त्याचे पूजन झाल्याशिवाय कुठल्याही धार्मिक विधींची सुरवात होत नाही. त्याविषयीची मीमांसा गणेश पुराण कथांमधून आढळते.

फार मोठी परंपरा लाभलेला हा चतुर्थीचा उत्सव बदलत्या आधुनिकीकरणामुळे ‘गणेश उत्सव’ असा हल्ली संबोधला जाऊ लागला आहे. उत्सवाच्या स्वरुपामध्ये कालानुरुप बदल घडून येत आहे. घरोनघर गणेश मूर्तीची विधिवत स्थापना करून दीड दिवस, पाच, सात, नऊ, अकरा दिवस असा हा उत्सव साजरा केला जातो. धार्मिक पद्धतीने विधिवत मूर्तीचे विसर्जन मिरवणूकीसह मोठ्या थाटात केले जाते. गणरायाला निरोप देताना ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणून त्याची आर्जवी प्रार्थना केली जाते. हे सारे उत्साहवर्धक वातावरणात घडून जाते, पण या उत्सवातून आम्ही ‘गण’ काय बोध घेतो? त्या बोधानुसार आचरण करून उर्वरित वर्षाचा काळ घालवतो का? त्यावरून चिंतन करून आत्मपरीक्षण केल्याशिवाय सत्य, वास्तव परिस्थितीचे भान आम्हाला कळू शकणार नाही. आपणाला सुबुद्धी दे म्हणून बुद्धिदात्या गणरायाकडे आपण आर्जन करतो. तो तशी बुद्धी देण्यात उणा पडत नाही. पण आमच्या वर्तनामुळे बुद्धी भ्रष्ट करून घेण्याचा स्वार्थी, मतलबासाठी या जीवनात आम्ही वसा घेणार आहोत तर त्याला तो विघ्नहर्ता, सुखकर्ता, बुद्धिदाता, गणराया बिचारा काय करणार? गणेश चतुर्थी सणाची परंपरा बदलत जाण्यामागेसुद्धा आम्ही ‘गण’च जबाबदार आहोत. आराध्य दैवताची भक्ती करून भक्तीभाव वर्धिष्णू व्हावा, त्यामुळे मानवी दृष्टीकोन प्रत्येकाच्या ठायी निर्माण होऊन मानवतेच्या धर्माचे पालन व्हावे, एकतेची भावना जपली जाऊन सौहार्द्र निर्माण व्हावे असा उदात्त हेतू हा सण उत्सव साजरा करण्यामागे आहे हे आम्हाला समजते. पण उमगत नाही. त्याच्याशी गफलत करून घेऊन आपला सोईस्कर व मनपसंत मार्ग आपण अवलंबतो, त्याला कोण काय करणार?

