सत्तरी तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर

0
11

पालीतील श्री दत्तात्रेय मंदिराला पाण्याचा वेढा; धारबांदोडा, डिचोली तालुक्यातही जनजीवन विस्कळीत; राज्यभरात पावसाची हजेरी

सत्तरी तालुक्यात गुरुवारी रात्रीपासून सुरू झालेल्या आणि शुक्रवारी दिवसभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने दमदार पुनरागमन केल्याने नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले, अनेक रस्ते पाण्याखाली गेले, तर काही ठिकाणी शेती-बागायतीमध्ये पाणी घुसल्याने नुकसानीची नोंद झाली. पाली येथील प्रसिद्ध श्री दत्तात्रेय मंदिराला नदीच्या पाण्याने वेढा घातला. दुसरीकडे गुळेली-मुरमुरे मार्गही पाण्याखाली गेल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली आणि नागरिकांसह विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली. याशिवाय राज्याच्या अन्य भागांतही पावसाने हजेरी लावली. धारबांदोडा तालुक्यातील रगाडा नदीला पूर आल्याने देऊळमळ-साकोर्डा येथील दोन पूल पाण्याखाली गेले. तसेच जोरदार पावसामुळे डिचोलीतील वाळवंटी नदीच्या पाणीपातळीतही वाढ झाली. दिवसभरात सांगे तालुक्यात सर्वाधिक 5.25 इंच, तर वाळपई येथे 4.80 इंच पाऊस पडला.

सत्तरी तालुक्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्याने वेळूस, रगाडा, वाळवंटी, म्हादईसह सर्व प्रमुख नद्यांच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी काही ठिकाणी झाडे पडणे, रस्त्यांवर पाणी साचणे आणि शेती क्षेत्रात पाणी घुसणे अशा घटना घडल्या. आठ दिवसांच्या पावसाच्या खंडानंतर अचानक सुरू झालेल्या या मुसळधार पावसामुळे शेतकरीही मोठ्या संभ्रमात पडले. अगोदर पाऊस नसल्याने शेतीची कामे रखडली होती, त्यानंतर आता झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अडचणी उभ्या ठाकल्या आहेत.

गुरुवारी दुपारपासून पावसाने सुरुवात केली होती. संध्याकाळी रिमझिम स्वरूपात सुरू पडणाऱ्या पावसाने रात्री जोर धरला आणि शुक्रवारी दिवसभर त्याने अक्षरशः धुमाकूळ घातला. सत्तरी तालुक्याच्या डोंगराळ भागासह बहुतेक सर्व गावांमध्ये मुसळधार पाऊस पडला.

प्राथमिक माहितीनुसार, गेल्या 24 तासांत सत्तरी तालुक्यात सरासरी 4.80 इंच पावसाची नोंद झाली. घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे अंजुणे धरणाच्या पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ झाली असून जलाशयातील साठा आता 26 टक्क्यांवर पोहोचला आहे. पावसाला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत पाणीसाठ्यात सुमारे 14 टक्के वाढ झाल्याचे समोर आले आहे.

दत्तात्रेय मंदिराला पाण्याचा वेढा
ठाणे ग्रामपंचायत क्षेत्रातील पाली येथे वेळूस नदीच्या काठावर असलेल्या प्रसिद्ध श्री दत्तात्रेय मंदिराला शुक्रवारी सकाळी नदीच्या वाढलेल्या पाण्याने वेढा घातला. मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत नदीचे पाणी पोहोचल्याने संपूर्ण परिसर जलमय झाला. मंदिराकडे जाणारा रस्ता आणि प्रवेशमार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने भाविकांना मंदिरात प्रवेश करता आला नाही. मंदिरालगत असलेल्या शेडमध्येही पाणी शिरल्याने काही काळ चिंता निर्माण झाली. पाण्याची पातळी आणखी वाढल्यास मंदिरातही पाणी घुसण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आवश्यक खबरदारी घेतली आणि मंदिरात पाणी शिरू नये यासाठी प्रयत्न केले.

