31 C
Panjim
Thursday, April 22, 2021

सत्तरी ः सांस्कृतिक शोधयात्रा

  •  विनायक विष्णू खेडेकर

शेष गोव्याहून अलग विधी-विधानांचे आचरण, आविष्करण अभ्यासानंतर प्रश्‍न पडावा. सत्तरी प्रांत संास्कृतिकदृष्ट्या गोव्यातच आहे का? ‘घुमट वाजते तो गोवा’ याच चालीवर ‘रणमाले’ लोकनाट्य होते ती सत्तरी?

कोणत्याही भूप्रदेशाची राजकीय वा महसुली सरहद्द सांस्कृतिक सीमारेषांहून भिन्न असते. हा सिद्धांत सोयिस्करपणे बाजूला ठेवल्यामुळेच भारताच्या विविध भागांतील सीमावाद, प्रांतवाद आजही धगधगत आहेत. सांस्कृतिक चतुःसीमा निर्धारित करण्यासाठी त्या भागातील लोकस्तरावर नांदणारी सांस्कृतिक पर्यावरण संबद्ध जात-जमात निर्बंधित समाजरचना, व्यवस्थेचे ज्ञान व जनजीवनाचे भावविश्‍व प्रकटीकरण अलक्षित राहू नये, याचे भान राखून केलेला हा अभ्यास.

ताम्रपट, दस्तऐवज, कागदपत्र, बखरी अशा प्रत्यक्ष संदर्भ पुराव्यांनी इतिहासलेखन सिद्ध होते, तर सांस्कृतिक विचक्षणा लोकस्तरावरून करावी लागते. यासाठी तेथील लोकवेद अभिव्यक्ती, वांशिक स्मृतीतून प्रवाहित लोकश्रुती यांचा मूलगामी विचार गरजेचा ठरतो. सोबत त्याहून महत्त्वाचे घटक, परिस्थितीजन्य पुरावे, जीवनशैलीतील सांस्कृतिक विधी-विधाने, जनजीवनाच्या श्रद्धा, विश्‍वास, भ्रमादी अभिव्यक्तींचे अभिसरण, आणि या एकूण सामग्रीचे अभिनिवेशरहित तर्कशुध्द विचारसरणीतून गाळून घेतलेले श्रुतीसंदर्भ आधारित विश्‍लेषण, विवेचन. या पार्श्‍वभूमीवर काय समजत नाही हे समजतं सत्तरीच्या शोधयात्रेचे ठेवलेले हे प्रस्थान.
सत्तरीतील वेळगे गावातील शंकर गावकर नावाच्या एका बहुश्रुत प्रज्ञावंताने एकेकाळी मौखिक परंपरेतील एक संदर्भ ऐकविला होता.
पराकर्मी भोव भारी जाले राणे सांकळिचे नगरी|
दहड मारुनी त्यानी जोडिले गाव साठ सत्तरी॥
‘दहड’ शब्दाचे रानटी निवडुंग व शबर जमात असे दोन अर्थ. सामान्य माहिती अशी की, म्हादई नदीच्या उत्तरेकडील साठ व दक्षिणेकडील सत्तर असा हा ग्रामसमूह आहे. अर्थात हळशी कदंब राजवटीत बेळगाव जिल्ह्यातील बराच भूभाग सत्तरी नामे ज्ञात होता असे इतिहास सांगतो. सांस्कृतिकदृष्ट्या ‘रणमाले’ या वैशिष्ट्यपूर्ण लोकनाट्याचे विधिरूप आविष्करण होते; सत्तरी प्रांताची व्याप्ती तेवढी असावी हे तर्काने मान्य करावे लागते. रणमाले लोकनाट्य सांगे तालुक्यातील भाटी-कुमारे येथेही होते ही अधिकची माहिती. साठ वा सत्तर गाव निश्‍चित करणे हा यात्रेचा पुढील दुसरा टप्पा आहे. यासाठी विद्यमान सत्तरी प्रांतातील गावासोबतच आजूबाजूच्या अनेक गावांचा सजग क्षेत्रीय अभ्यास गरजेचा ठरतो. कारण अनेक सांस्कृतिक गतिविधी, विद्यमान सत्तरीतही गाव-विभागवार न केवळ आविष्करण बदलते तर चोर, न्हावण वा करुल्योही विशिष्ट विभागातच आचरित, अभिव्यक्त होतात.

शेष गोव्यात अभावाने आढळणार्‍या सत्तरीतील काही जमातींची जीवनशैली, देवता संकल्पना व पूजा पद्धतीसह आचरित विधि-विधाने, अन्न पदार्थ, वेषभूषेसह एकूणच गतिविधी तपासून पाहिल्यानंतर ठळकपणे जाणवते की, राजस्थानातील रजपुतांशी समभाव दाखविणारे राणे, कोकणस्थ वा चित्पावन ब्राह्मण व कष्टकरी कुळवाडी; या भागाच्या मानव संसाधनाची ही विशेषतः आहे. गोव्याच्या अनेक गावांत दीर्घकाळ वास्तव्य असलेल्या चित्पावनांची सत्तरी हीच मूळ जन्म, कर्म, दीक्षाभूमी आहे. ङ्गोंडा तालुक्यातील कुळवाडी वंशाची कुटुंबे, रोटी-बेटी व्यवहारासह स्वतःला सतरकार म्हणवितात. मात्र त्यांची ‘खामीण’ सत्तरीतील नाही. ‘आम्ही गावडे पण ते तुमच्या तिकडच्यासारखे नव्हेत काय, आम्ही ‘मराठा,’ असे अभिमानाने सांगणारी गावडा जमात वेळगे, शेळ-मेळावली अशा गावातूंन भेटते. जमीन मालकी वा कसणे यासाठीची ‘मोकासो’ पद्धती सत्तरीतच. अख्ख्या गोव्यात कार्यरत ‘गावकारी’-कोमुनिदाद ही कृषी, अर्थविषयक संस्था, व्यवस्था पूर्वकालीन सत्तरीत नाही.
गोव्याचे सांस्कृतिक व्यक्तिमत्त्व, संकल्पना स्तरावर स्पष्ट करणारे घुमट, सांतेर, बेताळ, देवचार, मांड आदी घटक तेच पण तसेच नव्हेत. सत्तरीत त्यांचे कार्य-कारण-भाव बदलतात. येथील घुमटगाजाचा अनोखा बाज, रोयण-वारुळाऐवजी कलशरूपातील सांतेर, नामधारी बेताळ, देवता अर्चन पध्दती. अर्पण वस्तूत ङ्गरक असलेला देवचार वा मांडाची दमन नियमनाचे अलग व्यवहार; शेष गोव्याहून सारेच भिन्न.

सत्तरीतील देवमंडल हा स्वतंत्र अभ्यास विषय व्हावा एवढी त्याची व्याप्ती. सर्वत्र मातृदेवतांचे वर्चस्व. सांतेर, ब्र्राह्मणी, केळबाय सोबत कधी जोगेश्‍वरी, म्हाळसाय, कुळाची माया आहेच. ‘पैंजीशीर’सम काही अगम्य अभिधानात वावरणार्‍या माया. खेरीज प्रमुख देवतांचा आकारी, निरंकार, पै पूर्वज, बेताळ, रवळनाथ व पुरावतार, पिसो देव, कधी आजोबा अशी नावे धारण करणार्‍या राखणदार दैवतशक्ती.
पुरुष दैवतांचे मान-सन्मान गाव पातळीवर जरूर आहेत पण जात वा कुटुंब स्तरावर मातृदेवतांचेच वर्चस्व. गावात राहतात म्हणून नव्हे तर देवतेचे खरेखुरे अनुयायी म्हणून नामपदांत ‘आय’ वापरत त्या देवतेचेच आडनाव धारण करणारे सांतेरकार, केळमायकार म्हाळशेकार ङ्गक्त सत्तरीतच. घाटमाथ्यावरून उतरताना कर्नाटकाला भिडलेली राजकीय सीमारेषा. कोणे एके काळी खुष्कीच्या मार्गाने चालणार्‍या व्यापाराची अधिष्ठात्री, नौकेवर बसलेली देवता गांजे गावी अनाम, तर सावर्डे व शेळ-मेळावलीत तिची ओळख गांजेश्‍वरी.
गोव्यात सर्वत्र भूदेवता सांतेर. वारूळ रूपात, गावची अधिकारिणी हा दर्जा प्राप्त झालेली. सत्तरीत ती कुठे प्रमुख, कोठे दुय्यम, सर्वत्र कलश रूपात. सत्तरीत वारूळ रूपातील सांतेर नाही.

