Home बातम्या सण चवथीचा

सण चवथीचा

0

-विष्णू सूर्या वाघ

 गोव्यात संपन्न होणार्‍या सर्व सणांमध्ये ‘सणांचा राजा’ हे अभिधान कुठल्या सणाला द्यायचे ठरवले तर ते नि:संशयपणे गणेश चतुर्थीला द्यावे लागेल. एरवी कोकणी भाषेत चतुर्थी म्हणजे ‘चवथ,’ पण गोव्यात एकूणच गणेशोत्सवला ‘चवथ’ म्हणूनच संबोधले जाते. गोव्यातली चवथ ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि आगळीवेगळी. या उत्सवाची सर दुसर्‍या कुठल्याही उत्सवाला नाही. वैयक्तिक, कौटुंबिक आणि सार्वजनिक अशा तिन्ही स्तरांवर जो प्रतिसाद चवथीला लाभतो तसा इतर सणांना लाभत नाही. विशेष म्हणजे ज्या पद्धतीने चवथ गोव्यात साजरी होते ती पध्दत आपल्या शेजारील महाराष्ट्र अथवा कर्नाटक राज्यांतही पाहायला मिळत नाही.

‘चवथ’ हा एकच सण असा आहे ज्यात गोव्यातील तमाम हिंदुसमाज अमाप उत्साहाने सहभागी होतो. श्रीमंत असो की गरीब, उच्चवर्णीय असो की मागासवर्गीय, आस्तिक असो की नास्तिक, प्रत्येक हिंदुधर्मियाच्या मनात चवथीचे खास स्थान आहे. खेडेगावापासून शहरांपर्यंत या सणाच्या उत्सवाचे लोण पसरलेले आढळते. महाराष्ट्रात दिवाळी, कर्नाटकात दसरा, केरळात ओणम, बंगालात दुर्गापूजा, उत्तर भारतात रामनवमी, गुजरातेत कृष्णपूजा त्याचप्रमाणे गोव्यात चवथ! हा सण गावातील लोकांनाच नव्हे तर ठायीठायी विखुरलेल्या कुटुंबातील माणसांनाही एकत्र आणणारा. वर्षातून एकवेळा त्यांचे ॠणानुबंध दृढ करणारा. एकत्र कुटुंबपध्दती ढासळत चाललेल्या आजच्या काळात कुटुंबामधले नात्यांचे धागे पुन्हापुन्हा जोडत राहते ती ङ्गक्त चवथ. अशी किमया इतर कुठल्याही सणाला साधता आलेली नाही.

विविध शैलींचे मूर्तिकार

गोव्यातील चवथ भाद्रपद शुक्ल चतुर्थीला सुरू होते. पण तिची समाप्ती एकाच दिवशी होत नाही. चवथीचा उत्सव मखरात गणपतीच्या मूर्तीची स्थापना करून सुरू होतो आणि गावातल्या नदीत, तळीत, विहिरीत किंवा ओढ्यात त्या मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर संपतो. काही ठिकाणी दुसर्‍याच दिवशी म्हणजे भाद्रपद शुक्ल पंचमीला श्रीगणरायाचे विसर्जन केले जाते. याला ‘दीड दिवसांची चवथ’ म्हणतात. इतर ठिकाणी पाचव्या, सातव्या, नवव्या, दहाव्या किंवा अकराव्या दिवशी चवथीची समाप्ती होते. क्वचित काही ठिकाणी एकवीस दिवसांची चवथ असते. गोव्यामधील काही गावात सारस्वत समाजातील काही लोक चवथीला पुजलेली गणेशमूर्ती वर्षभर ठेवतात व पुढच्या वर्षी नवीन गणपती पुजल्यानंतर तिचे विसर्जन करतात. मखरात पुजली जाणारी ही गणेशमूर्ती चिकणमातीपासून बनवलेली असते. मध्यंतरी काही वर्षे प्लास्टर ऑङ्ग पॅरिसपासून बनवलेल्या मूर्त्या पूजण्याची टूम आली होती. पण आता सरकारनेच प्लास्टर ऑङ्ग पॅरिसच्या मूर्त्यांवर बंदी घातली आहे. चिकणमातीपासून मूर्ती बनवणारे शेकडो कलाकार गोव्यात गावोगावी आहेत. साधारणत: मे महिन्यापासून त्यांची पूर्वतयारी चालू होते. प्रत्येक मूर्तीकाराचे किमान ऐंशी टक्के ग्राहक ठरलेले असतात. पिढ्यान्‌पिढ्या एकाच मूर्तीकाराच्या कुटुंबाकडून गणपती आणण्याची प्रथा बहुतेक घरांत रूढ आहे. मग त्यासाठी प्रवासखर्च अधिक आला तरी बेहत्तर. पेडणे (विशेषत: पार्से व मांद्रे), डिचोली (कुंभारवाडा, मये), साष्टी (ङ्गातोर्डा), काणकोण इत्यादी तालुक्यांत प्रसिध्द असे मूर्तीकार आहेत. त्यांनी बनविलेल्या गणपतींना संपूर्ण गोव्यातून मागणी असते. काही ठिकाणी माजाळी, सदाशिवगड, कारवार येथूनही गणपती आणले जातात. काही वर्षांपूर्वी पेणचे गणपती मोठ्या प्रमाणात येत, पण आता त्याचे प्रमाण घटले आहे.

गणेशमूर्ती बनविणारे अनेक कलाकार गोव्यात निव्वळ त्यांच्या शैलीवरून ओळखले जातात. गणेशमूर्तीची बसण्याची ढब, मूर्त्यांचे रंगकाम, गजमुखाची ठेवण, चेहर्‍याची रेखाटणी अशा अनेक वैशिष्ट्यांसहित मूर्तीकाराची पारख व निवड केली जाते. नागपंचमीचा सण येण्यापूर्वी मूर्तीकाराच्या चित्रशाळेत जाऊन लोक आपापला गणपती ‘बुक’ करतात. श्रीगणेशाची मूर्ती आसनावर बसलेली किंवा उंदीर, गरूड, मोर, हंस, गाय, हत्ती, सिंह अशा वाहनांवर आरूढ झालेली असते. काही ठिकाणी श्रीकृष्ण, श्रीदत्तात्रेय, अक्कलकोट, स्वामी समर्थ, साईबाबा यांच्या रूपातील गणेशमूर्तीही पुजली जाते. हल्ली शंख, शिंपला, जास्वंदीचे ङ्गूल यात विराजमान केलेली गणेशमूर्तीही बरीच लोकप्रिय होत चालली आहे. तथापि लोकांची सर्वात जास्त पसंती असते ती पायावर पाय टाकून सिंहासनावर बसलेल्या पीतांबरधारी गणरायाची!

