पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केले जाहीर
पंजाबमधील नागरिकांसाठी आपल्या सरकारने 10 लाखांची आरोग्य विमा योजना सुरू केली आहे. या योजनेतून नामांकित खासगी रुग्णालयांमध्येही मोफत उपचार दिले जात आहेत. गोव्यात आपचे सरकार सत्तेवर आल्यास त्याच धर्तीवर अशा प्रकारची आरोग्य विमा योजना सुरू केली जाईल, असे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी काल सांगितले. दोनापावल येथे इंटरनॅशनल सेंटरमध्ये आम आदमी पक्षाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पंजाब सरकारने अमलीपदार्थांविरुद्ध कडक कारवाई सुरू केली असून, तस्करांना तुरुंगात डांबले आहे. त्यांच्या मालमत्ता उध्वस्त केल्या आहेत. पंजाब सरकारच्या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या तस्करीत सहभागी असलेल्यांमध्ये आता भीतीचे वातावरण आहे आणि राज्यात अमलीपदार्थांशी संबंधित कारवाया कमी झाल्या आहेत, असेही भगवंत मान यांनी सांगितले.
भाजप सरकार गोव्यातील जनतेला आरोग्य सुविधा पुरविण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. कॅगच्या अहवालाने त्यांचे अपयश उघड केले असून, जीएमसीमध्ये 51 टक्के डॉक्टरांची कमतरता आहे. तसेच, डीडीएसएसवाय योजना फक्त 447 आजारांच्या उपचारांपर्यंत मर्यादित आहे. त्यात कॅटरॅक्टसारख्या मूलभूत शस्त्रक्रियांचाही समावेश नाही, असा दावा आपचे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी केला.
गोवा प्रभारी व दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री अतिशी म्हणाल्या की, मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली सरकारने पंजाबमध्ये शिक्षण व आरोग्य क्षेत्रात अमूलाग्र परिवर्तन केले आहे. भाजप देशभर आयुष्मान भारत योजना प्रभावीपणे राबवण्यात अपयशी ठरला आहे. केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजनेसाठी केवळ 8 हजार कोटींची तरतूद केली आहे; मात्र पंजाबच्या आरोग्य क्षेत्रासाठी एकट्या आप सरकारने दीड हजार कोटींची तरतूद केली आहे, असे आतिशी यांनी सांगितले.

