सफर मोर्लेगडाची

0
329

– पौर्णिमा केरकर

जीवनप्रवासातील असे अनेक अनुभव गाठीशी बांधत जात असता इतिहास संस्कृतीचे भरभक्कम संचित या मातीशीच समरस झालेले दिसते. अनुभवाला भिडण्याचे प्रत्येक व्यक्तिमत्त्वाचे स्वत:चे निवडलेले असे रस्ते असतात. त्या रस्त्यावरून जात असता भावनांना मोकळे करता येते. आपले नेहमीचेच जगणे मागे ठेवून नव्याने पुढे झेपावता येते तेव्हाच कोठे संस्कृती इतिहासाचे लखलखीत विश्‍व आपल्यासमोर अवतीर्ण होते. मोर्लेगडाच्या भ्रमंतीत असाच काहीसा अनुभव आला. एरव्ही गेली कित्येक वर्षे पडझड, कोसळणे हे सारे सहन करीत दु:खाला, संघर्षाला अविचल सामोरे जाणार्‍या मोर्लेगडावर जाण्याची मनोमन इच्छा होतीच; परंतु तो योग आला सचिन मदगे, दशरथ मोरजकर व इतर विवेकानंद पुरातत्त्व इतिहास संशोधन मंडळाच्या कार्यकर्त्यांमुळे. फिरावं रानावनातून, गडावर चढावं डोंगरारांगातील खाचखळगे पार करताना कपारीमधून हिंडायचे मध्येच एखाद्या विशाल झाडाच्या गार सावलीत विसावताना पानांच्या जाळीतून आकाश निरखावे. डोळे बंद करून कान मन उघडे निसर्गसंगीताने आयुष्यात कृतार्थ व्हावे. असे मोजकेच क्षण असतात पण ते जपावे लागतात उरलेल्या क्षणांना सजवण्यासाठी… मोर्लेगडाचा आमचा अनुभव असाच काहींसा…!

सहाशे दोन मीटर उंचीवर असलेला मोर्लेगड. या गडावर १८४७ साली इंग्रजांच्या भूगोल मापन खात्याने त्रिकोनमितीचा बिंदू निवडला होता. असा हा बिंदू निवडल्यानंतर त्यावरून बाकीच्या पर्वतांची उंची मोजता येते. सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वसलेला मोर्लेगाव मोर्लेगड हा मोराच्या नावाशी निगडीत आहे. याच परिसरात मोरशी, मोर्ले सारखी गावे आहेत. घनदाट जंगलाने या परिसराला एकेकाळी वेढले होते. मोरांना जगण्यासाठी हवे असलेले खाद्य त्यातून सहज उपलब्ध असायचे त्यामुळे मोराची चलती व्हायची. मोहोरला मोरला अशी ही या गावाच्या नावाची उत्पत्ती सांगितली जाते. या परिसरातील मुसलमान लोकवस्ती ही खूप जुनी असलेली. काही का असेना सौंदर्याची, कलेची अभिव्यक्ती मिरवणारा हा गाव मोर्लेगडाच्या रूपाने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारा असाच आहे. कोल्हापूर, बीजापूर संस्थानाचा इतिहास या गडाने आपल्या कातळावर कोरून ठेवलेला आहे. काळाच्या उदरात गडप होणारे लोकधन आज एकांतवास भोगत असले तरी त्याची वैभवशाली परंपरा इतिहास संशोधकांना, अभ्यासकांना गिरिभ्रमण करणार्‍यांना आजही उत्कटतेनेच खुणावते आहे.

चोर्ले घाट मार्गावरील महत्त्वाचा गड म्हणूनही त्याचे वेगळेपण उठून दिसायचे. घाटमार्गातून येणारे कडधान्य इथे पुरवले जायचे तर इथली सुकी मासळी घाटमाथ्यावर पोचती व्हायची. गडाच्या माध्यमातून नैसर्गिक सुरक्षाकवच इथे वास्तव्य करून असणार्‍या लोकमानसाला प्राप्त व्हायचे. सत्तरी नवी काबिजात सावंतवाडकर भोसलेंच्या ताब्यात होती. चोर्लाघाट ओलांडल्यानंतर ब्रिटिशांची हद्द सुरू व्हायची. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमुळेच या प्रदेशाला संरक्षणकवच प्राप्त झालेले होते. डोंगरकपारीत, रानोमाळ भटकणारा इथला भूमिपुत्र काटक, लवचीक व फिरंग्याशी झुंज देणारा होता. परक्यांच्या आक्रमणापासून बचावासाठीच मोर्लेगडाची निर्मिती झाली असावी. एकेकाळी इथे गड होता असे सांगूनही कोणाला खरे वाटणार नाही अशी आजची गडाची परिस्थिती आहे. इथे फक्त किल्ला होता असे मानले जायचे; परंतु इतिहास संशोधन मंडळाच्या कार्यकर्त्यांना मात्र तेथील भ्रमंतीत मोर्लेगडाचा बालेकिल्ला, खंदक यांचे अवशेष सापडले. निश्‍चितपणाने गडाची माहिती नव्हती. गडावर पदभ्रमणासाठी, गिर्यारोहण करण्याच्या हेतूने जाणारे खुपसे चमू होते. गोवा मुक्तीनंतर सामाजिक वनीकरणाचा प्रस्ताव अनुसरून गोवा सरकारने सागवान, निलगिरी सारख्या झाडांची लागवड येथे केली. मोर्लेगडाच्या अंगाखांद्यावर धनगराचा निवास होता. जंगलाचा हा पुत्र दसर्‍या – दिवाळीत चपय, गजानृत्य, पंढरीचा पवाने उल्हसित व्हायचा.