गोव्यामधल्या अनेक घरात अजूनही झबले घातलेला बालगणेश पूजनाला लावण्याची प्रथा आहे. कोकणीत झबल्याला ‘बेबो’ म्हणतात. त्यामुळे अशा झबलेधारी बालगणेशाला ‘बेब्याचो गणपती’ म्हटले जाते. झबल्यातील ही मूर्ती कधीपासून रूढ झाली ते सांगणे अवघड आहे. काही ठिकाणी श्रीगणेशाबरोबर शंकर-पार्वतीच्या प्रतिमांचेही पूजन केले जाते.

सरकारचे अर्थसाहाय्य

चिकणमातीपासून बनवलेली श्रीगणेशाची मूर्ती आतून पोकळ असते. या मूर्तीला पाठीमागे दोन छिद्रे केलेली असतात. विसर्जनावेळी या छिद्रातून पाणी आत शिरते व मूर्तीचे वजन जाणवत नाही. मूर्त्या बनवण्याचा व्यवसाय हा पारंपारिक असला तरी उत्तम चिकणमातीचा अभाव, मूर्तीकारांची घटती संख्या, रंगाचे वाढत चाललेले भाव अशा अनेक कारणांमुळे सध्या डबघाईला आला आहे. कित्येक गावातील पारंपरिक मूर्तीकारांनी ‘परवडत नाही’ या कारणावरून मूर्त्या बनविणे बंद केले आहे.

या व्यवसायाला थोडे तरी संरक्षण मिळावे या हेतूने गेल्या तीन वर्षांपासून गोवा सरकारच्या हस्तकला महामंडळाने खास अर्थसाहाय्य योजना राबविली आहे. त्यामुळे मूर्तीकारांना थोड्या प्रमाणात का होईना, पण दिलासा मिळाला आहे.

मूर्तीकाराच्या चित्रशाळेत निवडून ठेवलेली गणेशमूर्ती चवथीच्या आदल्या दिवशी, म्हणजे तृतीयेला किंवा जवळ असेल तर त्याच दिवशी सकाळी चित्रशाळेतून घरी आणली जाते. घरात घेण्यापूर्वी त्या मूर्तीला पाटावर ठेवून, अगरबत्ती किंवा एकारतीने ओवाळण्यात येते. ङ्गटाके लावले जातात. साधारणत: त्यापूर्वीच गणपती पुजायचे मखर किंवा सजावटीची आरास तयार केली जाते. गोव्यात हार्डबोर्डपासून बनवलेले व हातांनी रंगवलेले जे पारंपरिक मखर असते त्याला ‘पोर्ताल’ किंवा ‘देट्टो’ म्हणतात. आता या पोर्तालची जागा थर्मोकॉलच्या सजावटीने घेतली आहे. काही ठिकाणी मखराची आरास रंगीत कागद वापरून केली जाते. क्वचित केळीच्या गब्यांचाही वापर केला जातो. थर्मोकॉलची सजावट दिसायला सुबक असली तरी पर्यावरणीय दृष्टिकोनातून थर्मोकॉलचे मटेरीयल हानिकारक मानले जाते.

वैशिष्ट्यपूर्ण माटोळी

गणेशमूर्तीला मखरात बसविण्याआधी आणखी एक काम कटाक्षाने पूर्ण केले जाते, ते म्हणजे, माटोळी बांधण्याचे! ‘माटोळी’ हा प्रकार ङ्गक्त गोवा आणि तळकोकणात आढळतो. कोकणात त्याला माटवी म्हणतात. ही माटोळी मखराच्या पुढे, छताला टांगून बांधली जाते. बांबूच्या काठ्यापासून सर्वसाधारणपणे चौकोनी आकाराचा सांगाडा आधी तयार केला जातो. तो छताला बांधला की या माटोळीला सर्वप्रथम मध्यभागी बांधली जाते ती पाच, सात किंवा नऊ नारळांची पेंड. ती न मिळाल्यास मोठ्या आकाराचा न सोललेला नारळही बांधला जातो. त्यानंतर माटोळीच्या चारही कडांना आम—पर्णांच्या डहाळ्या बांधल्या जातात. जंगलात किंवा डोंगरावर सापडणारी कांगलां, कुंडळां, नागूचे कुडे, घागर्‍या, पोङ्गळीचा कातरा अशा अनेक वस्तू माटोळीला टांगल्या जातात. त्या बांधण्यासाठी दोरी किंवा सुंभ वापरला जात नाही. त्याऐवजी केवणीचे दोर वापरले जातात. दुधी भोपळा, घोसाळी, तवशी, केळ्यांचा घड, मक्याचे कणीस, ङ्गण, पेरू, सङ्गरचंद, डाळींब यांसारखी निसर्गाची देणही माटोलीला बांधली जाते.

गोवा सरकारतर्ङ्गे दरवर्षी कला व संस्कृती खात्यामार्ङ्गत उत्तर व दक्षिण गोवा पातळीवर माटोळी सजावट स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेत बक्षीस प्राप्त ठरलेल्या अनेकजणांनी निसर्गाची भटकंती करून दीडदोनशेहून अधिक वस्तू माटोळीला बांधण्याचा पराक्रम केला आहे. गणेशासमोर माटोळी बांधण्याचे नेमके प्रयोजन काय त्याचा उहापोह याच लेखात अन्यत्र केला आहे.

मखरातील श्रीगणेशासमोर माटोळी बांधण्याचे काम चवथीच्या आदल्या रात्री पूर्ण केले जाते. पूर्वीचे लोक माटोळीसाठी लागणारी कांगलां, कांदळा, करमलां, घागर्‍या, नागूचे कुडे स्वत: डोंगरावर जाऊन आणत असत. ही प्रथा हल्ली बंद होत चालली आहे. आता माटोळीचे सामान बाजारपेठेत जाऊन विकत घेतले जाते. त्याच्या किमतीही दरवर्षी वाढत जातात.

