समन्वयाचा अभाव

0
65

दिल्लीमध्ये घातपात घडविण्याच्या प्रयत्नात असल्याच्या संशयावरून अटक झालेल्या सय्यद लियाकत शाहवरून सध्या जम्मू काश्मीर सरकार, दिल्ली पोलीस आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये जे त्रांगडे झाले आहे, ते पाहिले तर दहशतवादासंदर्भातील समन्वयाचा अभाव कोठल्या थराला जाऊ शकतो तेच दिसून येते आहे. पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात बायका – मुलासह घुसलेल्या लियाकतला उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे अटक झाली. तो दिल्लीला चालला होता आणि तेथे घातपात घडवून अफझल गुरूच्या फाशीचा सूड उगवण्याच्या प्रयत्नात होता असा दावा दिल्ली पोलिसांनी त्याच्या अटकेनंतर केला. त्याला पुष्टी देत त्यांनी दिल्लीतील एका लॉजवर छापा टाकला आणि तेथून शस्त्रास्त्रेही जप्त केली. ही शस्त्रास्त्रे ताब्यात घेण्यासाठीच तो दिल्लीला चालला होता असे दिल्ली पोलीस सांगून मोकळे झाले. पाकिस्तानातून दहशतवादाला रामराम ठोकून पुन्हा भारतात परतू पाहणार्‍यांसाठी जी पुनर्वसन योजना गेली काही वर्षे राबवलेली आहे, त्या अंतर्गत लियाकत भारतात परत येत होता असा दावा जम्मू काश्मीर सरकारने त्यानंतर केला. या विषयावरून परवा जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारवर दुगाण्याही झाडल्या.

जम्मू काश्मीर सरकारचा दावा खरा की दिल्ली पोलिसांचा दावा खरा या पेचात सध्या केंद्र सरकार अडकले आहे आणि राष्ट्रीय तपास संस्थेकडे या प्रकरणात चौकशी सोपवण्याचे गृह मंत्रालयाने ठरवलेले आहे. येथे एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे हा लियाकत भारतात परतत होता तो दहशतवादी कृत्य करण्यासाठी की पुनर्वसनासाठी? जर दहशतवादी कृत्याचा मनसुबा तडीस लावण्यासाठी तो परतत होता तर त्याने सोबत बायको – मुलाला का घेतले होते? जर तो पुनर्वसनासाठी परतत होता तर दिल्लीमध्ये जी स्फोटके आढळून आली ती कशी काय? हे कोडे उलगडण्यासाठी या प्रकरणाची समूळ चौकशी आवश्यक आहे. येथे दोन शक्यता वाटतात. एक तर खरोखरच लियाकत भारतात दहशतवादी कृत्य घडवून आणण्यासाठीच परततेला असू शकतो आणि सुरक्षा यंत्रणांना गुंगारा देण्यासाठी तो सोबत बायको आणि मुलाला घेऊन येऊ शकतो. त्याचे नाव पुनर्वसन योजनेखालील दहशतवाद्यांच्या यादीत होते ही गोष्ट खरी. परंतु लियाकतचा शरणागतीचा इरादा कितपत खरा? त्याला पाकिस्तानच्या आयएसआयने पुनर्वसन योजनेखाली भारतात पाठवून दहशतवादी कृत्य करण्यास सांगितले नसेल कशावरून? यातून दोन उद्दिष्टे साध्य होऊ शकली असती. एक तर बिनबोभाट घातपाती कृत्य दिल्लीमध्ये घडून आले असते आणि जम्मू काश्मीर सरकारला आपली पुनर्वसन योजनाही गुंडाळावी लागली असती. आज काश्मीरमधील शेकडो तरूण जिहादचे भूत मानगुटीवर स्वार झाले की दहशतवादी बनण्यासाठी म्हणून पाकिस्तानात जातात. त्यातील फोलपणा मग त्यांना कळून चुकतो आणि त्यांना आपल्या घरी परतण्याचे वेध लागतात. असे हजारो तरूण पाकिस्तानात आज आहेत. शरणागती पत्करून काश्मीरमध्ये पत्करू पाहणार्‍या या तरुणांना भारतात येता येऊ नये यासाठी पाकिस्तान पराकाष्ठेचा प्रयत्न करीत असते. त्यामुळे अनेकदा हे तरूण नेपाळमार्गे भारतात परततात. लियाकतही त्याच मार्गाने भारतात आला. तो प्रामाणिकपणाने शरणागतीसाठी परतलेलाही असू शकतो आणि त्याला दहशतवादी कटात अडकवण्यासाठी पाकिस्तानने स्फोटकांचा बनावही रचलेला असू शकतो. ज्या व्यक्तीने ही स्फोटके दिल्लीतील लॉजमध्ये आणून ठेवली, त्यानेच दिल्ली पोलिसांना लियाकतविषयी माहिती दिलेली असू शकते. शक्यता अनेक आहेत आणि चौकशीविना त्यातील सत्य उजेडात येणार नाही. मात्र, या निमित्ताने उमर अब्दुल्ला यांची दुटप्पी नीती उघड झाली आहे. परवाचे जम्मू काश्मीर विधानसभेतले त्यांचे तावातावाने केलेले भाषण त्यांच्या दुटप्पीपणाची साक्ष देणारे होते. या प्रकरणातून केंद्र सरकार आणि राज्य सरकारे यांच्यातील समन्वयाच्या पूर्ण अभावाकडेही लक्ष वेधले गेले आहे. दहशतवादाचे एवढे मोठे सावट आपल्या देशावर असताना हा विस्कळीतपणा धक्कादायक आहे. दिल्ली पोलीस, गृह मंत्रालय आणि जम्मू काश्मीर सरकार यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळेच तर लियाकत प्रकरण घडले. यातून पुनर्वसन योजनेचा लाभ घेत भारतात परतू पाहणार्‍या तरुणांचे मनोधैर्य खचल्याविना राहणार नाही. पाकिस्तानला तेच तर हवे आहे.