खडकाचे पानी नी डोंगराचा पाला

दे दादा दे दादा राजाळ म्हस…

असे म्हणत फेर धरून नाचताना आदिवासी स्त्रीमनाला चेतना मिळायची. मोर्ले गावातूनही लोक हा उत्सव अनुभवण्यासाठी गड चढायचे. मोर्लेगडावर केरी गावातून जाताना अलगाच्या पाषाणाला साक्षी ठेवूनच पुढचा मार्ग क्रमावा लागतो. मोर्लेगडावर स्वारी करायची तर ती सरळ सरळच! पसरट आडवे तिडवे नागमोडी मार्ग तिथे नाहीच. ‘घोडयेर’ची वाट पावलाखाली चढावी लागते. सरावाची वाट नसल्याने आणि पट्टीचे पदभ्रमण करणारे आम्ही नसल्याने मध्ये मध्ये विसावा घेतला की जरा हायसे वाटायचे. बसून तो अनुभव रिचवत असता त्या सौंदर्यासक्तीमुळे उठता उठवत नसे. परंतु गड चढत असता विसाव्याला प्रत्येक क्षणांना संस्कृती इतिहासाचा सुगंध चिकटलेला असायचा त्यामुळे या वाटांविषयीचा आदर अधिकच दुणावला जायचा. आम्याचे पाणी, ठेवण्याची राय, हळदीचे पाणी, वाघाची पेठ, ऋषीचे स्था, कलवताचे पाणी अशा कितीतरी जागा आज इतिहासाचे एकेकाळचे दिमाखदार संचित मिरवीत आहे. आम्याचे, हळदीचे, कलवताचे पाणी इथे एकेकाळी बारामाही पाण्याचा नितळ साठा वाहत असायचा. आता जानेवारीपर्यंतच या पाण्यावर शेवाळ यायला सुरुवात होते. नंतर नंतर पाणी सारेच सुकून जाते. हळदीच्या पाण्याच्या साठ्याशेजारीच लहान मोठ्या खडकावर विसावा घेतला. पाणी अजूनही तेवढे अस्वच्छ झाले नव्हते. गार पाण्याचा घोट पोटात गेल्यावर ताजेतवाने वाटले. केली गावातील हळीत समाज कोणे एकेकाळी पोर्तुगिजांच्या धर्मसमीक्षणाच्या तावडीतून सुटका करून घेऊन आपल्या देवदेवतांना सुरक्षितता मिळवून देण्यासाठी वेगवेगळ्या वाटेने गेले… तिथेच विसावले. हळीत समाजाचे मूळ या हळदीच्या पाण्यानेच परिपुष्ट झालेले होते – पोसले गेले होते असे जाणकार सांगतात. घोडयेर वाटेवरून प्रवास करताना त्या टापांचा कणखरपणा शतकांच्या प्रवासातही टिकून असलेला जाणवला.