गणपतीची विधिवत स्थापना झाली की पुन्हा माटोळीला हात लावला जात नाही. गणपती मखरात बसलेला असेपर्यंत माटोळीला नवीन कुठलीच वस्तू बांधली जात नाही. विसर्जनापूर्वीची शेवटची आरती झाली की गार्‍हाणे घालून झाल्यावर यजमान माटोळीला हात लावतो व माटोळी हलवतो.

गोव्यातील अनेक समाजात चवथीच्या सणाला नवीनच लग्न झालेल्या मुलीच्या घरून जावयाच्या घरी ‘वजे’ पाठवण्याचा रिवाज असतो. या वझ्यात करंज्या, लाडू, ङ्गळङ्गळावळ इत्यादींसोबत माटोळीला लागणारे लाकडी सामानही पाठवले जाते. ही लाकडी ङ्गळङ्गळावळ बहुधा सावंतवाडीवरून आणतात. इतर वस्तूंसोबत या लाकडी वस्तूही माटोळीला बांधण्यात येतात.

एखाद्या दांपत्याला मूल होत नसेल तर घरातल्या गणपतीला सांगणे करण्यात येते. योगायोगाने त्यावर्षी अपत्य प्राप्ती झाली तर त्यावर्षीच्या चवथीत त्या बालकाला कपड्यात गुंडाळून काही क्षण माटोळीला बांधून ठेवतात. श्रीगणेशाविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक आगळावेगळा रिवाज ङ्गक्त गोव्यातच आढळणारा!

गौरी-शंकराची पूजा

भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा दिवस उजाडला की सकाळपासून प्रत्येक घरात गणेशपूजनाची लगबग सुरू होते. पहाटे पहाटे गावातील मुले उठून पत्री आणायला डोंगरावर जातात. घरातील बायका नैवेद्य व स्वयंपाकाच्या तयारीला लागतात. तरुण मुलं शमेळ, घुमट इत्यादी आरती साहित्य बाहेर काढून साङ्गसङ्गाई करून ठेवतात. म्हातार्‍या बायका कापसाच्या वाती वळणं, एकारती-वाडगे-पडगे साङ्ग करणं इत्यादी कामात स्वत:ला गुंतवून घेतात.

गणेशमूर्तीची स्थापना करण्याआधी गणेशपूजा केली जाते. एका मोठ्या परातीत एक पड तांदूळ घेऊन त्यावर श्रीङ्गळ ठेवलं जातं व त्याची पूजा करण्यात येते. कोणत्याही देवकार्यात ही गणेशपूजा अनवार्य मानली जाते. त्यानंतर गणपतीच्या उजव्या बाजूला गौरी व शंकर यांची पूजा केली जाते. गौरी व शंकराची छापील चित्रे बाजारात उपलब्ध असतात. हळदीचे रोप, हरणीची पिळ्या ङ्गुलांची रोपे, चिड्ड्याचे इवलेसे झाड व पत्री यांना अळवाच्या भल्यामोठ्या पानाला एकत्र बांधले जाते. या पानाला कोकणीत ‘कांसाले’ म्हणतात. त्या पानाची जुडी करून त्याला गौरीचे चित्र गुंडाळतात व ती पूजेला लावतात. या गौरीला काळ्या मण्यांचे इवलेसे मंगळसूत्रही घातले जाते. गणपती विसर्जन करताना गौरीचेही विसर्जन घरातल्या तुळसीवृंदावनात करण्यात येते.

शंकराचे चित्र गौरीच्या बाजूलाच चिकटवले जाते. न सोललेल्या नारळाच्या रूपात शंकराची प्रतिकात्मक पूजा केली जाते. गौरी-शंकराची पूजा झाल्यानंतर घरचा यजमान गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापनेकडे वळतो. गोव्याच्या बहुजन समाजातले अवघेच लोक पुरोहिताकरवी प्रतिष्ठापना करतात. एरवी हे काम स्वत:च केले जाते. गणपतीच्या आसनाखाली अक्षता ठेवून मूर्ती प्रतिष्ठित केली जाते. यावेळी गणपतीची नजर बरोबर आहे की नाही याचा अंदाज घेऊन मूर्ती मखरात बसवतात. नंतर गंधाक्षता, ङ्गुले, पत्री व दुर्वा वाहून विधिवत पूजा करण्यात येते.

आरत्यांचा धडाका

पूजा आटोपल्यानंतर महत्त्वाचा भाग म्हणजे आरत्या. शहरी भागात आरतीला विशेष महत्त्व दिले जात नाही. पण गावातल्या आरत्यांचा डौल काही निराळाच असतो. शहरातल्या फ्लॅटमध्ये कुटुंबातलेच लोक एखाद-दुसरी झांज वाजवून आरती म्हणतात. पण गावातली आरती मात्र एकदम साग्रसंगीत. शमेळ, घुमट, कासाळे घेऊन किंवा पेटी, पखवाज, झांज घेऊन. शमेळ-घुमटावरच्या आरत्यांना ‘व्हडलें वाजप’ म्हणतात. गणपतीसमोर कमीत कमी तीन आरत्या म्हणण्याची प्रथा आहे. सुखकर्ता दु:खहर्ता, लवथवती विक्राळा आणि दुर्गे दुर्घट भारी- त्याशिवाय ओवाळू आरती मदन गोपाळा, युगे अठ्ठावीस, आरती ज्ञानराजा, येई हो विठ्ठले या आरत्याही गायल्या जातात. उदबत्ती, एकारती, पंचारती, ङ्गुलवाती, जोडवीं व कर्पूरारती असा आरत्यांचा क्रम ठरलेला असतो. ‘घालीन लोटांगण वंदीन चरण’ हे नामदेवांचे मागणे गाऊन आरतीची सांगता होते.

गोव्यातील खेडेगावात सर्वांनी मिळूनमिसळून आरती करण्याची पध्दत आहे. गाव मोठा असेल तर वाडा हा घटक धरून घरोघर ङ्गिरून आरती केली जाते. गावच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत आरती मंडळे ङ्गिरत जातात. त्यामुळे पहिल्या दिवशी काही घरांत आरत्यांना खूप उशीर होतो. साहजिकच जेवणही लाबंणीवर पडते. आरत्यानंतर प्रसाद म्हणून उकडीचे मोदक, करंज्या (नेवर्‍या), पंचखाद्य, मुगाचे लाडू इ. वाटले जातात. नंतर गणेशाला पान दाखवलं जातं व घरातील माणसं एकत्र बसून भोजन करतात.

चंद्रदर्शन अशुभ!

गणेशचतुर्थीच्या दिवशी घरातली वडीलधारी मंडळी छोट्या मुलांना संध्याकाळी बाहेर जाऊ देत नाहीत. चुतर्थीला चंद्रदर्शन करू नये अशी समजूत आहे. त्या दिवशी चंद्राला पाहिल्यास खोटा आळ येतो अशी भीती घातली जाते. या भीतीचीच उत्पत्ती पुराणातील एका कथेत आहे. ती कथा थोडक्यात अशी : एकदा श्रीगणराया भरपूर लाडूबिडू खाऊन उंदरावर बसून बाहेर पडले. वाजवीपेक्षा जास्त खाल्ल्यानं त्याचं पोट टम्म भरलं होतं. वजनही थोडसं वाढलं होतं. बिचार्‍या उंदराला ते पेलवेना. साहजिकच त्याचे पाय लटपटायला लागले व तो एका बाजूने कलंडला. वर बसलेला गणपती दाणकन् खाली पडला. त्याला पडताना बघून चंद्र मोठमोठ्याने हसू लागला. ते पाहताक्षणी गणेशाला आला राग व त्याने चंद्राला शाप दिला की ज्यादिवशी माझी पूजा जगभर चाललेली असेल त्यादिवशी एकही माणूस तुझं तोंड बघणार नाही. जो बघेल त्याच्यावर चोरीचा आळ येईल! तर अशी ही दंतकथा!

कृषीपंचमी

चवथीचा दुसरा दिवस (पंचमी) हा ‘नव्याची पूजा’ करण्याचा. ‘नव्याची’ म्हणजे शेतातील नव्या कणसांची पूजा. यासाठी शेतावर जाऊन कणसांच्या लोंब्या आणतात. त्या आंब्याच्या पानात गुंडाळून एका पाटावर ठेवतात व त्यांची गंधङ्गूल वाहून पूजा केली जाते. पंचागात किंवा हिंदू दिनदर्शिकेत एरवी या दिवसाला ‘ॠषीपंचमी’ असे नाव आहे. प्रत्यक्षात ते ‘कृषीपंचमी’ असायला हवे. एरवी कणसांच्या पूजेची संकल्पना चवथीच्या कालात रूढ झालीच नसती. अनेक ब—ाह्मण कुटुंबे या दिवशी डोंगरावरून शोधून आणलेली कंदमुळे भक्षण करतात.

पंचमीच्या दिवसाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘कोळेमांजर’ आणि ‘उंदीर’. आदल्या रात्री केळीच्या पानावर पीठाचा उंदीर व मांजर बनवून ठेवले जातात. पंचमीच्या दिवशी पहाटे त्याचं विसर्जन केलं जातं. ते करतात छोटी मुलं, ‘कोळेउंदराऽऽधर मांजराऽऽऽ धर शेपडे, मार बोकडेऽऽ’ हे वाक्य रिकाम्या डब्यांच्या तालावर वाजवून वाजवून म्हणतात.

दीड दिवसांचा गणराया

कोळेउंदीर व मांजराच्या या विसर्जनाविषयी विशेष माहिती उपलब्ध नाही. श्रीगणेशाचं वाहन हे मूषक असल्यामुळे बहुधा हा प्रकार केला जात असावा. असो. ज्यांचा गणपती दीड दिवसांचा असतो त्यांच्या घरात पंचमीच्या सायंकाळीच विसर्जनाच्या तयारीला प्रारंभ होतो. उत्तर पूजा करून नवस बोलले जातात, गार्‍हाणे घातले जाते व मखरातल्या मूर्तीला जरासे विस्थापित करून मखरातून बाहेर काढले जाते. यावेळी मूर्तीच्या मस्तकावर लाह्या उधळल्या जातात. ‘गणपती बाप्पा मोरयाऽऽऽ पुढच्या वर्षी लवकर या’ अशा घोषणांच्या नादात मिरवणूक निघते. ‘गणपती पुत्र पार्वतेचा जातो गंगे पाणियाला’ यासारखी गाणी व्याकुळ स्वरात गायली जातात व जड अंत:करणाने प्रत्येक भाविक गणरायाला निरोप देतो.

दीड दिवसांच्या गणपतीचं ‘आपल्या घरी’ जाणं मात्र तसं आकस्मिक व चुटपूट लावणारं. दीड दिवसांची चवथ संपली कधी तेच कळत नाही. बाळगोपाळांनादेखील मोकळेपणाने खेळता-बागडता येत नाही. त्यामानाने पाच दिवसांचा उत्सव यथास्थित. नंतर मात्र जसजसे दिवस वाढत जातात तसतशी मत्स्यप्रेमींची अस्वस्थता वाढत जाते. बहुतेक गोंयकार हे श्रावणात ‘शिवराक’ बनलेले असतात व शिवराकाचे पारणे ते थेट गणपती विसर्जनानंतरच सोडतात. गोव्यातील बहुतेक घरांतून गणपती बाहेर काढला रे काढला, मागच्या पडवीत शेवट्यांची गांथण आलीच म्हणून समजा.

