– डॉ. राजेंद्र साखरदांडे
कामावरून आल्याआल्या रुग्णांची रांग लागायची. चहा सोडाच फ्रेश व्हायला पण वेळ नसायचा. ‘‘अरे, चहा बसून टीव्ही बघत घ्यायचा होता तर मग डॉक्टर कशाला झालास? म्हणे बसायचंय… आराम करायचाय!’’ पाठीमागे कुणीतरी हसत होते… वळून पाहिले तर आरशात मीच माझ्यावर हंसत होतो. ते असो. त्यावर पुढे केव्हातरी बोलू…!
तर मंडळी घरी आल्या आल्या संध्याकाळची सुरुवात झाली. पेशंट येत होते. प्रत्येक पेशंट आपल्या आजाराबरोबर आपली व्यथा… आपली कथा सांगत होता. का कुणास ठाऊक हल्ली मन फार हळवे झाले होते. प्रत्येकाच्या दु:खात मला माझे दु:ख जाणवत होते. दरवाजावर थाप पडली. बाहेर एक बाई उभी होती. मी तिला आत येण्याची सूचना केली. ती आजारी होती. कॉटवर बसल्या बसल्या ती म्हणाली, ‘‘मी यशवंताची भावजय!’’
ते तिचे शब्द मला बालपणात घेऊन गेले. यशवंता माझ्या डोळ्यासमोर केव्हा ठाकला समजलेच नाही. तो शाळेत माझ्याबरोबर शिकत होता. अगदी एसएससीपर्यंत… वर्गात तेव्हा माझी पहिल्या नंबर पटकाविण्यासाठी चार जणांबरोबर शर्यत ही ठरलेली. यशवंत दुसरा किंवा तिसरा… बुटका… अपंग… एका पायाने अधू… दात पुढे आलेले. आमच्या गावाजवळच्या वाड्यात राहायचा. चांगला चार किलोमीटर अंतरावर. तशाच पायाने चालत तो शाळेला जायचा. थोडासा मूक… जास्त काही बोलत नव्हता. मी व तो बरोबर एकाच बाकावर बसायचो. जोडी चांगली जमली होती. आम्ही पाच शर्यतीतले… दोघे डॉक्टर, दोन इंजिनिअर व यशवंत पदवीधर होऊन बँकेत कामाला लागलेला… त्यात त्याची नोकरी गावाबाहेर तर केव्हा राज्याबाहेर असे. भेट केव्हाच घडली नव्हती. मीही यशवंताला विसरून गेलो होतो.
एके दिवशी दवाखान्याबाहेर गडबड, गर्दी झाली होती. एकदम दहा-पंधरा माणसे जमा झाली. गोंगाट ऐकून मी दरवाजा उघडला तर… तर दोन माणसे पेशंटाला धरून आत आणत होती. त्याची चालण्याची पद्धत मला ओळखीची वाटत होती. मला माणसांच्या चालीवरून माणसे ओळखण्याची सवय होती. फक्त माणसे ओळखीची असायला हवीत. नाहीतर डोळ्यासमोरून गेलेली असावीत. त्यांना त्यांच्या चालीवरून ओळखायला मला मजा येत होती. ह्या पेशंटाचीही चाल मला ओळखीची वाटत होती. ओळखीचीच होती ती! तो यशवंत होता. त्या लोकांनी त्याला उचलून दवाखान्याच्या बेडवर झोपवले. त्याचे डोळे भकास… केस अस्ताव्यस्त.. कपड्याचे पण त्याला भान नव्हते. तो काहीतरी बरळत होता. मी त्याची तपासणी करू लागलो. तर तो मला म्हणाला, ‘‘रात्री मला मरायचय! माझी जवळची माणसे मला त्याच नावाने हाक मारायचे व मग मी त्यांच्याच होऊन जायचो. छातीत जळजळ झाली… त्याची ही दशा पाहून मन व्यथित झाले. यशवंता काय ही तुझी दशा?’’
यशवंता लग्न झालेला.. बायको गृहिणी तर मुलगा एकुलता एक. शहरात राहायचा. तिथेच नोकरी करायचा. एके दिवशी गावात मला तो भेटला होता. मला त्याच्याबरोबर फार बोलायचे होते; पण त्याची बस लागलेली. बोलणे काही झाले नाही. पण माझ्या मनाला बरे वाटले. तो सुखी होता. जगात सगळीच माणसे सुखी असती तर जग कसे सुंदर, सुखमय झाले असते नाही? पण तसे नसतेच मुळी. प्रत्येकाला ग्रहणाचे वेद हमखास लागतात.
