सप्तपदी

0
388

 

  • मीना समुद्र

विवाह म्हणजे दोन व्यक्तींना, दोन कुटुंबांना आणि त्या अनुषंगाने येणार्‍या समाजातील नात्याला जोडणारा मंगलविधी असतो. त्यामुळे सप्तपदी ही हे नाते जीवनभर निष्ठापूर्वक निभावण्याचे जणू प्रतिज्ञापत्र असते. कर्तव्याचे भान आणि सर्वांच्या साक्षीने केलेले ते पवित्र उच्चारण असते.

 

प्रत्येक आकड्याचे आणि संख्येचे वेगवेगळे महत्त्व आढळून येते. ‘सात’ हा आकडा तसा पाहिला तर विषम आहे; माणसाच्या दैनंदिन जीवनात आणि व्यवहारात ‘सात’शी इतक्या गोष्टी जोडल्या गेल्या आहेत की आश्‍चर्य वाटावे. याची आठवण होण्याचं कारण, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवा कोरोनाच्या या संकटकाळात सर्वसामान्यपणे जनतेला आचरायला सांगितलेली सप्तपदी- म्हणजेच सात पावलं!

याआधी कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी संयम, सेवा, संगठन, समर्पण आणि संस्कार ही ‘पंचसूत्री’ त्यांनी सांगितली होतीच. आताही हे सावट आटोक्यात येत असताना लॉकडाऊनचा काळ वाढत चालला की लोकांमध्ये संभ्रम वाढतो. त्यांचा संयम सुटून आचारसंहितेबाबत एकदा जर का ढिलाईला सुरुवात झाली तर आतापर्यंतच्या सर्व कामांवर पाणी फिरू शकते. त्यामुळे स्वतःच्या जबाबदारीची वारंवार जाणीव लोकांना करून द्यावी लागते. ‘जान है तो जहान है’पासून ‘जान भी जहान भी’ याबरोबरच उच्च असे ‘खयाल भी’ लोकांच्या मनावर बिंबवणे गरजेचे असते. त्यामुळे आचरायला सहज सोपी आणि परिणामकारक अशी सूत्रबद्ध ‘सप्तपदी’ सुचवून लोकांना आवाहन केले आहे.

सप्तपदी म्हणजे सात पावलं. एखाद्याबरोबर चाललं की त्या व्यक्तीबरोबर मित्रत्वाचे संबंध दृढ होतात अशी समजूत असते; पण ‘सप्तपदी’ हा शब्द आपल्याला विशेषत्वाने माहीत असतो तो विवाहाच्या संदर्भात. अग्निनारायण, आचार्य आणि आप्तेष्ट, इष्टमित्र यांच्या साक्षीने स्त्री-पुरुष पती-पत्नी म्हणून नाते दृढ करत असतात. अशा विवाहसमयी श्रीगणेशपूजा- प्रार्थना- संकल्प, पुण्याहवाचन, वाङ्‌निश्‍चय, कन्यादान, मंगलाक्षता पाणिग्रहण, लाजाहोम अशा विधीनंतर ‘सप्तपदी’ हा मुख्य विधी असतो. इतर सारे विधी झाले तरी सप्तपदीशिवाय विवाह कायदेशीर मानला जात नाही. नवरा-नवरीचा शेला आणि उपरणं यांची गाठ बांधलेली असते. हातात हात घेऊन नवरी किंवा वधू पाटावरच्या तांदळाच्या छोट्या ढिगांवरील सुपारी डाव्या पायाच्या अंगठ्याने एक एक पाऊल टाकत बाजूला सारते आणि नवरा किंवा ‘वर’ एकेक शुभेच्छा, शुभाकांक्षा उच्चारत जातो. पहिल्या पावलाला ‘इयं एकपदी भव’ म्हणून दोघांना भरपूर अन्नधान्य मिळावे म्हणून पहिले पाऊल टाक असे म्हणतो.

‘उर्जे द्विपदी भव’ म्हणजे शरीरसामर्थ्यासाठी दुसरे पाऊल असते. ‘रायस्पोणाय त्रिपदी भव’ म्हणत तिसरे पाऊल धनवृद्धीसाठी आणि ‘मायोभव्याय चतुष्पदी’ हे सौख्यवृद्धीसाठी चौथे पाऊल असते. ‘प्रजाथ्यः पंचपदी’ हे उत्तम संततीसाठीची कामना करून टाकलेले पाचवे आणि ‘ऋतुभ्यः षट्‌पदी’ म्हणजे ऋतूतील आनंदासाठी सहावे पाऊल असते. सातवे पाऊल ‘सखा सप्तपदी भव’ म्हणत अतिशय महत्त्वाचे असे संसारातल्या बरोबरीच्या नात्याचे म्हणजे मित्रत्वाचे- सख्यत्वाचे पाऊल असते.

