सभापतींची हजेरी विकासकामांविषयीच्या बैठकीला; अधिवेशन रणनीतीला नव्हे
गोवा फॉरवर्डचे प्रमुख तथा आमदार विजय सरदेसाई यांनी सभापती रमेश तवडकर यांच्यावर खोटे आरोप करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला असून, त्यांच्या या कृतीचा आम्ही निषेध करीत आहोत, असे समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, तसेच भाजपचे आमदार कृष्णा साळकर आणि प्रेमेंद्र शेट यांनी काल भाजप मुख्यालयात घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप व घटक पक्षांच्या आमदारांची एक बैठक मंगळवारी पार पडली होती. त्यावरून भाजपच्या विधानसभा अधिवेशन रणनीती बैठकीला सभापती रमेश तवडकर यांची उपस्थिती कशी?, असा सवाल विजय सरदेसाईंनी मंगळवारी उपस्थित केला होता.
त्यावर स्पष्टीकरण देताना सुभाष फळदेसाई हे म्हणाले की, मंगळवारी आमच्या दोन बैठका होत्या. एक बैठक ही सत्ताधारी भाजप व घटक पक्षांच्या आमदारांची होती. पहिली बैठक ही दुपारी 12 वाजता सुरू झाली व 1 वाजता संपली. या बैठकीत पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजावर चर्चा झाली. तद्नंतर दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत चाललेल्या बैठकीत भाजप आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांवर चर्चा झाली. सभापती रमेश तवडकर यांनी हजेरी लावली होती ती ह्या दुसऱ्या बैठकीला. त्यांना आपल्या काणकोण मतदारसंघातील विकासकामांविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायची होती. मात्र, हे जाणून न घेता चुकीच्या माहितीच्या आधारावर सरदेसाईंनी भाजपच्या विधानसभा अधिवेशन रणनीती बैठकीला सभापतींनी उपस्थिती लावल्याचा आरोप केलेला असून, हा आरोप खोटा आहे व आम्ही त्यासाठी त्यांचा तीव्र शद्बांत निषेध करीत आहोत, असे फळदेसाई म्हणाले.
विजय सरदेसाई यांनी आपल्या नुकत्याच झालेल्या जनसंपर्क मोहिमेच्यावेळी सांगे व अन्य मतदारसंघात बोलताना भाजप राज्यातील अनुसूचित जमातींवर अन्याय करीत आहे. त्यांच्या संघटनेत फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे असे खोटे आरोपही केले होते. राज्यातील अनुसूचित जमातींना ‘एसटी’चा दर्जा देण्याचे काम भाजपनेच केले होते ते त्यांनी विसरू नये, असेही फळदेसाई यावेळी म्हणाले.
कृष्णा साळकर व प्रेमेंद्र शेट यांनीही विजय सरदेसाई यांनी सभापती रमेश तवडकर यांच्यावर केलेले पक्षपातीपणाचे आरोप हे खोटे असून, त्यांनी विधानसभेत कधीही पक्षपातीपणा केला नाही. उलट सत्ताधारी आमदारांपेक्षा विरोधी आमदारांनाच बोलण्याची जास्त संधी दिल्याचा दावा त्यांनी केला.
विजय सरदेसाईंचे आरोप निषेधार्ह
सभापती रमेश तवडकर हे कुठल्या बैठकीला हजर होते हे जाणून न घेता त्यांच्यावर ते पक्षपाती असल्याचे व भाजपच्या हातातील बाहुले बनल्याचे आरोप करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न विजय सरदेसाईंनी केला. सरदेसाई यांची ही कृती योग्य नसून, ती निषेधार्ह असल्याचे सुभाष फळदेसाई म्हणाले.

