सत्तेत आल्यास बजरंग दल, पीएफआयवर बंदी घालणार

0
8

>> कर्नाटकमध्ये काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आता भारतीय जनता पक्षामागोमाग काँग्रेसनेही आपला जाहीरनामा प्रसिद्ध करताना आपले सरकार सत्तेवर आल्यास बजरंग दल आणि पीएफआयवर बंदी घालण्याचे आश्वासन दिले आहे. काल काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात प्रत्येक कुटुंबाला 200 युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन देतानाच कुटुंबातील प्रत्येक महिला प्रमुखाला दरमहा दोन हजार रुपये देण्याची घोषणा केली. महिलांना राज्य सरकारी बसमध्ये मोफत प्रवास करण्याचे आश्वासनही या जाहीरनाम्यामध्ये दिले आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.

तरुण मतदारांना आकर्षित करताना काँग्रेसने बेरोजगार पदवीधरांना दरमहा 3 हजार रुपये आणि पदविकाधारकांना दोन वर्षांसाठी 1500 रुपये प्रति महिना देण्याची घोषणा केली आहे.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करणार

प्रियांका गांधी यांनी रविवारी कर्नाटकातील अंगणवाडीत काम करणाऱ्या महिलांना वचन दिले आहे. अंगणवाडीचे पगार 15 हजार रुपये, मिनी अंगणवाडीचे 10 हजार रुपये आणि आशा सेविकांचे वेतन 8 हजार रुपये केले जाईल. तसेच अंगणवाडीतून सेवानिवृत्तीनंतर 3 लाख रुपये आणि मिनी अंगणवाडीतून निवृत्तीनंतर 2 लाख रुपये दिले जातील, असेही त्यांनी सांगितले होते.