सगळ्या छानशा गोष्टी…

0
184

अनुवाद ः अपूर्वा कर्पे

फ्यूनरलला मार्कचे सारे क्लासमेट्‌स होते. जेवण झाल्यावर मार्कचे वडील मला खोलीत घेऊन गेले. ‘‘तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे.’’ त्यांनी मार्कच्या पाकिटातून एक चिठ्ठी बाहेर काढली. ‘‘तुम्हाला याची ओळख पटेल!’’ ते वहीच्या पानाचे दोन झिरझिरलेले तुकडे बाहेर काढत म्हणाले.

 

मी जेव्हा सेंट मेरीसमध्ये तिसर्‍या इयत्तेला शिकवत होते, तेव्हा ‘तो’ माझ्या वर्गात होता. सगळी चौतीसच्या चौतीस मुलं माझी आवडती होती. तसं मी सांगायचेदेखील त्यांना! पण तो- मार्क ऍकलंड, लाखात एक असा विद्यार्थी होता… नीटनेटका, अगदी चैतन्याचा झराच म्हणा ना! त्याच्या खोड्याही कौतुकास्पद वाटत.
तो वर्गात अखंड बडबड करायचा. मी त्याला परत परत गप्प बसवायचा प्रयत्न करीत असे. प्रत्येकवेळी दटावलं की त्याचं एकच पालुपद असायचं- ‘थँक्यू मॅम, मला सुधारल्याबद्दल!’ त्याच्या या शब्दांनी मी विरघळून जायचे आधी. पण नंतर हेच शब्द मला दिवसातून अनेक वेळा तो ऐकवायचा.

एक दिवस मी जरा वैतागलेलीच होते. मार्कचीही अखंड बडबड चालू होती. सगळ्या टिचर्सप्रमाणे मीही बोलले, ‘‘मार्क, आता एक शब्दही बोललास तर टेप लावीन हं तुझ्या तोंडाला!’’
दहा सेकंद झाले असतील नसतील; एका मुलाने तक्रार केली, ‘‘मॅम, मार्क पुन्हा बोलतोय!’’
मी काही कोणाला मार्कवर लक्ष ठेव असं सांगितलं नव्हतं; पण अगोदरच शिक्षा घोषित केल्याप्रमाणं मला तसं वागावंच लागणार होतं.

मी माझ्या ड्रॉवरमधून टेप काढली, तिचे दोन तुकडे कापून इंग्रजी एक्स अक्षरासारखी त्याच्या तोंडावर टेप लावली… माझ्या टेबलकडे आल्यावर मी त्याच्याकडे नजर टाकली तर त्याही परिस्थितीत त्याने मला डोळा मारला! या गोष्टीने योग्य तो परिणाम साधला, मी हसू आवरू शकले नाही न् माझ्यापाठोपाठ सर्व वर्ग हास्यात बुडून गेला! हसत हसत त्याच्याजवळ येऊन मी त्याच्या तोंडावरची टेप काढली तसा तो उत्तरला, ‘थँक्यू मॅम, मला सुधारल्याबद्दल!’
थोड्या वर्षांनी हायस्कूलमध्ये नवीन गणित शिकवायला मी रूजू झाले. नववीचा वर्ग. पाहिले तर मार्क हसर्‍या चेहर्‍याने पहिल्या बाकावर बसला होता. तारुण्य नि बालपणाच्या उंबरठ्यावर असलेला मार्क आता मोहक दिसत होता. बडबड कमी झाली होती. नवीन गणित शिकताना लक्ष द्यावं लागतं म्हणून असेल कदाचित!
आठवडाभर एका नवीन गणितावर डोकेफोड केल्यामुळे एका शुक्रवारी मुलं जरा उखडलेली, चिडलेलीच होती. हा त्यांचा निरुत्साह घालवायला काहीतरी करायलाच हवं होतं… मी त्यांना वर्गातल्या प्रत्येकाचं नाव लिहून त्या नावासमोर प्रत्येकाला त्या मुलाबद्दलच्या छान छान गोष्टी लिहायला सांगितलं. पूर्ण दिवस त्यांचं हे काम अतिशय उमेदीत चाललं होतं. वर्गात उत्साह नुसता ऊतू जात होता. संध्याकाळी पूर्ण झालेली असाईन्मेंट सर्वांनी माझ्याकडे आणून दिली.
दुसर्‍या दिवशी शनिवारी मी त्या-त्या मुलांच्या चिठ्ठीवर त्यांच्या वर्गमित्रांनी लिहिलेले शेरे लिहून काढले व सोमवारी सर्वांना ते वाटून टाकले.

सगळा वर्ग हसत होता. ‘खरेच?’ ‘असं वाटतं सर्वांना माझ्याबद्दल?’ ‘एवढा आवडतो मी सर्वांना?’ ‘या गोष्टीचं सर्वांना एवढं अप्रूप वाटतं हे माहीतच नव्हतं मला!’ मला कुजबूज ऐकू येत होती. मुलं एकमेकांबरोबर खूपच आनंदी होती, एकमेकांच्या खूप जवळ गेली. मी त्यांचा हा आनंद पाहात होते.
वर्ष संपल्यावर हा ग्रूप गेला, दुसरा आला. नंतर तिसरा… चौथा… पण परत हा प्रयोग मी कधी केला नाही, मला त्याची आठवणच राहिली नाही.

मध्ये खूप वर्षं गेली…
एकदा मी टूरवरून परतत होते. आई-बाबा मला न्यायला एअरपोर्टवर आले होते. येताना आईबाबा गप्प गप्प वाटले. आईने नेहमीची चौकशी केली, ‘तिथलं वातावरण कसं आहे? जेवण कसं होतं? आठवण ठेवण्यासारखं काही?’ वगैरे… गाडीच्या आरशातून मला आई-बाबा एकमेकांना ‘तू सांग, तू सांग’ असे खुणावताना दिसले. बाबांनी शेवटी घसा खाकरला,
‘‘ऍकलंडस्‌चा काल रात्री फोन आला होता.’’
‘‘ऍकलंडस्…? खूप वर्षांनी केला फोन… मार्क कसा आहे म्हणे?’’- मी.
‘‘मार्क… मार्क व्हिएतनामच्या लढाईत मारला गेला! …आज फ्यूनरल आहे… तू आलीस तर बरं वाटेल असं त्याचे वडील म्हणाले.’’

—————–
मिलिटली कॉफिनमधल्या मार्कला पाहून एकच विचार आला- ‘मार्क, तू माझ्याकडे बोललास तर मी जगातल्या सार्‍या टेप्‌स तुझ्यावरून ओवाळून टाकीन!’
मार्कच्या मित्र-मैत्रिणींनी चर्च भरून गेलं होतं… फादरने रोजची प्रार्थना केली. एक एक करून मार्कवर प्रेम करणारे लोक शवपेटीजवळ येऊन मार्कला श्रद्धांजली वाहत होते. मी तिथे उभी राहून मार्कच्या आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना करत असताना एक मिलिटरी सोल्जर माझ्याजवळ आला. ‘‘तुम्हीच मार्कच्या गणिताच्या टिचर का?’’ मी मानेनेच ‘हो’ म्हणाले. ‘‘मार्क तुमच्याबद्दल खूप बोलायचा.’’

फ्यूनरलला मार्कचे सारे क्लासमेट्‌स होते. जेवण झाल्यावर मार्कचे वडील मला खोलीत घेऊन गेले. ‘‘तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे.’’ त्यांनी मार्कच्या पाकिटातून एक चिठ्ठी बाहेर काढली. ‘‘तुम्हाला याची ओळख पटेल!’’ ते वहीच्या पानाचे दोन झिरझिरलेले तुकडे बाहेर काढत म्हणाले. ते तुकडे चिकटपट्टीच्या सहाय्याने सांभाळून ठेवले होते. खूपदा घड्या घालून घालून ते फाटून गेले होते. अक्षर पण अस्पष्ट होतं… मी ओळखलं, मार्कच्या मित्रांनी मार्कबद्दल लिहिलेले कमेंट्‌स होते त्यावर.
‘‘मार्कचा खजिना होता हा!’’ त्याचे वडील म्हणाले.
हळूहळू मार्कचे वर्गमित्र आमच्याभोवती जमले.
‘‘माझ्याकडेही अजून ते पान आहे… ड्रॉव्हरच्या वरच्या कप्प्यात ठेवलंय मी ते,’’ चार्ली म्हणाला. ‘‘मला यांनी तो लग्नाच्या आल्बममध्ये सगळ्यात सुरुवातीला लावायला लावला,’’ चकची बायको म्हणाली. ‘‘मी तो सतत माझ्याबरोबर ठेवते,’’ आपल्या पॉकेट डायरीला चिकटवलेला तो कागद दाखवत ऍना म्हणाली. ‘‘आम्ही सर्वांनीच तो तुकडा अगदी हृदयाशी जपून ठेवलाय!’’ पिटर अश्रूभरल्या डोळ्यांनी म्हणाला.
आणि याचवेळी माझा बांध फुटला. मी मटकन खाली बसले नि ओक्साबोक्शी रडू लागले…
(पुस्तक ः ‘लाईफ इज ब्युटीफूल’- टोनी मार्टिन्स)