सक्रिय रुग्णसंख्या पोहोचली १० हजारांच्या वर

0
2

>> कोविड पॉझिटिव्हिटी दर २७ टक्क्यांवर; एका रुग्णाचा मृत्यू

राज्यात गेल्या चोवीस तासांत नवीन १५९२ कोरोनाबाधित आढळून आले, तर एका कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण २७.३८ टक्के एवढे आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येने १० हजारांचा टप्पा ओलांडला असून, सध्या राज्यात १० हजार १३९ एवढे सक्रिय रुग्ण आहेत. ३१ डिसेंबरला सक्रिय रुग्णसंख्या १ हजारांच्या वर गेली होती. त्यानंतर अवघ्या ११ दिवसांत सक्रिय कोरोना रुग्णसंख्येने १० हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

राज्यात दरदिवशी मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित आढळून येत आहेत. गेल्या चोवीस तासांत नवीन ५८१४ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली, त्यातील १५९२ नमुने बाधित आढळून आले. राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी ६६१ जण कोरोनामुक्त झाले असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.८६ टक्के एवढे खाली आले आहे. राज्यात इस्पितळात दाखल होणार्‍या कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित वाढ झाली आहे. कोरोनाची लक्षणे जाणवल्याने २३ जणंाना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे, तर कोरोनामुक्त झालेल्या १६ जणांना इस्पितळातून घरी पाठविण्यात आले.

चोडणकरांना कोरोनाचा संसर्ग
गोवा कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोविड चाचणी करून घ्यावी, असे आवाहन चोडणकर यांनी केले आहे.