चवथीच्या समाप्तीला गोंयकार माणसाला माशांचे डोहाळे एवढ्या प्रखरपणे का लागतात हा खरं तर संशोधनाचाच प्रश्‍न आहे. पाच दिवसांचा गणपती बुडवल्यानंतर गोंयकार मासळीसाठी एवढा ‘आकूळ पिकूळ’ होतो की त्याला दुसरं काही सुचतच नाही. याचं प्रमुख कारण म्हणजे चवथीच्या काळात त्याच्यावर झालेला शिवराकाचा प्रचंड मारा! वरण भात, आंबाड्याचा रोस, खतखते, चण्याचे तोणाक, तेंडल्यांची भाजी, तेरे किंवा आळू, तायखिळो किंवा म्हस्काच्या पानांची भाजी असे एक ना पन्नास पदार्थ आपली क्षुधा शमवण्यासाठी धडपड करीत असतात. त्याशिवाय तर्‍हेतर्‍हेच्या मिठाया आहेतच. म्हणूनच एरवी आपण खातो त्या शिवराकापेक्षा चवथीचं शिवराक आपणाला वेगळं लागतं. जोडीला नेवर्‍या, मोदक, मुठल्या, पातोळ्या, शंकरपाळ्या यांसारखे जिभेला चाळवणारे जिन्नस! खरं तर चवथीच्या पाकसंस्कृतीवरचं एक अख्ख्या निबंध लिहिता येईल! घरातल्या बायका मंडळींचा बहुतेक वेळ रांधप-वाडप करण्यातच जातो. संध्याकाळी उसंत मिळाली तर गणपतीसमोर ङ्गुगड्या घालण्याचा कार्यक्रम. ‘गणती देवा करीन तुझी सेवा, नवस ङ्गेडीन रे’ ही पेटंट ङ्गुगडी. ‘पहाटेच्यापारी शंख वाजविला’, ‘शिरगावा सड्यावर बाई ङ्गुल्ला नागूलकुडा’ या ङ्गुगड्याही बर्‍यापैकी प्रचलित. गणपती किती दिवस ठेवायचा यासंबंधी काही गावांचे नियम ठरलेले असतात. बर्‍याच गावांत ‘तिसाल’ पाळले जाते. तिसाल म्हणजे सलग दोन वर्षे दीड दिवस व तिसर्‍या वर्षी पाच दिवस. एखाद्याने नवस किंवा आंगवण केली असले तरच आपला गणपती ठेवायचा अन्यथा सर्वांनी एकाबरोबरच विसर्जन करायचे. काही गावात एकावर्षी दीड दिवस तर दुसर्‍या वर्षी पाच दिवस अशी व्यवस्था असते.

….आणि असेही गणपती!

कौटुंबिक पातळीवर गोव्यात साजर्‍या होणार्‍या गणेशोत्सवाची काही वैशिष्ट्ये आहेत. वाजे शिरोडा येथील रायकरांचा गणपती प्रसिध्द आहे. चवथीच्या निमित्ताने रायकरांचं तीन-चारशे लोकांचे अख्खं कुटुंब एकत्र येतं. कुंटुंबातली सगळी माणसं यानिमित्तानं एकमेकांना भेटतात.

उसगांव ङ्गोंडा येथील काही घराण्यांत कागदाचा गणपती पुजला जातो. असं म्हणतात की या घराण्यांना उसगावच्या स्थानिक लोकांनी लढाया करण्यासाठी कोल्हापूरवरून आणलं होतं. मजल-दरमजल करीत येत असतानाच चतुर्थीचा सण आला. त्यावेळी ते अर्ध्या वाटेवर होते. गणपती पुजण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. शेवटी त्यांनी एका कागदावरच गणपतीचे चित्र रेखाटले व ते पुजेला लावले. पुढे हीच प्रथा रूढ झाली. आजही या घराण्यात कागदाचाच गणपती पुजेला लावण्यात येतो.

ङ्गोंडा तालुक्यातील आडपई गावात घराघरात गणपती नसतात तर एकेक कुटुंबाचे असतात. पाच दिवसांच्या या गणपतीचा विसर्जनसोहळा अत्यंत देखणा असतो व तो पाहण्यासाठी हजारो लोक गर्दी करतात. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथील गणपतीची मूर्ती लहान असते पण ती विसर्जनाला नेताना भव्य व आकर्षक चित्ररथ बनवले जातात. ही चित्ररथ बनवण्याची परंपरा नक्की कधी सुरू झाली हे आज आडपईतील ज्येष्ठ लोकांनाही सांगता येत नाही. पण ही कल्पना त्याना मुंबईतील भव्य गणेशमूर्तीचे विसर्जन पाहून सुचली असं सांगतात. एकेकाळी आडपईचे लोक दर्यावर्दी होते. कोटवो, होडी घेऊन ते मुंबईच नव्हे तर थेट कराचीपर्यंत जायचे. मुंबईत त्यांना विसर्जन मिरवणूक पहायला मिळायची. तेथून प्रेरणा घेऊन त्यांनी चित्ररथ बनवायला प्रारंभ केला असावा.

तिसवाडी तालुक्यातील कुंभारजुवे गावातला सातव्या दिवशी होणारा विसर्जनसोहळाही असाच वैशिष्ट्यपूर्ण आहे. यावेळी दोन होड्या एकमेकांना जोडून ‘सांगोड’ केला जातो व या सांगडावर पौराणिक स्वरूपाचे चित्ररथ सादर करण्यात येतात. मांडवी नदीच्या पात्रातील सांगोड पाहण्यासाठी नदीच्या दुतर्ङ्गा प्रेक्षकांची प्रचंड गर्दी उसळलेली असते.

गेल्या पाच-सहा वर्षापासून कुंभारजुवे- माशेल- खांडोळा परिसरात एक वेगळ्याच प्रकारचा गणेशोत्सव होऊ लागला आहे. हा रूढार्थाने सार्वजनिक गणेशोत्सव नाही की घरगुती सोहळाही नाही. येथील प्रत्येक वाड्यावर गणपतीची वेगळ्या स्वरूपाची भव्य मूर्ती निर्माण करण्यात येते. काही ठिकाणी वाद्यांचा गणपती, काही ठिकाणी विविध ङ्गुलांचा गणपती, तर काही ठिकाणी केळीच्या पानांचा गणपती बनवलेला असतो. केवळ सुपारी किंवा काथा वापरून गणपती बनवला जातो. कधी आरशांचा वापर करून गणपती बनवतात. अशा प्रकारचे आगळेवेगळे गणपती पाहायला भाविकांची झुंबड उठते. हल्ली हल्ली तर हे गणपती दाखवण्यासाठी स्थानिक मंडळे तिकीटसुध्दा लावू लागली आहेत.