शोधयात्रा किती सजगतेने करावी लागते याचा वस्तुपाठ देणारेउदाहरण. मावशी व वेळगे या दोन गावांत रोयण रूपातील सांतेर असल्याचे ठामपणे सांगितले गेले. भ्रमंतीत मावशीला एका घराच्या प्रवेश भागातील बंदिस्त जागेत भली थोरली रोयण, पूजा केलेली. शेजारी तेवणारी समयी व समोर एक गृहस्थ एका कलशाला पाकळ्या लावून भाविकांसह कौल मागत बसलेले. ही परंपरागत गावातील देवता नसून व्यक्तिगत देवस्थान असल्याचे त्यानीच सांगितले. वयस्कर गावकर्‍यांनी पुष्टी दिली. वेळग्यात एका शिळेखाली वारूळ असल्याची असंभव कथा ऐकविली गेली.
सत्तरीतून वाहणार्‍या म्हादई नदी तीरावरील दोन विधाने, गोव्यात कोठेही धागे-दोरे नसलेली सुवासिनींची व्रते… चवथीच्या पाचव्या दिवशी देवी पुजणे. यासाठी आंघोळली सुवाशीण नदीवर जाऊन तेथील पाण्याने कलश भरून घेते. त्यावर आंब्याचा टाळ व नारळ, कुणाशी संभाषण होऊ नये म्हणून तोंडात घोळणारी नदीतील पाण्याची गुळणी घरात कलश पूजेला लावल्यानंतर टाकायची असते. सायंकाळी देवी पोचविणे, कलशातील ते पाणी पवित्रतेने नदीच्या त्याच प्रवाहात सोडणे. दुसरा विधी कार्तिक शु. दशमीला. नदी तीरावर निवडलेली जागा शेण सारवून पवित्र केलेली. त्यावर दहा आंब्याची पाने, नदी पात्रातून शोधून मिळविलेले गुळगुळीत लांबोडके दगड, झेंडूची ङ्गुले, काजळ, कुंकू घालून पूजा. दिवा पेटवून नैवेद्य. हे दहा ग्राम अवतार. या व्र्रतासाठीच स्वीकारलेला तीन दिवसांचा उपवास तुळशी लग्नदिनी संपतो.
शिगम्यातील ‘राधा’ नावाचा खेळ, न्हावण, हळदोणी हेे देवता संबध्द विधी सत्तरीची अस्मिता कथन करतात. कुणाला खरे वाटणार नाही. पण शिगम्यात इतरत्र असलेला ‘गुलाल’, रंग खेळणे परंपरा मूलतः सत्तरीत नाही.

सत्तरीतील लग्नविधीत नायकीण आवश्यक, तिला विशेषाधिकार. वधूची पाठराखीण म्हणून सन्मानाने येते, मुरवतीत वावरते. लग्न लागतेवेळी वर व वधूने एक नाणे व थोडे जिरे दाढेत धरून ठेवणे यासाकट. केळीच्या पानावर थापून एकाच बाजूने भाजलेली नाचणीच्या पिठाची जाडजूड, अवास्तव आकाराची भाकरी सासरी जातेवेळी वधूसोबत जाते. तेथे वरमाय त्या भाकरीचे तुकडे करून उपस्थितांना वाटते. या भाकरीचे नाव ‘माणकें’. न कधी ऐकिल्या, न पाहिल्या अशा चालीरीती.