मोर्लेगडाच्या वाटेवरच्या प्रवासात आढळल्या संस्कृतीच्या खुणा तसेच त्याच्या श्रद्धाही. देवराई ही अशीच जंगलाचे जतन, संवर्धन करण्याची परंपरा. धार्मिक बंधातून जोपासलेले हे लोकधन मोर्ले गावात तर विपुल आहे. ‘सिद्धाची राय’, ‘घोटगाची राय’ आणि ‘ठेवणीतली राय’चे हिरवे वैभवाने मोरपंखी स्वप्ने या गावाला दिली. लोकवस्तीपासून काहीशी दूर असलेली ही राय श्रावणी अमावास्येपूर्वी सिद्धाच्या मळावर भुगूत हा लोकविधी केला जातो जेणेकरून ज्या गुहेत सिद्धाचे वास्त्यव्य आहे तिथे निसर्गाचे रक्षण सहजतेने होते. ‘खडयेवयलो सिद्धा’ ग्रामस्थांचा जीव असल्याने खडीक्रशरचा अतिवापराने गावाचा होणारा विद्ध्वंस ढाळता येणारा. लोकवस्तीच्या जवळ असलेली घोडगाची राय आज आपले पावित्र्य भंग करून उभी आहे असे वाटते. एकेकाळी मोठ्या जागेत विस्तारलेली ही देवराई सध्या एकाच मोठ्या ‘घोटिंग’ वृक्षाभोवती वलयांकित आहे. गावातील धालो मांडाजवळच मांड शोभावा असा विस्तीर्ण वड होता. पौष मासात धालोने रात्री उल्हसित व्हायच्या. अशाच एक धालोत्सवात वझराच्या धबधब्याजवळचे पिशाश्‍च आपल्या मुलाला बरोबर घेऊन धालोत्सवात सहभागी होण्यासाठी आले. माळ्यावर शेताची राखण करणार्‍या शेतकर्‍यांच्या कुशीत त्याला झोपवून गावातील महिलेच्या वेशात नृत्यात सहभागी झाले. शेतावरचा माळी बदलला होता. कुशीतील मुलाला पाहून तो दचकला. खाली पेटत असलेल्या आगीत फेकून दिले. धालो संपवून आलेल्या पिशाश्‍चाने हे दृश्य पाहिले. संताप संतप्त झाला. रागाने शापवाणी उद्गारण्यासाठी उघडलेल्या तिच्या तोंडातून ‘आडवाक कुडो पिको’ असे सुजलाम् सुफलाम् भूमीचे उद्गार निघाले. त्यावेळेपासून मोर्ले गाव शेतीवाडीने परिपुष्ट झाला. मोर्ले गडावर जाताना ‘ठेवण्याची राय’ हे असेच नैसर्गिक स्वत्व, ‘घोटगाची राय’ संदर्भात असलेल्या व लोक मानीत आलेल्या या दंतकथेमुळे तेथील धालोत्सव कायमचाच बंद झाला. जो वड या उत्सवाचा साक्षीदार होता तो वडही उन्मळून पडल्यामुळे धालोचे संचित हा इतिहास ठरला. ‘ठेवण्याची राय’ मात्र लोकवस्तीपासून दूर असल्याने आजही नन्‌रुख, केळ, औदुंबर, वड सारख्या फायकस कुटुंबातील झाडांच्या जातीमुळे चैतन्यशील आहे. डोंगरावर पाणी साठवून राहण्याची क्षमता या देवराईमुळेच अस्तित्वात होती. समृद्ध असे पाण्याचे साठे या देवराईत बारामाही असायचे. बेत शिडम सारखे निसर्ग सहचरी शिडम वृक्षामुळे तर असंख्य कृमीकिटक, पशुपक्षी या झाडाकडे आकर्षित होतात. अशा या प्रसन्न वातावरणात ऋषिमुनींना या गडावर वास्तव्य करावेसे वाटले यात नवल नाही.

तेणे सुखे रुचे एकांताचा वास

नाही गुणदोष अंगा येत…

अशीच समरसता त्या चराचराशी निर्माण व्हावी अशीच भावावस्था गडावर पाऊल ठेवताक्षणी होते. पावशतकापूर्वी एक ऋषी येऊन गडावर स्थिरावला. सत्तरीतील खेड्यापाड्यांतून लोक त्याच्या दर्शनाला गडावर जायचे. ‘बुवा तेथे बाया’ असाही प्रकार व्हायला लागला. एक दिवस बुवाने त्याच्या दर्शनासाठी आलेल्या बाईला घेऊन पलायन केले. त्यानंतर मात्र हा परिसर या दृष्टिकोनातून विस्मृतीत गेला. तिथेच खूप वर्षांपूर्वी एका दगडावर कोरलेली ऋषीमुद्रा दिसते. बाजूलाच ‘कलवताचे पाणी’ आहे.