गोव्यातील सार्वजनिक गणेशोत्सव

सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा लोकमान्य टिळकांनी पुण्यात सुरू केली. कालांतराने हे लोण महाराष्ट्रभर पसरले. आज पुण्यापेक्षा मुंबई हे सार्वजनिक गणेशोत्सवाचे केंद्र बनले आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर व कर्नाटकातील बेळगाव शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव पाहण्यासाखे असतात. मुंबईतील ‘लालबागचा राजा’ व पुण्याचा ‘दगडूशेट हलवाई’ हे सार्वजनिक उत्सवांचे अग्रणी. मुंबई-पुण्याइतके नसले तरी गोव्यात सार्वजनिक गणेशोत्सवांचे स्तोम आता हळूहळू वाढू लागले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव आता शहरापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. पणजी, मडगाव, ङ्गोंडा, म्हापसा, वास्को, डिचोली, पेडणे, काणकोण, केपे, कुडचडे, वाळपई या प्रमुख शहरांव्यतिरिक्त आता ङ्गातर्पा, म्हार्दोळ, कुंडई, खोर्ली, कुठ्ठाळी, ङ्गातोर्डा, बोरी, मंडूर, नेत्रावळी, वालकिणी, भाटी अशा ग्रामीण भागांतही सार्वजनिक गणेशोत्सव होतात. पूर्वी बहुतेक पोलीस स्थानकांवर सार्वजनिक गणेशोत्सव असायचा. अजूनही काही ठिकाणी असतो. यापैकी सांगे पोलीस स्थानकात खास देखावा पाहण्यासाठी लोक गर्दी करतात. म्हापसा शहरात मध्यवर्ती ठिकाणी होणारा सार्वजनिक गणेशोत्सव गोव्यातील सर्वात जुना मानला जातो. मडगाव पिंपळकट्ट्यावरील गणेशोत्सवालाही बरीच वर्षे झाली आहेत. ङ्गोंड्यातील जुन्या मामलेदार कार्यालयानजीकचा गणपती हा सर्वात आधीचा- पण आता झरेश्वर (बसस्टँण्ड), ङ्गोंडा बाजार, ढवळी, कवळे रथामळ इत्यादी चार पाच ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होऊ लागला आहे. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे तो हिंदूंपुरता मर्यादित नाही. ख्रिश्चन, मुस्लीम असे इतर धर्मीयही त्यात भक्तिभावाने सहभागी होतात.

गणेशोत्सवातील खाद्यसंस्कृती

गणेशोत्सवातील खाद्यसंस्कृतीचा उल्लेख मागे केलाच आहे. ही खाद्यसंस्कृती ङ्गार वैशिष्ट्यपूर्ण आहे. खायच्या वस्तूंपैकी गणपतीला सर्वात अधिक प्रिय असतात ते मोदक ही महाराष्ट्रातील लोकसमजूत. पण गोवेकरांच्या दृष्टीने मात्र गजाननाला सर्वाधिक आवडतात त्या नेवर्‍या (करंज्या)! गोमंतकीय महिला विविध प्रकारच्या नेवर्‍या बनवतात. त्यात ओल्या पुरणाच्या, किसलेल्या नारळापासून केलेल्या पंचखाजेच्या, रव्याच्या पिठाच्या, तिखट पिठीच्या अशा अनेक नेवर्‍यांचा समावेश असतो. नेवर्‍यांप्रमाणेच पुरण घातलेले चित्रविचित्र आकाराचे पदार्थही बनविले जातात. मुगाचे लाडू, चून घातलेली मुठली, पातोळ्या, गोड पोहे, गुळाच्या पाकातले पीठ आवळे इत्यादी पदार्थही नैवेद्यात वापरले जातात.

दुपारच्या जेवणात गोड पदार्थांची अक्षरश: रेलचेल असते. खीर, मणगणे, सोजी आणि गोडशे हे खास गोमंतकीय पदार्थ. सोबत तळलेल्या पुर्‍या किंवा वडे. भाज्यांमध्ये घोसाळ्याची भाजी, भेंडीची भाजी, केळीची किंवा सुरणाची भाजी, कोबीची भाजी, शेवग्याच्या किंवा दुधयाच्या ङ्गुलांची भाजी, केळीच्या बोंडलांची भाजी, ङ्गणसाच्या कुवल्यांची किंवा नीरङ्गणासाची भाजी, अशी तोंडाला पाणी आणणारी ‘व्हरायटी’! पालेभाज्यांचे तर विचारूच नका. तायखिळा, कुड्डकी आणि शेवगा (म्हशिंग) यांची भाजी केल्याशिवाय गोवेकराची चवथच होत नाही. आळू किंवा तेरे यालासुध्दा अजून पर्याय नाही. पंचमीच्या दिवशी संपूर्ण जेवण अळणी. पानात एकंदर एकवीस प्रकारची भाजी वाढली जाते. त्या दिवशी आणलेल्या कणसांमधले किमान पाच गोटे टाकून केलेला ‘पायस’ हासुध्दा एकमेवाद्वितीय! त्यानंतर खतखते, मुगांगाठी, उसळ हे रोजचे प्रकार आहेतच!

निजगोंयकांरांचा उत्सव

गणेशोत्सव हा खर्‍या अर्थाने निज गोयकारांचा उत्सव आहे. गोव्याच्या वसवणुकीत सहभागी झालेल्या प्रत्येक समाजाचे लोक त्यात सामील होतात. यात भटांपासून गावड्यापर्यंत सर्वांचा समावेश आहे. उत्सव साजरा करण्याची पद्धत वेगळी असली तरी उत्साह मात्र तितकाच. भट-ब—ाह्मण, वैश्य, दैवज्ञ, उच्चवर्णीय मराठा या समाजात चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिका व्रताची पध्दत आहे. हरतालिकेला गोव्यात ‘तय’ म्हणतात. ‘त्रयोदशी’वरून तय हा शब्द आला आहे. बहुजनसमाज तय साजरी करीत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात होते तसे ‘गौरी गणपती’ विसर्जन रूढार्थाने गोव्यात होत नाही.

गोमंतकीय बहुजनसमाज ज्या तर्‍हेने गणपतीपूजा करतो ती पाहिल्यास गणेश हे भूमीपुत्रांचेच दैवत आहे याची साङ्ग साङ्ग प्रचिती येते. अनेक संशोधकांच्या मते गणपती हा देव मूळ आर्यांचा (हिंदुस्थानात वस्ती करून असलेल्या आदिम जमातींचा आहे) पुढे आर्यांनी त्याचे वैदिकीकरण केले व साकार स्वरूपातील गणपतीला निराकार स्वरूपी (ऍबस्ट्रॅक्ट) बनवून त्याल पुरक अशा अनेक कहाण्या जोडल्या.