सकाळी सकाळी चहाबरोबर वर्तमानपत्र वाचायलाच हवे… वरवर ठळक बातम्या वाचल्याच पाहिजे. त्यात ओळखीची बातमी तर संपूर्ण वाचायची सवय. मी बघितलेय लोक आपापल्या आवडीप्रमाणे पेपर वाचतात. कुणी मटक्याकरिता… नंबर काढायला. त्या दिवशी पेपरवाल्याला ते वेगळे लावलेले पेपर विचारले तर तो ओठांचा चंबू करत म्हणाला, ‘‘डॉक्टर तुम्ही पण!’’ मला काहीच समजले नाही. मग तोच माझ्या आश्चर्यचकित चेहर्याकडे पाहत म्हणाला, ‘‘ते वेगळे लावलेले पेपर मटक्याचे नंबर काढायचे.’’ किंमत फक्त २५-५०. मी हलकेच माझी नजर तिथून वळवली. थोडी लोकं मरणाचा कॉलम बघायची… थोडी शेअरमार्केट… कुणी पेपर रेस्टरूमवर घेऊन गेलेले… आज कसे छान झाले… डॉक्टरकडे जायला नको. ही काही थट्टा करायची वेळ नव्हती. पेपर वाचता वाचता नजर एका बातमीवर गेली. शाळेसमोर अपघात झाला होता. कुणीतरी मुलगा अपघातात गेलेला! दररोज अपघात…. कितीतरी लोक मरतात. आईवडिलांची एकुलती एक पोरे अपघातांत दगावतात. चांगली पल्सर घेऊन भरधाव हाकत असतात. चक्क शंभर-दीडशे वर सहज चालवतात. पण त्यात कुणाचे तरी मरण असते ना? हो, हा पोरगा पण एकुलता एक होता… शाळा भर रस्त्यावर होती. बसमधून उतरून तो शाळेकडे वळला मात्र, एक पल्सर त्याचा घात करून गेली. त्या पोराला काहीही समजले नाही. वडिलांचे नाव यशवंत… ‘‘अरे हायरे देवा!’’ तो यशवंताचा एकुलता एक मुलगा होता. यशवंताचे आता काय होणार, ह्याचा विचार करून मन कसे सुन्न झाले. पण त्यात तो म्हणे थोडासा सावरला होता. एके दिवशी त्याची बायको हृदयविकाराने वारली… मुलाचा वियोग ती बिचारी सहन करू शकली नव्हती. यशवंतही वेडापिसा झाला. एकटाच गप्प गप्प बसू लागला. बँकेची नोकरी सोडून तो आपल्या पूर्वीच्या घरात राहू लागला.
आज तो माझ्या कानात पुटपुटला, ‘‘मला मरायचंय… रात्री मला मरायचंय.’’ माणसाला सोसावे लागते. मन कसे कठोर करायला हवे. हसत हसत संकटाला सामोरे जायला हवे. आत्महत्या हे कमकुवत माणसाचे लक्षण आहे. यशवंता तू कठोर बन… अगदी माझ्यासारखा. मी तुझा मित्र… एकाच बाकावर बसणारे… दोन गरीब.. समदु:खी व्यक्ती… आजही मी तुझ्याबरोबर आहे. मला कुणीतरी माझ्याजवळ बसायला हवे होते. आजवर माणसे समोरून येत-जात होती. मला बघायची, विचारपूस करायची व निघून जायची… माणसे यायची, जायची. आज तू आलास. ‘‘मला पहिल्यांदा तुला बरा करायचाय. तुझी दाढी करायला हवी. कपडे बदलायला हवेत. पोटभर जेव. जेवल्याशिवाय ताकद येणार नाही. ताकद आल्याशिवाय मनाबरोबरची लढाई तू जिंकू शकणार नाहीस. तुला आता झोपले पाहिजे.’’ यशवंताला माझी गरज होती. डॉक्टरची गरज होती. खर्या मित्राची गरज होती. मला समदु:खी माणसाची. माझी माणसेही जिवंत असूनही माझ्यापासून दूर जात होती. मागच्या वर्षी माझे भाऊ हरवले… बहिणी हरवल्या… आईवडील तर मागेच हरवले. किती शोधले मी त्यांना. भेटलेल्या प्रत्येकाला मी विचारले तर कुणीही त्यांना पाहिले नव्हते. असे कसे होणार? माझ्या रक्ताची माणसे माझ्यापासून दूर गेलेली. यशवंता, आज मला तू भेटलास. आता मी तुझ्याबरोबर एकाच बाकावर बसून बोलणार! अरे, किती वर्षे झालीत… मला तुझ्याबरोबर कितीतरी बोलायचे होते रे!
मनाला कसे शांत वाटत होते… पेशंटांची रांग वाढलेली. स्वत:विषयी विचार करायचा हक्क मला नव्हता. मी केव्हा यंत्र झालो उमगलेच नाही. पेशंट मला आपल्या आजाराविषयी सांगत होते. मी मुकाटपणे त्यांना तपासत होतो; औषधोपचार देत होतो. पॅडवर पेन झरझर चालत होते. पेशंटांच्या व्यथा माझ्या होत होत्या व मी नकळत त्यांचा…!
……………