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्यामागे ब्रिटिश साम्राज्यशाहीविरूद्ध लढण्यासाठी सारे भारतीय एकत्र यावे असा हेतू होता. त्याकाळी तो हेतू साध्य होण्यासाठी पोषक वातावरण निर्मितीही या उत्सवामुळे होऊ शकली. आज सर्वत्र देशभर साजरा होणार्‍या या उत्सवाचे मूळ स्वरुप बाजूला पडून बाजारी स्वरुप त्यास प्राप्त होत आहे. पूर्वीच्या काळी गणेशमूर्ती बनविणे ही एक कला नि समाजसेवा मानली जायची. आज गणेशमूर्ती बनविणे नि उत्सवासाठी भक्तांना विकणे हा व्यवसाय बनत चाललेला आहे. स्वस्त दरातील रंग मूर्तीवर चढवून ‘स्वस्तात मस्त’ या सूत्राच्या आधारे हा व्यवसाय केला जातो. गणेशमूर्तीची स्थापना ते विसर्जन काळात गणपतीला नैवेद्य, महानैवेद्य, दीप, धूप आदी उपचारासाठी लागणारे धान्य, इतर वस्तू ते पूजााविधी संभावनेपर्यंत सर्वत्रच भाव वधारले जातात. हे कोणामुळे घडते? आम्हीच परिस्थितीचा फायदा उठवण्यासाठी डोमकावळ्यांगत चतुर्थीचा उत्सव केव्हा येतो म्हणून आपमतलबी हेतू सिद्ध होण्याची प्रतीक्षा करीत असतो. सरकारही कृत्रिम महागाई निर्माण करण्यास उत्पादक, व्यापार्‍यांना आपला आशीर्वाद देते. सार्वजनिक गणेशोत्सवात धार्मिक विधी, अनुष्ठानापेक्षा, मूल्याधिष्ठीत हेतू, भक्तीभावापेक्षा फजूल बाबींना वाव दिला जातो. केवळ मनोरंजन घडावे हा हेतू ठेवून कार्यक्रमाची आखणी झाली तर त्यातून उत्सवाचा हेतू, उपदेश, साधक बाबींना वाव कसा मिळणार? सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे अमाप निधी उभारण्यासाठी नानाविध मार्ग अवलंबतात. देणगी कुपन हा सुद्धा त्याचाच एक भाग म्हणावा लागेल. गणपतीच्या लाडू मोदकांच्या नैवेद्यापेक्षा निधीद्वारा संकल्पित ‘लाडू-मोदक’ हाच खरा नैवेद्य मानून त्यावरती ताव मारण्यास अधीर, उत्सुक झालेले महाभाग सदस्य या मंडळाचे कायम-आजीव सदस्य म्हणून वावरतात. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा निधी लोककल्याणार्थ, लोकहितार्थ किती व कशा प्रमाणात वापरला जातो? मानवी सेवा म्हणून खर्‍या गरजू गरीबांना आर्थिक आधार, आरोग्यसेवा, शिक्षणसेवा, या क्षेत्रासाठी या मंडळाचे काही योगदान आहे का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्या प्रकारचे योगदान असावे, त्याची जाणीव तरी आहे का? फक्त उत्सव थाटात, गाजत वाजत साजरा करायचा एवढाच सीमित हेतू असेल तर त्यात बदल होणे गरजेचेच नव्हे तर अत्यावश्यक आहे. हे गणराया तुझे नाव पुढे करून आपमतलबी हेतूने वावरणार्‍या तथाकथित समाजसेवकांना तूच सुबुद्धी दे. त्यांना आनंदात ठेवत असतानाच गरीब लोकांवर कोसळलेल्या विघ्नांचा, हे विघ्नहर्त्या गणराया तूच नाश कर…!

सत्तापिपासू राजकारणी पुढार्‍यांनी जी घातक, मारक परिस्थिती आपल्या ‘यादवी’ वृत्तीमुळे निर्माण केली आहे, ती परिस्थिती बदलाचे सामर्थ्य हे सिद्धिविनायका फक्त तुझ्यातच आहे. त्याकरिता गरीबांचा टाहो तुझ्या गजमुखी कर्णेंद्रियांपर्यंत पोचू दे..! तरच रसातळाला जाऊ पाहाणारा हा मानवतेचा धर्म सावरला जाऊ शकेल. मजला चांगली बुद्धी दे, माझे भले कर, माझ्यावरची विघ्ने दूर कर, मला सुख प्राप्त करून दे, त्याकरिता हे शिवपुत्रा, विघ्ननाशक मोरया, गजनाथा, हा तुझा भक्त तुझी करुणा भाकतो आहे. तुझे अर्चन करतो आहे. या भू-तलावर तुझे आगमन लवकर (प्रत्यक्षरुपी) म्हणून तुझ्या आगमनाच्या वाटेवर तन-मन-चित्त एक करून, जीवाचे निरांजन करून, तुला आरती ओवाळण्यासाठी अधीर, उत्सुक होऊन बसला आहे. तू हे गणराया, गजानना, गणनाथा त्या भक्तांचा आणखी अंत पाहू नकोस. तुझे खरे ॐकार, सगुण साकार, रुपाचे दर्शन मला घडव! ही आर्जवी प्रार्थना ऐकून भक्तावर प्रसन्न होऊन हे गजानन प्रत्यक्षात भारत भूमीवरती राज्य करण्यास अवतरो अशीच सच्च्या गणेश भक्ताची असलेली मनोकामना सिद्धीस जावो…!