हिंदुस्थानात आज प्रचलित असलेल्या पुराणकथांचा व दंतकथांचा मागोवा घेतल्यास काही परस्परविरोधी गोष्टी नजरेत भरतात. भारतीय पुराणे व मिथके यांच्यामते गणपती हा शंकर व पार्वतीचा पुत्र आहे. मात्र त्याचा जन्म नेमका कसा झाला असावा यासंबंधी विविध मतप्रवाह आहेत. एका मतानुसार गणेश हा अयोनिज आहे. शंकराने आपल्या तप:सामर्थ्याने त्याला निर्माण केला. मात्र आपणासारखी रूपवान पत्नी असतानाही आपल्या मदतीवाचून शिवाने गणेशनिर्मिती केली या मत्सराने ग्रस्त होऊन पार्वतीने शाप देऊन त्या बालकाला बेडौल व कुरूप बनवले. ब—ह्मवैवर्त पुराणानुसार एकदा शिवपार्वती हिमालयात विहार करीत होती. तिथे त्यांना एक हत्ती व हत्तीण रतिक्रिडेत मग्न असताना दिसली. मग शिवपार्वतीनेही गजरूप घेऊन रतिक्रिडा केली व त्यातून त्यांना गणपती हा पुत्र प्राप्त झाला.

या दोन कथांव्यतिरिक्त हिंदुसमाजात सर्वाधिक प्रचलित असलेली दंतकथा पुढीलप्रमाणे- एकदा पार्वती स्नानाला जात होती. स्नानाला जातेवेळी तिने अंगातला मळ काढला व त्या मळापासून एक पुतळा तयार केला. त्या पुतळ्यात प्राण फुंकून पार्वतीने त्याला जिवंत केले. आपल्या हातून इतक्या देखण्या व तेज:पुंज बालकाची निर्मिती झालेली पाहून ती खूष झाली व त्याला म्हणाली, ‘‘बाळा, तू माझा पुत्र. आता मी स्नानाला चालले आहे, तेव्हा तू दारापाशी उभा रहा आणि पहारा दे. कोणीही आत आलं तरी त्याला आत सोडू नकोस!’’ त्याप्रमाणे तो नवजात पार्वतीपुत्र तिथे पहारा देत उभा राहिला. थोड्या वेळाने तिथे अवतरले साक्षात महादेव! ते पार्वतीला भेटायला जाऊ लागले पण त्या बालकाने त्याना दारावरच अडवले. आपण पार्वतीचे पती आहोत असे सांगूनदेखील हा बालक त्यांना आत जाऊ देईना. दोघांची बाचाबाची बराच वेळ चालू राहिली. पण बालक काही ऐकेना. शेवटी शिवशंकरांना आला क्रोध व त्यांनी रागाच्या भरात त्रिशूल ङ्गेकून रक्षकाचे शीर धडावेगळे केले. आपण निर्माण केलेला पुत्र शिवाच्या हातून मरण पावला हे कळताच पार्वती विलाप करू लागली, ‘काही करा पण माझ्या पुत्राला जिवंत करा’ असा हट्टच तिने धरला. शेवटी शंकर जंगलात गेले व प्रथम दृष्टीस पडलेल्या हत्तीचे शीर आणून त्यांनी धडावर चिकटवले व पुतळा जिवंत केला. तोच हा गणपती!

दंतकथेचा अन्वयार्थ गणेश जन्माबद्दलची ही दंतकथा आपण वर्षानुवर्षे तशीच ऐकत आलो आहोत. पण तिच्यातील गर्भित अर्थ शोधायचा प्रयत्न आपण क्वचितच केला आहे. वस्तुत: या दंतकथेला वेगळाच अर्थ आहे. पार्वती म्हणजे कोण? पार्वती हे नाव ‘पर्वत’ या धातूवरून आले आहे. ‘पर्वताची कन्या’ ती पार्वती- अर्थातच विशाल हिमालयाच्या पायथ्याशी पसरलेली धरती! पार्वती आंघोळीला जाते, याचा अर्थ ही धरित्री पहिला पाऊस अंगावर घेते. या पर्जन्यस्नानात तिच्या अंगावरील मळ (मातीचा थर) पाण्याबरोबर वाहून जात शेतात साचतो व त्याचा चिखल होतो. कालांतराने चिखलाची चिकणमाती बनते. याच चिकणमातीपासून आपण गणेशाची मूर्ती बनवतो व ती पुजेला लावतो. याचा अर्थ- गणपती हा पार्वतीचा म्हणजेच धरित्रीचा पुत्र आहे. धरित्रीचा पुत्र कोण? अर्थातच निसर्ग! गणपती हे निसर्गाचे रूप आहे. त्याचे मानवी शरीर आणि गजाचे मुख हे मनुष्य व इतर प्राण्यांमधील अद्वैताचे द्योतक आहे.

या निसर्गरूपी गणपतीची पूजा करताना आपण निसर्गाचेच धन त्याला अर्पण करतो. डोंगरावरील दुर्मीळ पत्री त्याला अर्पण करतो. ही पत्री आयुर्वेदात औषधांच्या निर्मितीसाठी वापरली जाते. माटोळीला बांधण्यात येणारी कांगलां, कुंडलां, करमलां, कुडे, घागर्‍या ही सर्व ङ्गळे औषधी गुण असलेली आहेत. नारळ, सुपारी, केळी, मका हे सगळे निसर्गाचे देणे आहे. माटोळीला ङ्गळङ्गळावळ बांधायची ती यासाठी!

गणेशाला धरणीपुत्र मानून त्याचे पूजन करण्याची प्रथा भारतात लोकसंस्कृती उदयाला येण्याच्या काळापासून सुरू झाली असावी. सुरूवातीला माणूस रानटी श्वापदांप्रमाणेच जगत होता. पण हळूहळू तो विकसित झाला. शेतीभाती करू लागला. पण सृष्टीचे म्हणावे तितके ज्ञान त्याला प्राप्त झाले नव्हते. वादळ, पाऊस, महापूर, दुष्काळ यांसारख्या गोष्टी त्याला त्रास देत. म्हणून मानवाने वारा, पाणी, धरणी याना देवता मानून त्यांचे पूजन सुरू केले. नैसर्गिक शक्तीप्रमाणेच वाघ, सिंह, हत्ती, डुक्कर, माकड, साप, पक्षी त्याची सतावणूक करीत. हत्ती, डुक्कर व माकड यांच्यापासून शेती-बागायतीला सर्वाधिक नुकसान पोचत असे. आपण पूजन केले तर हे प्राणी खूष होतील या समजुतीने आदिम माणसाने हत्ती, वानर यांच्या प्रतिमा करून त्यांना खूष करण्यासाठी बली किंवा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा सुरू केली. यातूनच गणेश व मारुती ही दोन दैवते आकाराला आली.