2-3 तासांनंतर पाणी ओसरले
सुमारे दोन ते तीन तासांनंतर नदीच्या पाण्याची पातळी कमी होऊ लागल्याने पाणी ओसरले आणि परिस्थिती नियंत्रणात आली. त्यामुळे भाविकांनी सुटकेचा निश्वास सोडला. दत्तात्रेय मंदिर नदीकाठी असल्याने पावसाळ्यात अशा घटना यापूर्वीही घडल्या आहेत. गेल्या वर्षीही अनेक वेळा मंदिर परिसर जलमय झाला होता. यंदा मात्र पावसाच्या पहिल्याच मोठ्या सरीत मंदिराला पाण्याचा वेढा पडल्याने स्थानिकांनी चिंता व्यक्त केली.

गुळेली-मुरमुणे वाहतूक ठप्प
गुळेली ग्रामपंचायत क्षेत्रातील गुळेली ते मुरमुणे हा महत्त्वाचा रस्ता रगाडा नदीच्या वाढलेल्या पाण्यामुळे काही काळ पूर्णपणे पाण्याखाली गेला. परिणामी या मार्गावरील वाहतूक बंद झाली आणि गुळेली, शेळ मेळावली धडा, पैकूळ आदी गावांतील नागरिकांची मोठी गैरसोय झाली. गुळेली येथील सरकारी माध्यमिक विद्यालयात शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसला. पाण्याची पातळी कमी झाल्यानंतरच वाहतूक पूर्ववत झाली.

शेती-बागायतीत पाणी
गेल्या आठ दिवसांच्या पावसाच्या खंडामुळे आधीच चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना आता अचानक झालेल्या अतिवृष्टीचा फटका बसू लागला आहे. अनेक ठिकाणी भातशेती, भाजीपाला, काजू, सुपारी व आंब्याच्या लागवडीमध्ये पाणी शिरले असून, काही भागांत नुकसानीची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शेतकऱ्यांनी पावसाच्या प्रतीक्षेत केलेल्या लागवडी आधी पाण्याअभावी धोक्यात आल्या होत्या. आता अतिवृष्टीमुळे त्या पुन्हा संकटात सापडल्याने शेतकरी मोठ्या संभ्रमात आहेत.

नियंत्रण कक्ष कार्यान्वित
सततच्या पावसामुळे कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे. सत्तरीचे उपजिल्हाधिकारी लक्ष्मीकांत कुर्टीकर, मामलेदार धीरेंद्र बाणावलीकर आणि संयुक्त मामलेदार विष्णू राणे यांनी संबंधित विभागांशी सातत्याने संपर्क ठेवला असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. वाळपई येथील मामलेदार कार्यालयात आपत्कालीन नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे.

राज्यात 24 तासांत 1.64 इंच पाऊस

आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर राज्यात दाखल झालेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला. राज्यभरात चोवीस तासांत सुमारे 1.64 इंच पावसाची नोंद झाली. सांगे, सत्तरी, केपे या भागात जोरदार पावसाची नोंद झाली. परिणामी रगाडा, खांडेपार, म्हादई या नद्यांतील पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने साकोर्डा, निरंकाल, सत्तरीतील काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली. राज्यातील सर्वच भागात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. चोवीस तासांत सांगे येथे सर्वाधिक 5.25 इंच आणि वाळपई येथे 4.80 इंच अशा पावसाची नोंद झाली. राज्यात आत्तापर्यंत 37.64 इंच पावसाची नोंद झाली असून, पावसाचे प्रमाण 36.3 टक्के कमी आहे. चोवीस तासांत सांगे, केपे, काणकोण, धारबांदोडा, फोंडा, वाळपई, साखळी, पेडणे आदी भागांत जोरदार पावसाची नोंद झाली. तथापि, म्हापसा, पणजी, जुने गोवे, दाबोळी, मडगाव, मुरगाव भागांत पावसाचे प्रमाण थोडे कमी राहिले. हवामान विभागाने 18 ते 21 जुलैपर्यंत काही प्रमाणात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.