विवाह म्हणजे दोन व्यक्तींना, दोन कुटुंबांना आणि त्या अनुषंगाने येणार्‍या समाजातील नात्याला जोडणारा मंगलविधी असतो. त्यामुळे सप्तपदी ही हे नाते जीवनभर निष्ठापूर्वक निभावण्याचे जणू प्रतिज्ञापत्र असते. कर्तव्याचे भान आणि सर्वांच्या साक्षीने केलेले ते पवित्र उच्चारण असते. स्त्री ही सर्व घरादाराला आणि पर्यायाने समाजाला एकत्रित बांधून ठेवण्याचे आणि ते वर्धिष्णू करण्याचे काम करीत असल्याने, तसे अपेक्षित असल्याने तिचा त्या सप्तपदी चालण्याच्या क्रियेत पुढाकार असतो. त्यामुळे हा एक अतिशय पवित्र धार्मिक संस्कार मानला गेलेला आहे. ‘सप्तपदी मी रोज चालते, तुझ्यामुळे शतजन्माचे हे माझे नाते’ अशी स्त्रीच्या मनीची मंगल धारणा गाण्यातूनही दिसून येते.

मात्र ‘सप्तपदी’ची सात सूत्रे श्री. नरेंद्र मोदींनी कोरोनाशी हातमिळवणी न करता, त्याच्याबरोबर दोन हात करण्यासाठी सर्व जनतेला सांगितलेली आहे आणि त्यांचे निष्ठापूर्वक पालन केल्यास वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि राष्ट्रीय तसेच जागतिक कल्याण साधले जाईल ही खात्री त्यांना नक्कीच वाटते. या सप्तपदीचे पहिले पाऊल किंवा सूत्र म्हणजे ज्येष्ठ नागरिकांकडे विशेष ध्यान दिले पाहिजे. मधुमेह, रक्तदाबसारखे विकार असतात त्यांची तर जास्त काळजी घ्यायला हवी. कारण कमजोर शरीरात विषाणूंचा प्रवेश झाला तर ते माणसाला खच्ची करून टाकतात. दुसरे पाऊल म्हणजे लॉकडाऊनच्या काळात आखलेल्या लक्ष्मणरेषेचे पालन. सोशल डिस्टन्सिंग हा शब्द आज अगदी अडाणी, अशिक्षितांच्या ओठावर आहे. दुकानात रांगा लावताना आखलेल्या वर्तुळे-चौकोनामध्ये लोक उभे राहात आहेत. मधे शेतकर्‍याला शेतात कटाईचे काम करताना ‘ये तो सोशल डिस्टन्सिंग का ही काम है’ असे म्हणताना दूरदर्शनवर पाहिले आणि ऐकले. कुठेही गर्दी करता कामा नये की ज्यामुळे रोगाचा फैलाव होईल. घरात आणि बाहेरही हा नियम पाळणे खूप महत्त्वाचे. तिसरी गोष्ट घरगुती मास्कचा उपयोग. हा येणार्‍या बराच काळपर्यंत खबरदारीचा उपाय म्हणून करायलाच हवा. घरगुती मास्क अशासाठी की ते बाहेरून आले की धुवावे लागतात किंवा टाकून द्यावे लागतात. सहज उपलब्ध आणि बहुउपयोगी अशा गमछा, ओढणी, मफलर, रुमाल, स्ट्रोल यांचाही उपयोग होऊ शकतो. कचरा टाळण्याच्या दृष्टीनेही, स्वच्छतेच्या दृष्टीनेही आणि आरोग्यरक्षणाच्या आणि बचतीच्या दृष्टीनेही. सुरुवातीला त्यांच्या किमती आवाक्याबाहेर वाढल्या होत्या. चौथे पाऊल म्हणजे आयुष्य मंत्रालयाकडून दिल्या गेलेल्या सूचनांचे पालन. त्यासाठी आरोग्यसेतू मोबाईल ऍप स्वतः डाऊनलोड करून इतरांनाही त्यासाठी प्रेरित करणे. पाचवे पाऊल गरिबांना भोजन देणे, त्या कामावर देखरेख किंवा प्रत्यक्ष मदत करणे. सहावे पाऊल म्हणजे उद्योग, व्यवसायातून काम करणार्‍यांना नोकरीतून काढू नये. शक्यतो त्यांचे वेतनही द्यावे. हातावरचे पोट असणार्‍या मजूर, कामकरी वर्गाची अतिशय संवेदनशील मनाने घेतलेली ही दखल आहे. आता तर त्यांचे मानसिक धैर्य खचू नये म्हणून खास रेल्वेने त्यांच्या गावी त्यांची रवानगी करण्यात येत आहे. रोजच्या रोज आपले जीव धोक्यात घालून सेवाभावाने काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, सफाई कामगार आणि अन्य सेवाभावी कार्यकर्त्यांची बूज राखणे. त्यांचा आदर-सन्मान करणे. आर्मी आणि नेव्हीने परवा पुष्पवृष्टी केली हे त्यांच्या सन्मानासाठीच. विवाहातील सप्तपदीसाठी जमलेल्यांचा आशीर्वाद हाच असतो की वधूवर अशा उभयतांची हृदये, अभिप्राय, विचार सारखा असल्यामुळे कुळाचे, समाजाचे आणि राष्ट्राचे कल्याण होईल. आपल्या दूरदर्शी पंतप्रधानांनी संपूर्ण भारतीय विचारसरणी मांडली आहे, त्यामुळे देशाचे कल्याण होईलच. जगापुढेही आदर्श राहील तो कायमचा!