पुढे आर्य-अनार्य संस्कृतीचे अभिसरण झाल्यानंतर प्रचलित मिथकांना एक वेगळा आध्यात्मिक आयाम मिळाला. अनार्याच्या जुन्या प्रथा कायम ठेवताना आर्यानी त्यांना वैचारिक अधिष्ठान दिले व लिखित ग्रंथांद्वारे त्यांना अधोरेखित केले. त्यानुसार गणपती म्हणजेच ‘प्रणव’ किंवा ‘ॐकार’ ही संकल्पना कायम झाली. आपल्या प्राचीन ॠषींना मूळ हत्तीच्या आकारात ॐकाराचे दर्शन झाले. ‘ॐ’ हे सर्व अक्षरांचे आदिबीज मानले गेले ते यामुळेच. या रूपांतूनच आकार, उकार व मकार ध्वनिगोचर झाले व अक्षरलिपी तयार झाली. गणपतीला सकल विद्येचा दाता मानले जाते त्यामागचे कारण हे आहे. विद्येच्या मुळारंभ लिपीपासून होतो व लिपी गणेशापासून म्हणजेच ॐकारापासून निर्माण झाली आहे.

श्रीगणेशाच्या या आध्यात्मिक रूपाचे यथार्थ वर्णन ज्ञानेश्वरांनी आपल्या भावार्थदिपिकेच्या प्रारंभीच केले आहे. त्यात ते म्हणतात – ‘ॐ नमोजी आद्या| वेद प्रतिपाद्या| जय जय स्वसंवेद्या| आत्मरूपा॥ देवा तुंचि गणेशु| सकलार्थ मतिप्रकाशु| म्हणिजे निवृत्तीदासु| अवधारिजो जी॥ अकार चरणयुगुल| उकार उदर विशाल| मकार महामंडळा| मस्तकाकारे॥ हे तिन्ही एकवटले| तेथ शब्दब—ह्म कवळले| ते मियां गुरूकृपें नमिले| आदिबीज॥

गोमंतकातील गणेशमंदिरे

अशा या गजाननाची भक्ती गोव्यात ङ्गार पूर्वीपासून प्रचलित आहे. तथापि, त्या मानाने गणपतीच्या मंदिराची संख्या मात्र मोजकीच म्हणावी लागेल. सर्वात प्राचीन मंदिर आहे ते माशेलनजीक खांडोळा गावात असलेले गणपती मंदिर. प्रारंभी हे मंदिर दिवाडी बेटावर नावेली येथे होते. पण पोर्तुगीज बाटाबाटीच्या काळात खांडेपार-ङ्गोंडा येथे त्याचे स्थलांतर झाले. बर्‍याच वर्षानंतर हे मंदिर खांडोळ्याला नेण्यात आले. त्याचा इतिहास आज कागदोपत्री उपलब्ध आहे पण विस्तार भयास्तव तो येथे देता येत नाही. पोर्तुगिजांच्या धर्मच्छलाच्या तडाख्यात जी शेकडो मंदिरे उद्ध्वस्त झाली त्यात काही गणेशमंदिरांचाही समावेश असणे अपरिहार्य आहे. पण त्यांचा इतिहास आज ज्ञात नाही. तिसवाडीतील करमळी व तळावली, बार्देशमधील पुमोळे, सांगोल्डा व शिवोली आणि सालसेतमधील बेताळभाटी व केळशी या ठिकाणी गणेशमंदिरे असल्याचे उल्लेख सापडतात.

गोवा मुक्तीनंतर बर्‍याच ठिकाणी गणपतीची मंदिरे बांधण्यात आली. त्यातील प्रमुख म्हणजे ङ्गर्मागुडी येथील गोपाळ गणपती मंदिर. हा गणपती पूर्वी गुराख्यांचा होता. भाऊसाहेब बांदोडकरांनी हे देऊळ बांधून काढले. अशाच प्रकारचे गोपाळ गणपती मंदिर तळावली ङ्गोंडा येथे बांधण्यात आले आहे. म्हापसा येथील टेकडीवर विसेक वर्षांपूर्वी श्रीगणेश मंदिर बांधण्यात आले. त्या टेकडीला आता ‘गणेश पुरी’ असे म्हणले जाते. पारंपई मडकई येथे बालगणपती मंदिराची निर्मिती झाली आहे. वेळगे येथे सहस्त्रबुध्दे कुटुंबीयांनी गणेशाचे देऊळ बांधले आहे. बिंबल सत्तरी येथील भावे कुटुंबियांनी बांधलेले सिद्धिविनायक मंदिर एक जागृत स्थान म्हणून गणले जाते. मडगाव येथे रावणङ्गोंडच्या पुढे गणेश मुरूगन मंदिर स्थापन झाले आहे. खडपाबांध- ङ्गोंडा येथील डोंगरावर गृहमंत्री रवी नाईक यांच्या पुढाकाराने गणेश-शंकर-पार्वती मंदिर उभे झाले आहे, तर दिवाडी येथे मूळ मंदिर असलेल्या जागेवर नवीन जीर्णोद्धारित मंदिर बांधण्यात आले आहे. गणपतीच्या देवालयांची यादी आणखी बरीच लांब भरेल. पण श्रीगणेशाविषयी गोंयकाराच्या मनात असलेल्या भक्तीचं मोजमाप मंदिरांच्या संख्येवरून होणार नाही. प्रत्येक गोमंतकीयांचं हृदय हेच गणेशाचे वास्तविक मंदिर आहे. ज्ञानदेव ज्याला ‘आत्मरूपा’ म्हणतात तो गणपती स्वयंभू आत्म्याच्या रूपाने प्रत्येक जीवमात्रात संचार करीत आहे. त्याची कृपा अखिल जगतावर व्हावी आणि गणेशाच्या वैश्विक रूपाचा प्रत्यय प्रत्येक मानवाला यावा हीच अंत:करणापासून प्रार्थना!

॥ गं गणपतये नम:॥