शेष गोव्यातील कोकणी भाषिकांना अपरिचित असे बरेच शब्द, म्हणी, वाक्‌प्रचार सत्तरीच्या ग्रामीण परिसरात सतत आढळतात. स्वकष्टांचा ङ्गायदा इतर उपटतात- ‘खाबेरबे.’ ‘हळबळीत’- मोकळेपणी न बोलणे, ‘हुलबर’- मुलगी सम्मेलनात काय बोलणार? काळोखात सावली दिसल्याने ‘मुलमुलो’ भरतो. घर बांधायला घेतलेल्याला- ‘धावसोर’ लागतो. ‘रिंडायता’- कामाशिवाय हिंडणे. चित्पावनीत रिंड्यावे.. ‘हाबत’ लागणे. ‘साळात्यो’ करणे, अचानक पावसाने ‘घुमट’ घातले आणि भिजू नये म्हणून घरा दिशेने ‘रुमाडी’ धरली. सुट्टी पडल्याने दोघांनीही ‘वाकळून’ वेळ घालवला. अर्थ दुरापास्त.

सती प्रथा बंद होऊन शतकांचा कालावधी लोटला. काणकोणातील पैंगीण गावात तर वळवईत ‘लानसूर’ नावे होणारा आगळा विधी सोडला तर बाकी गोव्यात ‘सती’चे स्मरणसुद्धा नाही. सत्तरीत शिगम्यातील ‘करुल्यो’, सतीपूजन विधीत मुलाना स्त्रीवेषात सजवून त्यांची मिरवणूक, करुल्याना घरी आणून त्यांचे पूजन, ओटी भरणे येथेच होते. तथाकथित शबर हत्येनंतर त्यांच्या विधवा सामुदायिक सती गेल्या; हा पापक्षालन विधी तर नसेल?
शिगम्यात घरी-दारी होत असलेले ‘खेळ’, सोंगे काढून गात, नाचत ‘अल्लख’ मागणे, सत्तरीतच चोर पुरणे हा असाच एक विधी झरमे व करंजोळ या दोन गावी. पुरून घेण्याची शिक्षा गावकरी भोगतो. काही मानेपर्यंतचा देह जमिनीत पुरून घेतात, काहीचे ङ्गक्त डोके जमिनीत गाडलेले, एकाला सुळावर चढवतात. ‘पानांचे चोर’, बर्‍याच गावातील प्रकार. चोरी केवळ बागायती ङ्गळांची. मग चांगले काही चोरून नेऊ नये म्हणून याना आपणहून काहीतरी द्यायचे.

चोरी करण्याचा मुक्त परवाना शिगाव, पैंगीण अशा काही इतर गावांतून आहे, तद्वत शिगम्यातील विशिष्ट दिवशी विधी म्हणून चोरी करण्याचा परवाना ठराविकांनाच लाभतो. चोरी केल्याबद्दल होणारी शिक्षा पोलीस, न्यायालय यांच्याकडे असली तरी या शर्विलक विधीसाठी मात्र दंडाची तरतूद संस्कृतीने करून ठेवलेली.
घोडेमोडणी हे अश्‍वनृत्य, वार्षिक, आवश्यक विधी म्हणून अनेक गावांतून अपरिहार्यतेने साजरा होणारा प्रकार. घोडेमोडणी डिचोलीत होते तशी पेडण्यातील मोरजीतही. पण सत्तरीतील धारणा, संकल्पना व आविष्करणरूप पूर्णतः भिन्न. वरवर पाहाता ती सत्तरीतूनच पसरली असावी. खरंतर या तिन्ही प्रांतांवरती अलीकडचा काळ भोसले राजकुलाचे आधिपत्य होते. त्यापूर्वीचा ज्ञात इतिहास सत्तरी प्रांत हळशी कदंब राजवटीत असल्याचे सांगतो.