मोर्ले गडावर पोहोचण्यासाठी दुपारचे अडीज वाजले. रखरखीत ऊन असले तरी वार्‍याच्या मंद झुळकीनी ते कुठच्या कुठे नाहीसे व्हायचे. मध्येच दाट झाडांची सावली. स्पष्ट अस्पष्ट दिसणारी भोवतालची गावे… त्यात सालेली, होंडा, केरी, दाबे, मोर्ले… छोट्या छोट्या ठिपक्याएवढी भासणारी कौलारू घरे भर उन्हातही लक्ष वेधून घेण्यासाठीच ‘रामुलो’चे झाड पिवळ्याजर्द फुलांनी डवरून गेले होते. लांबट पानाचे, पिवळी फुले धारण करणार्‍या या झाडाच्या चिकाच्या संपर्कात जर एखादी व्यक्ती आली तर अंग सुजते. ‘रामुलो’चा पाला बारीक करून त्याचा रस नदीपात्र अडवून पारंपरिक पद्धतीने मासे मारण्यासाठी केला जायचा. केरीतील पार्सेकरवाडा, आजोबाची राय, पिशाची राय, माऊलीची, बलद्याची, कोमाची राय मोर्लेगडावरून अनुभवताना खोल दरीत, वाघेरी चढताना एखादा गर्द गडद हिरव्या काळपट रंगाचे तुकडेच दिसायचे. त्याच्या गडदपणामुळे ह्या देवराई सावल्यासारख्याच उंचावरून वाटायच्या. अबदुरण्याची रायही दिमाखाने मिरवत असलेली दिसायची. मोर्लेगडाच्या एका टोकावर बसून समोर पाहिले की समोर दिसतो तो वाघेरीचा डोंगर. मोर्लेगड व वाघेरी यांच्या मधोमध असलेले ‘बोळेरीचे तेम’ डोळ्यांतही न मावणारे गर्द हिरवे, निळे गहिरेपण या सार्‍या परिसराला वेढून आहे याची प्रचिती मोर्लेगडावरील स्पर्शानेच होते. ज्या गावाची पार्श्‍वभूमी घेऊन मोर्लेगड वर्षानुवर्षे एखाद्या साधकासारखा उभा आहे त्या मोर्ले गावाच्या इतिहासाची पाने चाळताना लपाछपीच्या युद्धाला पोषक असलेला परिसर इथे आहे याची जाणीव होते. छत्रपती शिवाची महाराजाना हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना सह्याद्रीच्या डोंगररांगांनीच त्यांना सहकार्य केले. पोर्तुगिजांविरुद्ध लढताना इथल्या भूमिपुत्रांना मोर्लेगडाच्या कडेकपारींनी आश्रय दिलेला आहे याची साक्ष या गडावरील ढासळलेले गडाचे अवशेषच देत आहेत. सातेरी केळबाईच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला हा गाव. पंढरीचा पांडुरंग आज जरी कारापुरातील मारुतीगडावर स्थित असला व त्याच्या वास्तव्यामुळे या परिसराला ‘विठ्ठलापूर’ हे नाव असले तरीही विठ्ठल, रुक्मिणी, सत्यभामा यांच्या मूर्ती गिमयवाडा, मोर्ले येथे होत्या. वाडबा दुलता मोर्लेकर यांनीच त्या मूर्ती कर्नाटकातील कृष्णापूरमार्गे करंजोळ-मोर्लेगडाच्या परिसरातील गिमयवाड्यावर आणल्या. वेगवेगळ्या ठिकाणी ‘फडके’ ब्राह्मण कुटुंबे विखुरलेली आहेत त्यांचे कुळपुरुष मोर्लेत आहेत. ‘पोर्तुगीज-मराठे संबंध’ या संशोधनात्मक पुस्तकात संशोधक डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर लिहितात – २१ ऑक्टोबर १७४६ या दिवशी साखळीकर राणे, मणेरीकर, गावस, डिचोलीकर, रघुनाथ प्रभू, अडवईकर कुष्ठोबा देसाई वगैरेंनी सावंतवाडकरास पाठ फिरवून गोवेकरांची सत्ता मान्य केली व मोर्ले, साटरे गड काबीज करून स्वत:ची निष्ठा दाखविण्यासाठी पोर्तुगिजांच्या हवाली केले.

दैनंदिनीच्या जीवनव्यवहारातली सुरक्षितता, आणि चौकट सोडून सहसा माणसे कुठे जायला बघत नाहीत. वेगळ्या, अनोळखी विश्‍वाचा शोध घेतलाच जात नाही. आपापल्या मुक्कामीच आपण स्थिर असतो म्हणूनच काही क्षण मोकळे ठेवून धडपडत, आवराआवर करत मधूनच कोसळत नावीन्याचा शोध घेण्यासाठी आपण पुढे झेपावत नाही. मोर्ले गडाला अनुभवताना त्याची अविचल निष्ठा धीर गंभीर प्रेरणा देते. या गडाच्या अवशेषांचा आज बारकाईने शोध घेतला तरच ते दृष्टीस पडतात. पण या परिसरातील वाटा, देवराया, पाण्याची ठिकाणे जगण्यातील ताणतणावालाच विसावा देतात. येथली ‘ठेवण्याची राय’ मोर्लेगडाच्या वाटेवर असली तरी ती सालेलीचा भाग आहे. पोर्तुगिजांच्या छळापासून सुटका करून घेण्यासाठी या गावाने आपल्या देवीचे कळस याच ठेवण्याच्या रायीत ठेवले होते. मोर्लेगडसुद्धा येणार्‍या पिढीसाठीची अमूल्य ठेवण आहे.

………..