आता थोडे ‘सात’ किंवा ‘सप्त’ या आकड्याबद्दल! ‘एक तीळ सात जणांत वाटून खावा’ असं आपण लहानपणापासून ऐकलेलं असतं. वाटण्याची वृृत्ती वाढावी हाच हेतू त्यामागे असतो. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका अशा सात मोक्षदायक नगरी माहीत असतात. गंगा, यमुना, सरस्वती, सतलज, रावी, चिनाब, झेलम या सप्तसरितांच्या कुशीत वसलेला प्रदेश म्हणजे सप्तसिंधू प्रदेश. नक्षत्राधिष्ठित झालेले आकाशातील पतंगाकार स्थानावर असलेले भृगू, वसिष्ठ, अंगीरस, अत्री, पुलस्त्य, पुलाह, क्रतू असे ‘सप्तर्षी’ आपणाला दिसतात. अगस्त्य, अत्री, भारद्वाजांसारखे वैदिक धर्माचे प्रणेेते ‘सप्तर्षी’ही होऊन गेले. मार्कंडेय पुराणात दुर्गेने महिषासुरावर विजय मिळविला ते देवीमहात्म्य वर्णन करणारा ७०० श्‍लोकी ‘सप्तशती’चा पाठ नवरात्रात घरोघरी वाचला जातो. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असे वणीचे ‘सप्तशृंगी’ देवीचे स्वयंभू शक्तिपीठ अतिशय प्रसिद्ध आहे. नाशिकपासून ६० ते ७० कि.मी. अंतरावर सात डोंगरशिखरांमध्ये (सप्तशृंग) देवीचा निवास आहे, म्हणून तिला सप्तशृंगी निवासिनी असे म्हटले जाते. नदीच्या डोहात ‘सात आसरांचा’ निवास असतो असे मानले जाते.

आपला आठवडा नव्हे ‘सप्ताह’ हा सोम, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, रवि अशा सात वारांचा असतो. सात दिवसांनी निघणारे पत्र म्हणजे ‘साप्ताहिक.’ श्रावणात ऊन-पावसाच्या खेळात दिसणारे इंद्रधनुष्य ता (तांबडा), ना (नारिंगी), पि (पिवळा), हि (हिरवा), नि (निळा), पा (पारवा), जा (जांभळा) अशा सप्त रंगांनी बनलेले असते. आणि आपल्याला जीवनात आनंद, शांती, समाधान आणणारे संगीत हे सा, रे, ग, म, प, ध, नि या सप्तसुरांच्या सप्तकात बसविलेले स्वर्गीय देणे असते. ‘सप्तपदी’च्या निमित्ताने ‘सात’चे महत्त्व सांगणार्‍या या काही गोष्टी.