‘रणमाले’ हे आगळे-वेगळे लोकनाट्य घाटमाथ्यावरील कर्नाटकातील काही गावांसह सांगेतील भाटी-कुमारे येथेही, प्राचीन सत्तरीत होते. महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणी इथे ऐकावी. पण येथे ती शृंगारिक नाही तशीच आध्यात्मिक, भेदिक लावणीही नाही. तर विधीसाठी मंत्र पठणवत तिचे गायन, अध्ययन होते.
सत्तरीतील पवाड्यात ‘जी जीर जी’ सापडत नाही पण ती शूरांची वीर्य, शौर्यगाथा. इथला लोकशाहीर डङ्गाविना गात असतो. छत्रधारी राजांचे, सत्तरीची राखण, जडण-घडण करणार्‍यांचे पवाडेे. नोंद करण्याजोगी गोष्ट म्हणजे लावणी व पवाडा. दोन्ही प्रकार शिगम्यात गायले जातात, तेही म्हादयच्या पलीकडील तीरावरील गावांतून. ‘जती’ हा लोकगीत प्रकार सगळ्या गोव्यात. संज्ञा तीच. सत्तरीत मात्र संकल्पना व आविष्करणरूप दोन्ही बदललेले. ‘सोकारत’ गीत प्रकारात संकल्पना, विषय व गानपद्धती इतर भागातील जत वा ‘चौरंग’हून भिन्नता दाखविणारी.

शेष गोव्याहून अलग विधी-विधानांचे आचरण, आविष्करण अभ्यासानंतर प्रश्‍न पडावा. सत्तरी प्रांत संास्कृतिकदृष्ट्या गोव्यातच आहे का? ‘घुमट वाजते तो गोवा’ याच चालीवर ‘रणमाले’ लोकनाट्य होते ती सत्तरी?
अजून कुठे पुरी झालीय शोधयात्रा? ही तर अडखळतची पूर्व-प्राथमिक वाटचाल.

STAY CONNECTED

848FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

चैत्रगौरी हळदीकुंकू ः निसर्गपूजा

सौ दीपा जयंत मिरींगकर(फोंडा) गौरीला माहेरपण करणे हे एक निमित्त. निसर्गातील फळाफुलापानांचे रंग, रूप, चवी अनुभवायला आणि लेकीबाळींना...

कालमापनाचे साधन ः ‘पंचांग’

सुमरंग रायसालसेत आम्ही वर्ष, महिना, वार, दिवस जसं लक्षात ठेवतो, तसं पंचांग लक्षात ठेवायला त्रास नाही. ग्रहणाची वेळच सांगते की आमचं पंचांग...

असे व्हायला नको होते, पण…

ज. अ. रेडकर(सांताक्रूझ) ‘‘कुठेही गेले तरी आता पैसे दिल्याशिवाय नोकरी मिळत नाही सर, तेव्हा माझा नाइलाज आहे, निदान...

आईची माया

प्राजक्ता गावकर ‘‘आईची मायाच तशी असते ग पोरी.’’ अपघातात आई गेली पण तिच्या मनात तुला आणि बाळाला पाहायचे...

टॅक्सीचालकांनी संप मागे घेत चर्चेसाठी पुढे यावे ः मुख्यमंत्री

राज्यातील टुरिस्ट टॅक्सीचालकांनी आपला संप मागे घेऊन चर्चेसाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांच्या एका प्रश्‍नावर बोलताना काल...

ALSO IN THIS SECTION

चैत्रगौरी हळदीकुंकू ः निसर्गपूजा

सौ दीपा जयंत मिरींगकर(फोंडा) गौरीला माहेरपण करणे हे एक निमित्त. निसर्गातील फळाफुलापानांचे रंग, रूप, चवी अनुभवायला आणि लेकीबाळींना...

कालमापनाचे साधन ः ‘पंचांग’

सुमरंग रायसालसेत आम्ही वर्ष, महिना, वार, दिवस जसं लक्षात ठेवतो, तसं पंचांग लक्षात ठेवायला त्रास नाही. ग्रहणाची वेळच सांगते की आमचं पंचांग...

असे व्हायला नको होते, पण…

ज. अ. रेडकर(सांताक्रूझ) ‘‘कुठेही गेले तरी आता पैसे दिल्याशिवाय नोकरी मिळत नाही सर, तेव्हा माझा नाइलाज आहे, निदान...

आईची माया

प्राजक्ता गावकर ‘‘आईची मायाच तशी असते ग पोरी.’’ अपघातात आई गेली पण तिच्या मनात तुला आणि बाळाला पाहायचे...

गुढी उभारूया .. नवस्वप्नांची

पौर्णिमा केरकर ते दृश्य पाहून मला माझं बालपण आठवलं. देवळात गुढीपाडव्याचे नाटक बघण्यासाठी आम्ही ही अशीच जागा अडवून...