Home बातम्या सन २१०० पर्यंत जगाची लोकसंख्या १० ते १५ अब्ज

सन २१०० पर्यंत जगाची लोकसंख्या १० ते १५ अब्ज

0

४३ टक्के जागतिक लोकसंख्या २५ वर्षांखालील

दरवर्षी जागतिक लोकसंख्येत ८० दशलक्षांची भर.

टोकियो हे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर.

लोकसंख्येच्या बाबतीत दिल्लीचा दुसरा क्रमांक.

सन २०३० पर्यंत पाण्याची समस्या गंभीर बनेल.

जगाची लोकसंख्या सध्या सात अब्ज असली, तरी सन २१०० पर्यंत ती किमान १० अब्जांपर्यंत वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जन्म प्रमाण अपेक्षेहून थोडे अधिक राहिले, तर ही लोकसंख्या १५ अब्जांवरही पोहोचू शकते, असेही संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी (यूएनएफपीए) ने आपल्या अहवालात म्हटले आहे. येत्या ३१ ऑक्टोबर रोजी जागतिक लोकसंख्या दिन असून त्या पार्श्वभूमीवर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

सन २०५० पर्यंत जागतिक लोकसंख्या ९.३ अब्जांवर पोहोचेल व या एकविसाव्या शतकाच्या अखेरीस ती १० अब्जांवर पोहोचलेली असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या १२६ पानी अहवालात जागतिक लोकसंख्यावाढीचा आढावा घेतला गेला आहे. गेल्या सहा दशकांत जननक्षमतेची सरासरी प्रति महिला ६ मुले या प्रमाणावरून २.५ या सरासरीवर पोहोचलेली आहे. त्यात विकसित देशांत ती १.७, तर अविकसित देशांत ४.२ आहे असेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे विकसित देशांतील लोकसंख्या झपाट्याने खाली येत असताना अविकसित व विकसनशील देशांमध्ये मात्र ती वाढत असल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी जागतिक लोकसंख्येत ८० दशलक्ष लोकांची भर पडत असते. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या ४३ टक्के लोकसंख्या ही २५ वर्षांखालील व्यक्तींची आहे.

लोकसंख्या वाढीकडे वेगळ्या दृष्टीनेही पाहता येईल. लोकांचे जीवनमान वाढले आहे, ते अधिक आरोग्यदायी जीवन जगू लागले आहेत, असा दावा यूएनएफपीएने केला आहे. मात्र, या वाढत्या लोकसंख्येबरोबरच सर्वांना मूलभूत सुविधा पुरवणे हे आव्हान बनेल या धोक्याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. एका वर्षभरात संपुष्टात येणारी नैसर्गिक संसाधने पुन्हा निर्माण करण्यासाठी अठरा महिने लागतात असे दिसून येत असून त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या पर्यावरणीय प्रश्नांवरही या अहवालात विचार विनिमय करण्यात आला आहे. जगाला भविष्यात पाण्याची तीव्र टंचाई भासेल अशी भीतीही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. सन २०३० पर्यंत पाण्याची मागणी आणि पुरवठा यात जागतिक स्तरावर ४० टक्के तुटवडा भासेल असा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. ईजिप्तसारख्या देशात नाईल नदीवर संपूर्ण लोकजीवन अवलंबून आहे. त्यामुळे अशा स्थितीत पाणीटंचाई गंभीर रूप धारण करील अशी भीती व्यक्त केली गेली आहे. शहरी आणि ग्रामीण लोकसंख्येतील समतोल बिघडत चालला असून टोकियो हे ३६.७ दशलक्ष लोकवस्तीचे शहर जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर ठरले आहे. त्या खालोखाल दिल्लीचा क्रमांक लागतो. दिल्लीची लोकसंख्या २२ दशलक्ष आहे. सां पावलोची २० दशलक्ष तर मुंबई शहराची लोकसंख्याही २० दशलक्ष आहे. वाढत्या लोकसंख्येच्या मुकाबल्यासाठी शहरांचे अधिक चांगले नियोजन गरजेचे असेल, आरोग्य सुविधा निर्माण कराव्या लागतील, हिरवाई टिकवावी लागेल अशा अनेक मुद्द्यांकडे अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे.